समाजाने जुनी ओझी उतरवून भविष्याकडे बघावे : माधव भांडारी
 महा एमटीबी  13-Feb-2018

‘जीवनगौरव’ व ‘उद्यमकौस्तुभ’ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

 

 
 
 
 
नाशिक : ’’आपले राज्य सुरळीत चालावे याकरिता ब्रिटिशांनी ब्राह्मण समाजाचे खच्चीकरण केले, तसेच अन्य समाजात भांडणे लावली आहेत व त्यास तत्कालीन सर्व समाज बळी पडला आहे. मात्र, आता आपण ही जुनी ओझी उतरवून भविष्याकडे वाटचाल करावी,’’ असे प्रतिपादन भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले आहे. ते ’ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’ अर्थात (बी.बी.एन.जी.) च्या राष्ट्रीय परिषदेत पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
 
यावेळी त्यांनी सांगितले की, ’’तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या नोकर्‍या यापुढे कमी होत जाणार आहे. ही जरी परिस्थिती असली तरी यातून मार्ग काढण्यासाठी स्वयंरोजगार हाच राजमार्ग ठरणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त दहा वर्ष ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री होते. पण, राजकीय नेतृत्व अधिक काळ न मिळाल्याने फारसे काही बिघडत नाही. ब्राह्मण समाजाने उद्योगक्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन करावे. ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नसून स्वतः व पर्यायाने समाजाची प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करावे,’’ असा सल्ला भांडारी यांनी यावेळी दिला.
 
परिषदेच्या शेवटच्या सत्रात प्रतिष्ठेचा ’जीवनगौरव’ व ’उद्यम कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, प्रदीप पेशकार, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते तर परिषद यशस्वी करण्यासाठी मधुरा कुंभेजकर, रोहन कुलकर्णी, महेश देशपांडे, समीर मुळे, यशवंत वेसीकर, सलील केळकर, दिनेश शर्मा, अविनाश शुक्ल, रोहित कावळे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
पुरस्कारप्राप्त मान्यवर
  
भारत- इस्रायल संबंधाचे जनक ९२ वर्षीय एन.बी.एच. कुलकर्णी यांना देण्यात आला, तर ’उद्यम कौस्तुभ’ पुरस्कार पुण्याचे प्रख्यात कंपनी सेक्रेटरी मकरंद जोशी, ‘फाय’ फाऊंडेशन पुरस्काराने गौरविलेले नाशिकचे उद्योजक नितीन केळकर, औरंगाबादचे शासकीय कंत्राटदार विवेक देशपांडे, भारतीय म्हशीचे वाण विकसित करून शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारे चितळे उद्योग समूहाचे विश्वास चितळे व उद्योजकता विकास क्षेत्रात काम करणारी पुण्याची सामाजिक संस्था ‘दे आसरा’ व राजेंद्र बेडेकर यांना देण्यात आले.