पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार’ पुरस्कार
 महा एमटीबी  13-Feb-2018

आ. माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ सावनाचा पुरस्कार

 

 
 
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आ. माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ’कार्यक्षम आमदार’ पुरस्कार राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना जाहीर झाला आहे.
 
रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता वाचनालयाच्या प. सा. नाट्यमंदिरात आयोजित सोहळ्यात त्यांना पद्मश्री अभय बंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी व सचिव श्रीकांत बेणी यांनी दिली. पुरस्काराचे यंदा पंधरावे वर्ष असून डॉ. शोभा नेर्लीकर आणि डॉ. विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून ’कार्यक्षम आमदार’ पुरस्कार दिला जातो.
 
गिरीश महाजन हे जामनेर मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अवयवदान चळवळीत मोठे काम केले आहे. राजकीय क्षेत्रात विविध जबाबदार्‍या सांभाळून त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपली आहे. पुरस्कार सोहळ्यास नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.