धर्मा पाटील यांना अखेर न्याय
 महा एमटीबी  13-Feb-2018
 
 
मुंबई - मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणारे वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. पाटील यांच्या जमिनीच्या फेरमुल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला असून त्यात ५४ लाखांची रक्कम पाटील कुटुंबियांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
 
सतत प्रयत्न करुन देखील न्याय मिळत नसल्याने धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन केले होते, त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ माजली. मात्र अखेर धर्मा पाटील यांना न्याय मिळाला.
 
मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांच्या नावे २८ लाख ५ हजार ९८४ रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना २६ लाख ४२ हजार १४८ रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर १२ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.
 
मंत्रालयात विष प्राशन केलेले ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा २८ जानेवारीला मृत्यू झाला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले होते. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.