क्रेडिट कार्डचे वैयक्तिक आर्थिक व्यवहारांतील स्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018   
Total Views |
 

 
क्रेडिट कार्ड वापरावयाचे म्हटले की, अनेकांच्या कपाळ्यावर आठ्या उमटतात. कारण, क्रेडिट कार्डविषयी एकतर फारशी माहिती नसणे आणि काहीसा संभ्रम. क्रेडिट कार्डपेक्षा आपले डेबिट कार्डच बरे, अशी आर्थिक भावना म्हणूनच जोपासली जाते. त्यातच मध्यमवर्गीयांमध्ये क्रेडिट कार्ड वापरणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जाते. अशाप्रकारचे अनेक समज-गैरसमज क्रेडिट कार्डबद्दल आपण ऐकत-वाचत असतो. तेव्हा, आज क्रेडिट कार्डची नेमकी कार्यप्रणाली आणि असले कार्ड्‌स वापरताना ध्यानात घ्यावी लागणारी आर्थिक शिस्त याचा आढावा घेणारा हा लेख...
 
बँकांकडून सातत्याने वैयक्तिक कर्ज घ्या किंवा क्रेडिट कार्ड घ्या, असे संदेश किंवा फोन तुमच्या मोबाईलवर येत असतीलच. पण, त्यातल्या त्यात नोव्हेंबर २०१६च्या ऐतिहासिक नोटाबंदीनंतर बँकांनी क्रेडिट कार्ड विक्रीसाठी अधिकच जोर लावला. त्यामागचे एक कारण असे सांगता येईल की, नोटाबंदीमुळे बँकांकडे फार मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला आणि तो निधी कर्जरूपाने देण्यासाठी बँकांनी साहजिकच प्रयत्न वाढविले.
 
क्रेडिट कार्ड हेदेखील एक प्रकारचे असुरक्षित वैयक्तिक कर्ज. कदाचित त्यामुळेच क्रेडिट कार्ड वापरणार्‍यांचे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१७ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्डधारकांची संख्या फक्त ३४ लाख ७० हजार इतकी आहे. डेबिट कार्डधारकांच्या तुलनेत क्रेडिट कार्डधारकांची संख्या फक्त ४.१७ टक्के आहे. ग्राहकांकडे प्रत्येक बचतखात्यासाठी एक डेबिट कार्ड असते, तर भारतात क्रेडिट कार्डधारकांकडे सरासरी २.२ टक्के क्रेडिट कार्ड आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाकडे एकापेक्षा अधिक बँकांची क्रेडिट कार्ड असतात.
 
क्रेडिट कार्डचे ‘लिमिट’ म्हणजे तुम्ही सदर क्रेडिट कार्ड जास्तीत जास्त किती रकमेपर्यंत वापरू शकता हा आकडा. हा तुमच्या आर्थिक स्थितीवर म्हणजे तुमच्या उत्पन्नावर ठरतो. तसेच, जी बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार आहे, त्या बँकेच्या खात्यातून होणारे व्यवहारही ती बँक विचारात घेते. जर तुमच्या खात्यात वरचेवर रकमा जमा होत असतील व खात्यात शिल्लकही चांगली राहत असेल तर ती बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देईलच व ‘लिमिट’ही चांगले देईल. क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे ४५ दिवसांपर्यंत बिनव्याजी रक्कम तुम्हाला वापरता येते. म्हणजे, कार्डधारकाने खरेदी केलेल्या तारखेपासून ४५ दिवसांचे त्याला क्रेडिट मिळते व या ४५ दिवसांत कोणतेही व्याज न भरता त्याला बिलाची रक्कम भरता येते. पण, ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत बिल भरले नाही, तर मात्र बँकेतर्फे व्याज आकारले जाते. क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास सुमारे १७ टक्के दराने सेवाकर भरावा लागतो. अगोदर सेवाकर फार कमी होता. सध्याच्या केंद्र सरकारने तो वाढवित वाढवित आता १७ टक्के केला आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचे वापरकर्ते सुज्ञपणे कार्डचा वापर करू लागले आहेत. क्रेडिट कार्डच्या बिलावर तुमच्या पूर्ण बिलाची रक्कम असते, ती पूर्ण रक्कम जर तुम्ही बिल भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी भरली, तर बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज आकारत नाही. बिलावर तुमच्या बिलाच्या रकमेपैकी किमान इतकी रक्कम भरा, असाही आकडा देण्यात येतो. ग्राहक ही सुविधा वापरू शकतात व उरलेल्या रकमेवर व्याज आकारले जाते व ती रक्कम पुढील बिलात ‘कॅरी फॉर्वर्ड’ होते.
 
क्रेडिट कार्डचे प्रकार
 
काही क्रेडिट कार्ड फक्त पेट्रोल पंपांवरच वापरण्यासाठी असतात, तर काही प्रवास व विमान प्रवासासाठीच वापरली जातात. ही ‘को-ब्रॅण्डेड’ क्रेडिट कार्ड असतात. म्हणजे, इंडियन ऑईल व एखाद्या बँकेचे ‘को-ब्रॅण्डेड’ कार्ड असेल, तर ते पेट्रोल पंपांवर वापरता येते व वापरणार्‍याला वापर केल्यावर काही फायदेही दिले जातात. कार्ड घेताना कमी शुल्क असलेले किंवा शुल्क नसलेलेच कार्ड घ्या. सार्वत्रिक उपयोग होईल असेच कार्ड घ्या. ज्या कार्डवर ग्राहकाला ‘रिवॉर्ड पॉईंट‘ दिले जातात, अशा कार्डंना वार्षिक शुल्क असते. वार्षिक शुल्काच्या तुलनेत त्यांना काय फायदे मिळणार, याचा विचार ग्राहकाने कार्ड घेताना करावयास हवा. तुमचा जर क्रेडिट कार्डचा वापर भरपूर असेल, तर अशा ग्राहकांचे वार्षिक शुल्क बँकांतर्फे माफही केले जाते.
 
तुमची जीवनशैली व तुम्ही करणारे खर्च यावर कोणते क्रेडिट कार्ड घ्यावयाचे हे ठरविले जावयास हवे. तुमचा इंधनावर भरपूर खर्च होत असेल, तर पेट्रोलपंपांवर प्राधान्य देणारे कार्ड तुम्ही घ्यावयास हवे. टॅक्सीचालक तसेच प्रवासी, चारचाकी चालक यांनी हे कार्ड घ्यावे. वरचेवर विमानाने प्रवास करणार्‍यांनी त्यासाठी असलेले कार्ड घ्यावे. कारण, त्यांना काही ठराविक रक्कम वापरल्यावर तिकिटाच्या रकमेत सूट मिळू शकते.
 
क्रेडिट कार्डच्या वापरावर योग्य नियंत्रण ठेवले नाही व शिस्त पाळली नाही, तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकता. क्रेडिट कार्डने शक्यतो रोख रक्कम (कॅश) काढू नका. त्यावर चढ्या दराने व्याज आकारले जाते. एक क्रेडिट कार्ड बाळगणार्‍यांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड वापरणारे आपल्या व्यवहारांवर योग्य नियंत्रण ठेवत नाहीत, असे आढळून आलेले आहे. क्रेडिट कार्डची रक्कम थकविणार्‍यांचे प्रमाणही फार मोठे आहे. काही काळ क्रेडिट कार्डची ‘एनपीए’ झालेल्या खात्यांच्या वसुलीसाठी न्यू जनरेशन बँका, पैसे थकविणार्‍यांच्या घरी दणकट माणसे पैसे वसुलीसाठी पाठवित असत. पण, याबाबत फार आरडाओरड झाल्यावर रिझर्व्ह बँकेने ही पद्धत बंद करण्याचा फतवा काढला. त्यामुळे बँकांना आता दमदाटी करून पैसे वसूल करण्यास मिळत नसून, कायदेशीर मार्गानेच जावे लागते. भारतात कायदेशीर मार्गाने जाणे म्हणजे निकालाची युगानुयुगे प्रतीक्षा करणे. क्रेडिट कार्ड असणार्‍यांकडून नको ती व अनावश्यक खरेदीही फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे टाळणे सर्वस्वी कार्डधारकाच्या हातात आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या आकडेवारीनुसार, आर्थिक शिस्त पाळणारे नागरिक दर महिन्याला त्यांच्या क्रेडिट कार्ड रकमेच्या ‘लिमिट’च्या ३५ ते ४० टक्के रक्कम खर्च करतात. पण, काही कार्डधारक क्रेडिट कार्डच्या बिलाची ठराविक रक्कम भरून, कार्ड व्यवहार सुरळीत ठेवता येतात, याचा फायदा घेऊन क्रेडिट कार्डचा प्रचंड वापर करतात व नंतर कर्जाच्या विळख्यात सापडतात. काही बँका कमी भरलेल्या रकमेवर महिन्याला तीन टक्के दराने व्याज आकारतात. तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल रु. १० हजार आहे. तुम्ही दर महिन्याला पाच टक्के रक्कम भरण्याचे ठरविले, तर तुम्हाला रक्कम फेडायला ३५ वर्षे लागतील व या कालावधीत तुम्हाला १३ हजार रुपये व्याज भरावे लागेल.
काही लोक दोन कार्ड वापरतात. एक वैयक्तिक वापरासाठी व दुसरे व्यवसायाच्या वापरासाठी. सतत प्रवास करणारे विशेषतः परदेशी प्रवास करणारे अधिक ‘कार्ड’ बाळगतात. कारण, सगळीच कार्ड परदेशात स्वीकारली जात नाहीत. क्रेडिट कार्ड न वापरताही आमचे आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ शकतात, अशी मनोधारणा असलेलेही असंख्य भारतीय आहेत.
दहा वर्षांपूर्वी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड ही चांगली पर्वणी होती. पण, या काळ्या पैशाला व्यवहारातून हद्दपार करण्यासाठी आणि रोखीचे व्यवहार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अन्य ‘डिजिटल’ व्यवहारांना प्रोत्साहन दिले. उदाहरण द्यायचे तर ‘पेटीएम’ व अन्य बरेच ‘अॅप’ आहेत. त्यामुळे आता क्रेडिट कार्ड बर्‍याच पर्यायांपैकी एक पर्याय झाला आहे. आता ‘ऑनलाईन पेमेंट्‌स’साठी जनतेकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही जर क्रेडिट कार्ड ‘लिमिट’च्या ५० हून कमी टक्के रक्कमखर्च करीत असाल, तर तुमचा ‘सिव्हिल स्कोअर’ चांगला राहतो. कोणालाही कुठेही कर्ज घेताना त्याचा ‘सिव्हिल स्कोअर’ तपासला जातो. तो जर योग्य नसेल तर नवे कर्ज मिळत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डचे तुमचे खाते ‘एनपीए’ होणार नाही याची काळजी घ्या.
 
क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची काळजी - 
क्रेडिट कार्ड आर्थिक शिस्तीने वापरा. शक्यतो अंतिम तारखेपूर्वी बिलाची पूर्ण रक्कम भरा. गरज असेल तरच क्रेडिट कार्डचा वापर करा. क्रेडिट स्कोअर चांगला असू द्या, नाहीतर भविष्यात इतर कर्जे संमत होण्याचा तुमचा मार्ग बंद होऊ शकतो, हे ध्यानात घ्या.
 
 
- शशांक गुळगुळे 
@@AUTHORINFO_V1@@