पंतप्रधान उज्ज्वला योजना फसवी : चित्रा वाघ
 महा एमटीबी  13-Feb-2018

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची टीका

 
 
 
 
मुंबई : पंतप्रधान उज्ज्वला योजना ही फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महिला उपाध्यक्षा सोनल पेडणेकर, डॉ.भारती पवार, प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते. दरम्यान, ही योजना सामान्यांना परवडत नसल्याने त्यांना पुन्हा चुलीकडेच वळावे लागले असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
 
केंद्र सरकार रोज नवनव्या घोषणा करत आहे. मात्र, त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोपही वाघ यांनी यावेळी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने काही जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला असून त्याची चित्रफितदेखील सादर करण्यात आली. चुली म्हणजे रोगांना निमंत्रण असे सांगत महिलांना उज्ज्वला योजना परवडत नसल्याने त्यांना पुन्हा चुलीकडेच वळावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या.
 

गॅस जोडणीसाठी मोठ्या रकमेची मागणी
 
ज्यांच्याकडे गॅस जोडणी आहे त्यांना रेशनच्या दुकानांवर रॉकेल मिळत नसल्याचे वाघ म्हणाल्या. तसेच अनेक ठिकाणी गॅस जोडण्यांसाठी मोठ्या रकमेचीदेखील मागणी होत असून लोकांच्या जबरदस्तीने ही योजना थोपण्यात येत असल्याची टीका वाघ यांनी केला. दरम्यान, या योजनेचा लाभ लोकांना झाला नसून याविरोधात आपण आंदोलन छेडणार असल्याचेही त्या म्हणाल्या.