हिंसाचार आणि डाव्यांचे जन्मजन्मांतराचे नाते - अमित शाह
 महा एमटीबी  12-Feb-2018

 
आगरताळा : हिंसाचार आणि डावे पक्ष यांचे जन्मजन्मांतराचे नाते आहे, असे परखड मत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मांडले. त्रिपुरा येथे होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते एका संवाद कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही त्यांच्या दहशतवादाला घाबरणार नाही, त्रिपुराची जनता आमच्या सोबत आहे, तेथे परिवर्तन निश्चित आहे.
 
 
 
देशभरात जेथे जेथे डाव्या पक्षांची सत्ता आहे, त्या प्रत्येक ठिकाणी हिंसाचाराचे थैमान आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर त्रिपुरा येथे जनता भाजपला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १८ फेब्रुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जनता भाजपला मतदान करेल, अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
३ मार्च रोजी या निवडणुकांचा निकाल आहे. त्याला लक्षात घेऊन भाजपने तेथील जनतेला आश्वासन दिले की, ३ मार्चला सत्ता परिवर्तन झाल्यास ४ मार्च पासून ७ वे वित्तआयोग लागू केले जाईल. २५ वर्षाच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण त्रिपुरामध्ये ७ लाख नागरिक बेरोजगार असल्याची आकडेवारी शाह यांनी मांडली.
 
 
 
भाजप सरकार आल्यास शिक्षण तसेच रोजगार याविषयावर काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक महाविद्यालय स्थापन केले जाईल. मुलींना बालवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण दिली जाण्याची योजना आणली जाईल.