ताज महालचे दर्शन होणार 'महाग'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2018
Total Views |

ताज महालच्या संवर्धनासाठी सांस्कृतिक मंत्रालयाचा नवा निर्णय





नवी दिल्ली :
देशासह जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ताज महाल या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन आता महाग होणार आहेत. यापुढे ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना ५० रुपये तर विदेशी नागरिकांना १ हजार २५० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. तसेच यामागील मूळ हेतू हा ताज महालचे संवर्धन करणे हा असल्याचे स्पष्टीकरण देखील शर्मा यांनी दिले आहे.
 
 
ताज महाल हे भारतीय संस्कृतीचे एक अत्यंत मोठे प्रतिक आहे. त्यामुळे याचे जतन आणि संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ताज महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली असल्याची ते म्हणाले. यासाठीच म्हणून यापुढे ताज महाल पाहण्यासाठी येणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी तिकीट दर ५० रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी हा तिकिट दर १ हजार २५० रुपये इतका करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे. तसेच या पैशांचे दोन भाग करण्यात येणार असून यातील एक भाग हा ताज संवर्धन समितीकडे तर दुसरा भाग हा देशातील विविध पर्यटन स्थळांच्या संवर्धनासाठी म्हणून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
 
याच बरोबर ताज महालच्या आतील भागामध्ये जाण्यासाठी देखील यापुढे २०० रुपये वेगळे मोजावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताजच्या अंतर्गत भागामध्ये जाण्यासाठी एकच द्वार असल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. तसेच या भागाचे ऐतिहासिक महत्त्व देखील अधिक असल्यामुळे या भागाचे देखील संवर्धन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे यातील गर्दी कमी करण्यासाठी तसेच स्थळाच्या संवर्धनाचे गांभीर्य जपणाऱ्या पर्यटकांनाच आतमध्ये प्रवेश मिळावा यासाठी म्हणून २०० रुपयांचे अतिरिक्त स्टेट तिकिट देखील सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हा नियम येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@