जगातला एकमेव ऑर्गन निर्माता
 महा एमटीबी  15-Feb-2018

  

 
 
 

आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि उद्योगशीलतेच्या जोरावर बाळा दाते यांनी संगीतक्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. आश्चर्य वाटेल, पण बाळा दाते हे आज जगातले एकमेव ऑर्गननिर्माते आहेत.

 
 
नाट्यसंगीत ही मराठी माणसांची विशेष आवडीची गोष्ट. नाट्यसंगीताची गोडी वाढविण्यात मोठा वाटा कशाचा असेल तर त्याच्या साथीसाठी वापरलं जाणारं ‘ऑर्गन’ हे वाद्य. १९व्या शतकात युरोपीय देशांमधून भारतात आलेलं आणि मराठी संगीत रंगभूमीचा अविभाज्य भाग बनलेलं हे वाद्य भारतात कुठेही बनवलं जात नव्हतं. मात्र, रत्नागिरीच्या आडिवरे नावाच्या छोट्याशा गावातल्या एका माणसाने अतिशय गुंतागुंतीची रचना असलेल्या या वाद्याच्या निर्मितीचं तंत्र शिकून हे वाद्य बनवायचा कारखाना काढला. या नवनिर्मितीशील माणसाचं नाव आहे उमाशंकर ऊर्फ बाळा दाते. आश्चर्य वाटेल, पण बाळा दाते हे आज जगातले एकमेव ऑर्गननिर्माते आहेत.

१९९४ सालापर्यंत संगीताशी फारसा काही संबंध नसलेले बाळा दाते एका भजनाच्या कार्यक्रमाने भारावून गेले आणि त्यांनी सर्वप्रथम संगीत शिकण्याचा ध्यास घेतला. पाच वर्षे मेहनत घेऊन १९९९ साली ते आकाशवाणीची संगीत परीक्षा पास झाले. त्यानंतर त्यांना ध्यास लागला ऑर्गन निर्मितीचा. भारतातल्या सगळ्या वाद्यनिर्मात्यांकडे जाऊन त्यांनी ऑर्गन कुठे बनतो का? याची चौकशी केली, पण ‘ऑर्गन’ हे वाद्य भारतात आणि परदेशात कुठेही बनत नसल्याचं त्यांना कळलं. खूप धडपड केल्यानंतर त्यांना मुंबईत एका ठिकाणी ऑर्गनचा साऊंड बॉक्स’ मिळाला. ऑर्गनमध्ये धातूच्या छोट्या छोट्या पट्ट्या असतात, ज्यांना रीड’ म्हणतात. या रीड्‌सचं उत्पादनही जगात कुठे होत नाही. बाळा दाते यांना सुदैवाने अमेरिकेतल्या त्यांच्या मित्राकरवी जुन्या ५० रीड्‌स मिळाल्या आणि या साधनांचा वापर करून त्यांनी २०१३ साली भारतातला पहिला ऑर्गन बनवला. हा ऑर्गन त्यांनी संगीतक्षेत्रातल्या जाणकारांना दाखवला. त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाल्यावर २०१४ साली ‘बाळा ऑर्गन ऍण्ड म्युझिकल्स’ नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. या वाद्याला नवसंजीवनी दिल्याबद्दल संगीत क्षेत्रातल्या तमाम गायक-वादकांकडून त्यांचं कौतुक होत आहे.

दरवर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा ऑर्गनचा स्टॉल असतो. ‘कट्यार काळजात घुसली’ या गाजलेल्या चित्रपटात बाळा दाते यांच्याकडील ऑर्गन वापरला गेला आहे. बाळा दातेंची स्वदेशी ऑर्गन निर्मिती हे ‘मेक इन इंडिया’चं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या या उद्योगात गावातल्याच पाच माणसांना रोजगार मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी एकूण ७५ ऑर्गन्स बनवले आहेत. दातेंच्या या ऑर्गन्सना परदेशातूनही मागणी आहे. उद्योजकाला इनोव्हेटिव्ह’ राहावं लागतं. बाळा दातेंनी खूप संशोधन करून कमी वजनाचा ऑर्गन, इलेक्ट्रिक मोटारवर चालणारा ऑर्गन असे ऑर्गनचे वेगवेगळे प्रकार बनवले आहेत. परदेशातून आयात कराव्या लागणार्‍या धातूच्या पट्ट्या (रीड्‌स) याही येथेच बनविण्यावर त्यांचं संशोधन चालू आहे. विशेष म्हणजे ते स्वत: उत्तम ऑर्गन वाजवतातही. त्यांना सुधीर फडके पुरस्कार, म्युझिक फोरमचा वाद्यनिर्मितीचा पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. सर्जनशीलतेच्या आणि अखंड मेहनतीच्या जोरावर माणूस कुठून कुठे पोहोचू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाळा दाते.

हर्षद तुळपुळे