बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसची रक्कम पगारातून कापणार नाही
 महा एमटीबी  13-Feb-2018

बेस्ट प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना दिलासा

 
 
 
 
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला दिवाळी बोनससाठी पालिकेने मदत केली होती. मदत करताना पालिकेने काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्या सुधारणा करा अन्यथा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या रक्कम पगारातून वसूल केली जाईल असा इशारा दिला होता. त्यामुळे कर्मचारी नाराज होते. आजच्या बेस्टच्या बैठकीत पालिकेच्या निर्णयावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाने अखेर बोनससाठी ५०० रुपये पगारातून कापण्याचा निर्णय मागे घेतला.
 
दिवसेंदिवस बेस्टची बेस्टच्या आर्थिक तोट्यात भर पडत आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नव्हता. त्यामुळे दिवाळी बोनससाठी पालिकेने मदत करावी, अशी मागणी बेस्टने केली. अनेक बैठका पार पडल्यानंतर पालिकेने २५ कोटी रुपयांची मदत दिली परंतु त्यासाठी सुधारणा करण्याची अटही घातली होती. परंतु बेस्टने आपल्या कामात सुधारणा न केल्याचे सांगत ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते.
 
बेस्ट कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रुपये बोनस दिला गेला होता. त्याबदल्यात त्यांच्या पगारातून दरमहा ५०० रुपये कपात केले जाणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
 
भाजपाचे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी याबाबत सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. बेस्टला कुठलीही मदत करायची नाही, असे पालिकेचे मत झाले आहे. पालिकेचा हा कारभार बघा आणि थंड बसा अशीच अवस्था आपल्या सर्वांची झाल्याचे गणाचार्य यावेळी म्हणाले. बोनसची रक्कम पगारातून कापण्याच्या निर्णयावर सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महाव्यवस्थापकांनी बोनसची रक्कम पगारातून कापली जाणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
 
 
बेस्टचे कामगार पेंग्विन असते तर बरे
पेंग्विनला राहण्यासाठी पालिका प्रशासन वातानुकूलित जागा देते, पेंग्विनवर कोट्यवधी रुपये करते , परंतु बेस्ट कर्मचाऱ्यांना द्यायला पालिकेकडे २१ कोटी नाहीत ही शोकांतिका असल्याचे म्हणत बेस्टचे कामगार पेंग्विन असते तर बरे झाले असते असेच म्हणले पाहिजे.
 
 
सुनील गणाचार्य , भाजपचे बेस्ट समितीचे सदस्य
बेस्ट ४५० खाजगी बस भाड्याने घेणार 
 
बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अखेर आज बेस्ट उपक्रमात ४५० खाजगी कंत्राटदारांमार्फत बस चालवण्याच्या प्रस्तावास सर्व पक्षीय सदस्यांनी मंजुरी दिली. यापुढे बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांना १० तारखेच्या आत आपला पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या बेस्ट प्रशासनाकडून खाजगीकरणाच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या मार्फत एकूण ४५० बसगाड्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये २०० वातानुकूलित मिनी बसगाड्या, २०० मिनी बिगरवातानुकूलित व ५० मिडी बिगरवातानुकूलित बसगाड्यांची समावेश आहे. या बसगाड्या सात वर्षांच्या कंत्राटावर घेण्यात येणार असून यामध्ये सदर बसगाडी व त्यावरील बस चालक हा त्या कंत्राटदाराचा राहणार आहे तर बसवाहक हा बेस्ट उपकरणाचा कर्मचारी असणार आहे. सदर बसगाडीची देखभाल व इंधन खर्च कंत्राटदार करणार असून यासाठी एकूण सात वर्षांसाठी ६०० कोटींची रक्कम बेस्ट सदर कंत्राटदाराला देणार आहे .
 
 
१५ फेब्रुवारीपासून बंदचे आवाहन
 
आजच्या बेस्ट समितीच्या सभेत आज ४५० बस खाजगी करण्याच्या माध्यमातून चालविण्याच्या प्रस्तावास सर्वपक्षीय सदस्यांनी संमती दिली.यामुळे येत्या काही महिन्यात मुबईकरांसाठी खाजगी सेवा उपलबध केली जाणार आहे. हा अस्तित्वाचा लढा सुरु असून दि. १५ फेब्रुवारीपासून बेस्ट कामगारांनी स्वतःहून बंद पाळावा असे आवाहन बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केले आहे.