आजीबाईंचा अनोखा बटवा...
 महा एमटीबी  14-Feb-2018


 

 
 
 
 
काही लोक संकटावर मात करून आयुष्यात पुढे जातात तर काही लोक ही संकटं दुसर्‍याच्या वाट्याला येऊ नये म्हणून झटतात. सुभासिनी आजी दुसर्‍यांच्या आयुष्यात संकट येऊ नये म्हणून झटल्या.

आपल्याकडेआजीबाईचा बटवाम्हणून घरगुती उपचार प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये एक आजीबाई आहेत. त्यांच्या बटव्यातून तर चक्क एक रुग्णालयच निघालं. सुभासिनी मिस्त्री असे त्या आजींचं नाव. मूळच्या बंगालच्या सुभासिनी यांना वयाच्या २३व्या वर्षी वैधव्य आले. सुभासिनी मिस्त्री यांच्या पदरात त्यावेळी चार मुले होती. सधन चंद्र मिस्त्री हे त्यांचे पती. उपचारांअभावी त्यांचा मृत्यू ओढवला आणि ही घटना सुभासिनी यांच्या मनात खोलवर रुतली आणि जे दुःख आपल्या वाट्याला आले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी गरीब गरजूंसाठी एक रुग्णालय उभारण्याचा निश्चय केला. सुभासिनी यांनी आपल्या पतीचाच भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू ठेवला. पैसेही मोजता येणारी बाई रुग्णालय कसे काय उभारणार? असे विचारुन लोक सुभासिनी यांना, त्यांच्या निश्चयाला कमी लेखत. पण, सुभासिनी या कडव्या बोलांना बधल्या नाहीत किंवा मागेही हटल्या नाहीत. रस्ता कठीण होता, मात्र त्यांचं ध्येय दृढ होतं.

 

खरं तर रुग्णालयाचा पाया त्यांनी आपल्या घरातच घातला. एका डॉक्टरला दर आठवड्याला त्यांनी बोलावून गरीब रुग्णांना सेवा देण्यास विनंती केली. ती विनंती त्या डॉक्टरने मान्यही केली. तब्बल वीस वर्षं पैसे गोळा करून त्यांनी १० हजार रुपये जमवले आणि १९९२ साली आपल्या गावी एक एकर जमीन खरेदी केली. लाऊडस्पीकरवर घोषणा करून गरिबांना या दवाखान्याची माहिती दिली गेली. शहरातील डॉक्टरांना मोफत सेवा देण्यास विनंती केली गेली. पहिल्याच दिवशी २५२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. सुभासिनी यांचा मोठा मुलगा अजोय याने लहानपणापासून आपल्या आईला या एका स्वप्नासाठी राबताना पाहिले. अजोयने आईचे स्वप्न पूर्ण करण्याचे शिवधनुष्य उचलले. अजोयने वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश चाचणी पूर्ण केली. पण प्रश्न होता महाविद्यालयीन शुल्काचा. जर्मन शिष्यवृत्ती मिळवण्यात अजोय यशस्वी झाला आणि कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयात त्याने प्रवेश मिळवला. आपली आई गरिबांसाठी जिवाचे रान करतेय, हे लक्षात ठेवून अजोयने मन लावून अभ्यास केला आणि तो डॉक्टर झाला. आपल्या महाविद्यालयीन मित्रांना अजोयने ही रुग्णालयाची संकल्पना सांगितली. अजोयने ८० हजार रुपयांचा निधी गोळा केला आणिह्यूमॅनिटी रुग्णालयाचा पाया रचला. रुग्णालयाच्या विश्वस्तांनी एका वर्षात रुग्णालय बांधण्याइतपत निधी गोळा केला. चांगल्या कामाला कोणी मदत करत नाही, अशी ओरड केली जाते, पण सुरुवात केली तर हजारो हात तुमच्या साथीला येतात, हे अजोय मिस्त्री यांनी दाखवून दिले.

 

२००९ मध्ये सुंदरबन येथे नैसर्गिक आपत्तीत मिस्त्री यांच्या रुग्णालयाने उत्कृष्ट असे कार्य केले. संतीगची या दुर्गमभागात मिस्त्री यांनी गरीब रुग्णांसाठी काम केले. संतीगचीमध्ये रुग्णालयाची गरज होतीच. लहिरीपूर ग्रामपंचायतीचे उपप्रधान चिरंजीब मोंडल आणि त्यांच्या मातोश्री करुणा मोंडल यांनी काही एकर जमीन मिस्त्री यांच्या संस्थेला दान केली. अजोय मिस्त्री यांनी तेथे बांबूच्या साहाय्याने एक छोटेखानी दवाखाना सुरू केला. सुंदरबनमध्ये सुरू केलेल्या रुग्णालयात २० खाटा आहेत. सोनोग्राफी, एक्स रे सारख्या सुविधा आहेत. तसेच आता या रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांना राहण्यासाठी निवासी संकुल उभारण्याचे कार्य सुरु आहे. सुभासिनी यांचे हे अनमोल कार्य पाहून भारत सरकारने त्यांना या वर्षीचापद्मश्रीप्रदान केला. संकटं सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. काही लोक संकटावर मात करून आयुष्यात पुढे जातात, तर काही लोक ही संकटं दुसर्‍याच्या वाट्याला येऊ नये म्हणून झटतात. सुभासिनी आजी दुसर्‍यांच्या आयुष्यात संकट येऊ नये म्हणून झटल्या. त्यांच्या या कार्याला सलाम!