भाजपमध्ये कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक : रणजित पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ’’भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. निष्ठेने काम केल्यास मोठी पदे भूषविण्याची संधी मिळते,’’ असे प्रतिपादन गृह आणि नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले.
 
गुरुवारी नाशिकमध्ये महानगर भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, महानगर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेता संभाजीराव मोरूस्कर, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, उत्तमराव उगले, महिला आघाडी अध्यक्ष रोहिणी नायडू, भारती बागूल, सुजाता करजगीकर, सतीश कुलकर्णी, गोपाळराव पाटील आदी उपस्थित होते.
 
 
’’मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता होतो. त्यानंतर छोटी मोठी पदे भूषवून आज मी आमदार आणि मंत्री बनलो. केवळ भाजपमध्येच ही किमया घडू शकते,’’ असे आवर्जून निदर्शनास आणून देत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यवस्थापन तंत्राचे महागुरू आणि जनतेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष असते. महाराष्ट्राला सर्व क्षेत्रांत अव्वल आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू असून त्यांचे हात बळकट करा, असेही पाटील म्हणाले.
 
’’महाराष्ट्र शासन हे जनतेचे असून कुंभमेळा काळात भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानेच आज नाशिकचा कायापालट झाला आहे. आणखी विकासकामांसाठीही मोठी मदत मिळणार असून त्या अंतर्गत नाट्यगृह, रस्ते, महिलांसाठी बाजारपेठा, दलित वस्ती सुधारणा आदी कामे होणार आहेत,’’ असे बाळासाहेब सानप यांनी सांगितले.
 
प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महानगराच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन उत्तम उगले तर आभारप्रदर्शन प्रशांत जाधव यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@