सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर समाजापर्यंत पोहोचण्यासाठीच : वळसंगकर
 महा एमटीबी  13-Feb-2018
 
 
 
 
जळगाव : सामाजिक संस्थांनी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर केला पाहिजे, ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील अनिल वळसंगकर यांनी केले. आशा फौंडेशन आयोजित 'सोशल मीडिया ऑडिट' याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी व माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव स्वप्नील चौधरी उपस्थित होते.
 
वळसंगकर यांनी चर्चासत्राच्या प्रारंभी सहभागी व्यक्तींचा परिचय करुन घेतला व त्यांच्या चर्चासत्रातून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. आपल्या चर्चासत्राची मांडणी करतांना सामाजिक माध्यमांचा वापर व्यक्त होण्यासाठी केला पाहिजे. त्यासाठी मूळ विषयाची मांडणी, ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, त्यासाठी उपलब्ध असलेली माध्यमे, त्यांचे एकीकरण होणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार त्यासाठी इतरांची मदत घेणे अधिक फायद्याचे ठरते असेही ते म्हणाले. सामाजिक माध्यमांमधून व्यक्ती व संस्था दोघांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असते. यासाठी प्रत्येकाने या माध्यमांचा जबाबदारीने, जागरुकतेने विशिष्ट उद्देशाने वापर केला पाहिजे. आपल्या कार्याचा हेतू शुद्ध असल्यास आपण आपल्या साध्यापर्यंत सहज पोहोचू शकतो असेही ते म्हणाले.
 
सामाजिक माध्यमांचा वापर करतांना लोकप्रियतेपेक्षा योग्य माहितीची देवाणघेवाण दीर्घकालीन फायद्याची ठरते. आपापल्या संस्थांचा एक प्रभावी गट तयार करुन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक माध्यमे उपयुक्त ठरतात. त्यासाठी वेळोवेळी संस्थांनी या सामाजिक माध्यमांची उपयुक्तता तपासली पाहिजे, त्यावर आधारित बदलही केले पाहिजे असे ते म्हणाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचाने सामाजिक माध्यमांचा केलेल्या वापराचा ऑडिट रिपोर्ट स्वप्नील चौधरी यांनी उपस्थितांसमोर मांडला. चर्चासत्राचे संचालन गिरीश कुळकर्णी यांनी केले. चर्चासत्रास विविध ९ संस्थांचे १६ प्रतिनिधी उपस्थित होते.