विनाश नको, विकास हवा!
 महा एमटीबी  12-Feb-2018

 

 
 
 
 
 
 
 
 
 साधने वाईट नसतात, साधने वापरणारे हात वाईट प्रवृत्तीचे असतात आणि आज जगासमोर याच घातक प्रवृत्तींचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण, या आव्हानांनाही विज्ञानाधिष्ठित विकासानेच उत्तर देता येईल. भारताने तरतंत्रज्ञानातून विकासहे सूत्र जगसिद्ध केले आहे.
 
 
 
 
 
‘‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर हा मानवी विकासासाठीच व्हावा, तर विनाशासाठी नव्हे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईत केले. हे विधान अनेकार्थी महत्त्वाचे आहेच, कारण, यापूर्वीही याच विकासाची कास धरणार्‍या विज्ञानाचा वेळोवेळी दुरुपयोगही केला गेला. वानगीदाखल, आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने स्फोटकांचा शोध लावला. पण स्फोटकांचा वापर मानवाने विधायक कार्यासाठी व्हावा, हा त्यामागील वैज्ञानिक-विकासाभिमुख दृष्टिकोन. पण, जेव्हा या स्फोटकांचा वापर विकास नव्हे विनाशासाठी होत आहे, हे त्यांना कळले, तेव्हा त्यांच्या मनात दु:खाचाच विस्फोट झाला. ‘एके ४७या बंदुकीचे जनक मिखाईल कलाश्निकोव्हला जेव्हा कळले की, हे शस्त्र दहशतवाद्यांच्या हाती लागले, तेव्हा दुःखाची एक गोळी त्याचेही काळीज चिरुन गेलीच. हे शस्त्र आपण मानवाच्या संरक्षणासाठीच बनवले होते, असे त्याने मरणापूर्वीही सांगितले. पण, आज तेच शस्त्र दहशतवाद्यांच्या हाती लागून निष्पापांचे बळी घेताना आपण पाहतो. याच पठडीत विज्ञानाच्या गैरवापरातून विनाशाचा कळस म्हणजे जपानवर अमेरिकेने टाकलेला अणुबॉम्ब. दुसरे महायुद्ध हे हिरोशिमा आणि नागासाकीत नरसंहार करून थांबले. अणुबॉम्बने कसा विध्वंस, महाविनाश होऊ शकतो, ते अवघ्या जगाने या घटनेमुळे पाहिले. पण, त्यानंतरही देशांमध्ये वादांच्या ठिणग्या पडत राहिल्या आणि अणुबॉम्बची निर्मिती करुन शत्रूवर वचक ठेवण्याची स्पर्धी वाढीस लागली. त्यातच किमजाँग ऊन या उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने अमेरिकेवर अणुबॉम्ब हल्ल्याची दर्पोक्तीही वेळोवेळी केली. पाकिस्तानसुद्धा भारताला अणुबॉम्बची धमकी देतच असतो. त्यामुळे प्रश्न असा आहे की, तंत्रज्ञानाचा वापर हा मानवाच्या विकासासाठीच झाला पाहिजे की नाही? तर याचे उत्तर हे निःसंशयहोअसेच आहे, पण ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. तंत्रज्ञान हे दुधारी तलवार आहे. याचा वापर निर्मात्याच्याही विरोधात जाऊ शकतो. ज्या देशात मोदींनी हे वक्तव्य केले, त्यामुळे या वक्तव्याला वेगळे परिमाण आहे. सौदी अरेबिया देशात महिलांची अवस्था ही जगजाहीर आहे. या देशाने सोफिया नावाच्या रोबोला नागरिकत्व बहाल केले. तसेच भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानांनीही असे वक्तव्य करणे नैसर्गिक आहे. त्याचे कारण असे की, भारतीय सैन्य हे सर्वात कमी उपद्रव करणारे सैन्य आहे. जेव्हा जेव्हा भारताबरोबर शत्रूराष्ट्राने युद्ध छेडले, तेव्हा भारताने फक्त तिथला भूभाग काबीज केला. तो भूभागही त्या त्या देशांना भारताने परत केला. तिथल्या नागरिकांचे त्यांनी कधीच हाल केले नाही अथवा त्यांच्यावर अत्याचार केले नाही.
 
 
 
मोदी म्हणाले की ‘‘आजही जगात गरिबी, कुपोषण यासारखे प्रश्न वासून उभे आहेत आणि आपण क्षेपणास्त्रे आणि विध्वंसक गोष्टींवर अमाप खर्च करत आहोत.’’ दहशतवादाचे माहेरघर असलेल्या पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचा साठा आहे. पण, हाच देश आज तितक्याच गरिबी, बेकारी आणि नागरी समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. म्हणजे, ज्या देशात लोकांना खायला पुरेसे अन्न नाही, आज त्या देशानेही अण्वस्त्रे विकसित केली आणि ही बाब जागतिक शांततेसाठी अत्यंत धोकादायक आहे. इस्लामिक राष्ट्रांच्या संरक्षणासाठी हा अणुबॉम्ब आहे, असे सांगून पाकिस्तानने सौदी अरेबियासारख्या अनेक इस्लामी राष्ट्रांकडून आर्थिक रसद मिळवली. त्यात भर घातली चीनसारख्या राष्ट्राने. ‘शत्रूचा शत्रू आपला मित्रया न्यायाने चीनने पाकिस्तानला सर्वतोपरी मदत केली. ज्या देशांकडे अण्वस्त्र आहेत ते देश एक जबाबदार देश म्हणून ओळखले जातात. पण पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे. जर हे अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हाती पडले तर ते संपूर्ण जगाच्या मुळावर उठतील. पाकिस्तानी दहशतवाद्यांनीसीपेकचे काम उध्वस्त करण्यास मागेपुढे पाहिले नाही, त्यामुळे आगामी काळात अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडली तर कशावरुन ते चीनकडे डोळे विस्फारणार नाहीत? तसेच, ज्या लादेनने अमेरिकेवर हल्ला केला, त्याच लादेनला अमेरिकेने पोसले होते, ही बाब विसरुन चालणार नाही.
 
 

इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या केंद्रस्थानी तेलाच्या राजकारणाचा मुद्दा तर आहेच. कारण, मध्य पूर्वेकडील देशांत तेलाचे स्रोत मोठ्या प्रमाणावर आहेत. अमेरिकेची तेलाची भूक ही जगजाहीर आहे. युरोपीय देशांनाही तेल मोठ्या प्रमाणावर लागतं. मग त्यांनीही इस्रायलला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. याच इस्रायलने पुढे स्वतंत्र देश स्थापन करुन विस्तारवादी धोरण राबवत पॅलेस्टाईनचा भूभाग बळकावला. हे अरब देशांना पचले नाही आणि त्यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेण्यास सुरुवात केली. इस्रायल हा देश ज्यूंचा आहे आणि अमेरिकेत ज्यू मोठ्या संख्येने आहेत. एक मोठा ज्यूंचा गट इस्रायलला शस्त्रसाठा पुरवत होता. इस्रायलनेही नंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मितीला चालना दिली. शस्त्रास्त्रे निर्यात करणार्‍या देशांपैकी आज इस्रायल हा एक अग्रेसर देश आहे. तेव्हा, या सगळ्या जागतिक घटना विचारात घेताना एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानात घेतलीच पाहिजे की, मानवाने तंत्रज्ञान जन्माला घातले आहे, तंत्रज्ञानाने मानवाला नाही. आणि जर हे तंत्रज्ञानच मानवाला चालवत असेल तर मानवी मूल्य ही धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 
 
अण्वस्त्रांमुळे देश समृद्धही होतो आणि त्याचा दुरूपयोग करून तो अगदी रसातळासही जाऊ शकतो. आपला देश समृद्ध करायचा आहे की विनाशाकडे न्यायचा, हे नेत्यांनी ठरवायचे आहे. ड्रोनच्या तंत्रज्ञानामुळे बॉम्बहल्लेही घडवून आणता येतात आणि खाद्यपदार्थ ग्राहकांच्या दारीही पोहोचतात. त्यामुळे या सगळ्यात मानवी हित केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. मानवी हिताची नव्याने व्याख्या करणे ही आता काळाची गरज म्हणावी लागेल. दहशतवाद हा फक्त माणुसकीच्या विरोधात आहे. तो कुठल्याही देशाच्या, धर्माच्या विरोधात नाही. दहशतवादामुळे निर्दोष मुस्लीमही मारले जातात. मरणार्‍यांचा आणि मारणार्‍यांचा कुठलाच धर्म नसतो. आज ज्या तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे त्याच तंत्रज्ञानाला धरूनइसिससारख्या संघटना तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अशा या अनिर्बंध समाजमाध्यमांवर योग्य अंकुश हवा, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली होती.
 
 
 
एकूणच काय तर साधने वाईट नसतात, साधने वापरणारे हात वाईट प्रवृत्तीचे असतात आणि आज जगासमोर याच घातक प्रवृत्तींचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण, या आव्हानांनाही विज्ञानाधिष्ठित विकासानेच उत्तर देता येईल. भारताने तरतंत्रज्ञानातून विकासहे सूत्र जगसिद्ध केले आहे. गेल्या काही महिन्यांतीलइस्रोची कामगिरी ही याच सूत्राची द्योतक म्हणावी लागेल. २१व्या शतकात विकसित तंत्रज्ञानामुळे देश आंतरराष्ट्रीय पटलावर आपली मोहोर उमटवू शकतात. त्यामुळे संशोधनाला सर्वच स्तरांवर प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शिक्षणात जास्तीत जास्त आधुनिकता आणि वैज्ञानिक मूल्ये जोपासणे गरजेचे आहे. आपल्या संविधानात तशी तरतूदही केलेली आहे. त्याची फक्त योग्य अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे.