१ लाख २५ हजार मुंबईकरांनी दिली वार्षिक उद्यान प्रदर्शनाला भेट
 महा एमटीबी  12-Feb-2018
 

 
मुंबई : महानगरपालिकेतर्फे राणीच्या बागेत भरविण्यात आलेल्या वार्षिक उद्यान प्रदर्शनामध्ये पाना-फुलांपासून तयार करण्यात आलेले डॉल्फिन, जलपरी, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा, इत्यादींच्या प्रतिकृतींसह कृत्रिम नदी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी एक लाख २५ हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे.
 
मनपाच्या उद्यान खात्याद्वारे दरवर्षी उद्यानविषयक प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनात गेल्या वर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना आणि वृक्षरचना केली जात आहे. दरम्यान, यंदा जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली होती. ’महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५’ मधील तरतुदींनुसार दरवर्षी वृक्ष प्राधिकरण व महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार्‍या फुले, फळे व भाज्या याविषयीच्या वार्षिक प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कुंड्यांमधील शोभिवंत झाडे, पुष्परचना, फुलझाडे, लॅण्डस्केप आर्ट आदी विविध विषयांवरील स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये शासकीय, निमशासकीय यासह खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी भाग घेऊन आपल्या पर्यावरणपूरक कला सादर केल्या. या प्रदर्शनात विविध प्रजातींची दहा हजारांपेक्षा अधिक झाडे ठेवण्यात आली होती.
 

 
 
 
या प्रदर्शनाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या विक्री विभागात ४० दालने उभारण्यात आली होती. या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामविषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
 
जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महानगरपालिका
 
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिली भेट
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच नाट्य-चित्रपटाशी संबंधित असलेल्या कलावंतांनीदेखील या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये प्रामुख्याने अभिनेते ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी, कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे, सुनील पाल इत्यादींचा समावेश होता.