काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची विशेष मोहीम
 महा एमटीबी  13-Feb-2018

करणनगरसह काही भागात दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु
श्रीनगर : सुंजवान येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्लानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने विशेष शोधमोहीम सुरु केली असून काश्मीरमधील काही भागांमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक देखील सुरु झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील करणनगर आणि रायपुर येथे काही दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेराव टाकला असून दहशतवाद्यांबरोबर भारतीय लष्कराची चकमक सुरु आहे. यामध्ये करण नगर येथे दोन दहशतवादी लपून बसले असून लष्कराची कारवाई शेवटच्या टप्प्यात आली असल्याची माहिती लष्कराचे अधिकारी स्वयम प्रकाश पानी यांनी दिली आहे. तर रायपूर येथे सुरू असलेल्या चकमकीविषयी जास्त माहिती असून देखील, समोर आलेली नाही.

याच बरोबर काश्मीर खोऱ्यात देखील अनेक ठिकाणी भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत. अनेक संशयित ठिकाणी भारतीय लष्कराकडून घेराव टाकण्यात आला असून त्याठिकाणी दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. 'काश्मीरमधील सार्वजनिक आणि वयक्तिक मालमत्तेचे कसल्याही प्रकारची नुकसान न करता या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात असून देशविरोधी कृत्य करू पाहणाऱ्या सर्व दहशतवाद्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सीआरपीएफचे अधिकारी झुल्फकार हसन यांनी दिली आहे.