अशी नाती अशा गोष्टी
 महा एमटीबी  12-Feb-2018
सुप्रभात मंडळी,

मी डॉ. अनुपमा माढेकर आजपासून एक नवीन लेखमाला घेऊन येत आहे. साधारणतः जगत असताना आजूबाजूच्या समाजात वावरत असताना आपल्याला अनेकविध अनुभव येत असतात. काही सुखद, तर काही दु:खद, काही हास्यास्पद तर काही रडवणारे.

अश्या अनुभवांनी आपलं आयुष्य संपन्न होत असतं. हे असे कडू-गोड अनुभवच पुढे आपल्या आयुष्याची शिदोरी बनतात. म्हणून तर वयस्कर माणसे मी तुझ्यापेक्षा दहा - पंधरा पावसाळे जास्त पाहिलेत असं हक्कानं म्हणतात. पण काही अनुभव मात्र अविस्मरणीय ठरतात, कधी चांगल्या अर्थाने तर कधी वाईट अर्थाने.
असेच अनुभव अचानक, कधीतरी दाटून येतात, कागदावर उतरतात आणि बघता बघता त्यांचा एक लेखच होऊन जातो. असेच काही अनुभव या लेखमालेत गुंफले आहेत. काही एक माणूस म्हणून आलेले, काही एक स्त्री म्हणून आलेले, काही पत्नी, माता, सून, कन्या अशी विविध नाती निभावतांना आलेले, काही स्त्रीरोग प्रसूतितंत्रज्ञ म्हणून काम करताना आलेले, काही शिक्षकी पेशाचा भाग म्हणून आलेले, काही मुद्दाम स्वतः हून घेतलेले एक ना दोन.... असंख्य...
हे अनुभव नुसते येत नाहीत, त्या बहुसंख्य वेळा कोणीतरी व्यक्ती निगडित असते. आणि त्याच्या मूळाशी असतं एक नातं.... कधी आलेला अनुभव नातं समृद्ध करुन टाकतो, तर कधी त्या अनुभवाने नातचं दुभंगत. तर काही वेळा ती सत्वपरीक्षा ठरते, त्या नात्याचीच.


तर ही लेखमाला म्हणजे असेच काही अनुभव, अशीच काही नाती, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या नात्यात, त्या अनुभवात गुंतलेल्या आपणासह अन्य व्यक्ती.


आता हे अनुभव कथन काहीवेळा अगदीच वैयक्तिक ( माझं स्वत: चच फक्त ) असं वाटू शकेल, तर कधी ते जणू तुमचाच अनुभव मी लिहित आहे अशी भावना येईल, तर केव्हातरी अगदीच तटस्थवृत्तीने हे सगळं वाचता येईल, पाहता येईल. या तुमच्या अनुभवात मलाही सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.
मात्र इतर लेखांपेक्षा यात एक वेगळेपण असेल, ते म्हणजे.... प्रसिद्ध झालेल्या लेखावर आपण वाचकांनीही आपले मत, सूचना, अभिप्राय, अनुभव इ. सर्व प्रकारे व्यक्त व्हायचे आहे. त्यातील काही निवडक मतांना व्यक्तीच्या नावासकट प्रसिद्धी दिली जाईल.
चला, मग मंडळी, आमचे काम चालूच आहे, तुमच्यापर्यंत अधिकाधिक उत्तम लिखाण पोचवण्याचे. आता तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि ते म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या ह्या नवीन उपक्रमाची माहिती पोचवा आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवा.
- डॉ. अनुपमा माढेकर