जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पाकिस्तानला धडा शिकवू - संरक्षण मंत्री
 महा एमटीबी  13-Feb-2018

 
जम्मू : संजुवन येथील लष्कराच्या तालावर झालेल्या हल्ल्यात ज्या शूर सैनिकांचे बलिदान गेले आहे, ते व्यर्थ जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. सोमवार दि १२ फेब्रुवारी रोजी या हल्ल्यात जखमी झालेल्यांना, तसेच हुतात्मांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या गेल्या होत्या.
 
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचे पुरावे पाकिस्तानला वेळोवेळी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा दहशतवाद सीमेपलीकडून होत असतो, हे अनेकवेळेला सिद्ध देखील झाले आहे. पाकिस्तानला या कारवाईबद्दल धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
 
 
 
राष्ट्रीय तपास संस्थेने याबाबत अनेक पुरावे गोळा केले आहेत. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. येथील दहशतवाद्यांना सीमेपलीकडून पोसले जाते, असे पुरावे आमच्याकडे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
 
या हल्ल्यात देखील जवानांच्या सतर्कतेमुळे तसेच तत्परतेमुळे अनेकांचा जीव वाचू शकला. दुर्दैवाने काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे, मात्र त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.