मोर्णा स्वच्छतेसाठी अकोलकरांची 'गंगाजळी'
 महा एमटीबी  13-Feb-2018


अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला अकोलकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नदी स्वच्छतेबरोबरचा नदीकाठी विविध विकास कामांसाठी श्रमदानासोबतच आता आर्थिक मदतीचा ओघ देखील सुरू झाला असून नदी स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी नागरिकांकडून आतापर्यंत रुपये ५८ हजार ५०० रुपयांपर्यंत देणगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली आहे. त्यामुळे मोहीममध्ये कार्य करणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये एक नवीन हुरूप येऊ लागला आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज (१२ फेब्रु.) तीन दानशूर व्यक्तींकडून मोर्णा नदीच्या सुशोभीकरणासाठी मदत निधीचा स्वीकारला केला. यात भावसार महिला मंडळ, अकोला यांनी २ हजार ५०० रुपयांची मदत केली. तर अकोल्यातील मुळचे रहिवासी असलेले परंतु सध्या हैद्राबाद येथे नोकरी करत असलेले शुभम तायडे यांनी २५ हजार रूपये तसेच डॉ. नानासाहेब चौधरी यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच या अगोदरच उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या वाढदिवसानिमीत्य खडसे यांच्या मातोश्री कमलाबाई महादेवराव खडसे यांनी देखील मोर्णा स्वच्छतेसाठी २० हजार रूपयांचा मदत दिली होती.
शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला १३ जानेवारीपासून प्रारंभ झाला. शहरातील नागरिकांकडून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक शनिवारी नागरिक मोर्णा नदीच्या काठी जमा होत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोर्णाची दखल घेतल्यानंतर हे अभियान आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने अकोलेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला आहे.