विद्यार्थ्याच्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील घटना

१९ वर्षीय आरोपीला घेतले ताब्यात




फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या एका माध्यमिक शाळेमध्ये शाळेच्याच माजी विद्यार्थाने केलेल्या गोळीबारामध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फ्लोरिडातील पार्कलँड शाळेमध्ये ही घटना घडली असून गोळीबार करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक एआर-१५ जप्त करण्यात आली असून पोलीस सध्या या हल्ला मागील कारण शोधत आहे.
निकोलस क्रुझ असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थांचे नाव असून पार्कलँडमधील मार्जोरी स्टोनमॅन डगलर हायस्कूल या माध्यमिक शाळेचा तो माजी विद्यार्थी आहे. काल दुपारी २.३० वाजता निकोलस हा आपल्या या शाळेच्या आवरात आला होता. यावेळी त्याच्या हातामध्ये असलेले बंदूक पाहून सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना ठार केले व शाळेच्या आवारात असलेल्या इतर विद्यार्थी आणि शिक्षकांवर देखील त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराचा आवाज ऐकून शाळेमध्ये मोठा गदारोळ उडाला. याच दरम्यान त्याने शाळेच्या मुख्य इमारतीत प्रवेश करत तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांवर गोळीबार केला. यानंतर थोड्या वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाळेला चारी बाजूने घेराव टाकला. परंतु शाळेमध्ये असलेल्या शांततेमुळे पोलीस थोडावेळ बुचकळ्यात पडले. यानंतर शाळेत शोध घेतला असता निकोलस हा एका वर्गामध्ये बसलेला त्यांना आढळून आला व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.




या गोळीबारामध्ये एकूण १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२ नागरिक हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच काही शिक्षकांचा देखील समावेश आहे. दरम्यान निकोलसने हा हल्ला का केला ? याबाबतचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र निकोलसने हा मानसिक असंतुलनामुळे केला असल्याचा प्रथामिक अंदाज काही जणांकडून व्यक्त केला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@