वनवासींचा चिंतामणी हरपला
 महा एमटीबी  11-Feb-2018

 

 
 
 
 
 
 लहानपणापासूनच रा. स्व. संघाचा एकनिष्ठ स्वयंसेवक, संघ कार्यकर्त्यांचा दीर्घ सहवास यातूनच हिंदुत्वावर अतूट श्रद्धा. साहजिकच हिंदुत्ववादी जनसंघ-भाजपच्या कामात सहभाग, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, अध्यक्ष नंतर ३ वेळा खासदार, १ वेळा आमदार. पण राजकारणाचा चिखल या कमळाला कधी स्पर्श करू शकला नाही.
 
 
 
दि ३१ - जानेवारी - बातमी ऐकली - पालघरचे खासदार - चिंतामण वनगा यांचे दुःखद निधन! ऐकून डोळ्यासमोरुन काजवे चमकले. विश्वासच बसेना. कारण की दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ हिंदू सेवा संघाचे कार्यकर्ते आणि -वनगा साहेब विक्रमगड येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी एकत्र होते. त्यांच्या हस्तेच भूमिपूजनाचा कार्यक्रमपार पडला. त्यानिमित्ताने कौशल्यविकास योजना, मुद्रा बँकेचे आर्थिक सहाय्य या संबंधी अनुभवाच्या अनेक घटना त्यांनी आपल्या भाषणांत सांगितल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दोन्ही योजना देशातील बेरोजगार तरुणांच्या कल्याणासाठी एक वरदान आहे, असे त्यांनी गौरवोद्गार काढले. जमलेल्या कार्यकर्त्यांशी अत्यंत मोकळेपणाने गप्पा केल्या आणि कार्यकर्त्यांसमवेत भोजनही घेतले. तो कार्यक्रमअजूनही डोळ्यासमोरून जात नाही.
 
परीसस्पर्श LLB : खा. वनगा तलासरी तालुक्यातील कवाड़ा नावाच्या एका छोट्याशा वनवासी गावात जन्मले. वडलोपार्जित शेतीचा व्यवसाय, शिक्षणाची सोय नाही. रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांमार्फत तलासरी गावात वनवासी कल्याण आश्रमाचे एका छोट्याशा जागेत विद्यार्थी वसतीगृह सुरु झाले होते. खा. वनगा त्या वसतिगृहात दाखल झाले. वसतिगृहाचे प्रमुख होते कल्याणचे भूतपूर्व नगराध्यक्ष माधवराव काणे. फणसासारखा माणूस, शिस्तीने कडक पण मनाने मायाळू. चिंतामण वनगांवर अत्यंत प्रेम. माझा चिंतामण मोठा झाला पाहिजे. वनवासी समाजाचा तारणहार झाला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न. आप्पाजी जोशी त्यांचे दुसरे केअर टेकर, संघ शाखेचे संस्कार आणि माधवराव काणे यांचे मार्गदर्शन यामुळे चिंतामण वनगा अत्यंत शिस्तबद्ध व हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत व वसतिगृहात प्रिय. त्यातूनच त्यांचे नेतृत्वगुण उदयास आले. वसतिगृहात राहून त्यांनी माध्यमिक शिक्षण उत्तमप्रकारे पूर्ण केले. पुढे भिवंडीच्या कॉलेजात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 
 

ऍड. वनगा : वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले, आता पुढे काय? व्यवसाय मार्गदर्शन कोणाचे घ्यायचे? माधवराव काणे यांचे आपल्या पट्टशिष्याकडे पूर्ण लक्ष होतेच. त्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था कल्याणला केली. कल्याणातील प्रसिद्ध वकील श्रीनिवास मोडक (भाऊसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसाय सुरु झाला. भगवानराव जोशी, दादा चोळकर, दामूअण्णा टोकेकर, भाऊ सबनीस, वामनराव साठे आदी मंडळींनी विविध प्रकारची मदत-सहाय्य करून चिंतामण वनगा यांची प्रारंभिक वकिली पूर्ण झाली. आता पुढे काय? वकिली कुठल्या शहरात करायची म्हणजे भरपूर पैसा मिळेल? छे. अजिबात नाही. मी ज्या समाजात जन्मलो त्या गरीब पिडीत समाजाचीच वकिली मी करणार! पैसा नाही मिळाला तरी चालेल! केवढा विशाल दृष्टीकोन, आपल्या समाजाबद्दलचे किती निस्सीमप्रेम! तुलनाच नाही. ठरले, वकिली जव्हारमध्येच करायची! जागा? कल्याणचे प्रा. रामकापसे धावले. त्यांनी आपले वडिलोपार्जित घर वनगांना विनामूल्य विनाअट ऑफिस म्हणून वापरण्यास दिले. याला म्हणतात दुर्बलांबद्दल कणव, प्रेम. झाले. चिंतामण वनगा वनवासी बांधवांचे वकील झाले.

पालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांच्या केसेस ते अत्यंत निष्ठेने व कौशल्याने चालवीत. अशिलांकडून स्वत:हून कधीही पैसे मागितले नाहीत. देतील तेवढे घ्यायचे. नसल्यास अडवणूक नाही.

 

राजकारणात प्रवेश : उच्च शिक्षण घेत असताना, वकिली करत असताना त्यांचे राजकारणाकडे लक्ष होतेच. राजकारणाच्या माध्यमातून समाजाचे भलेही करू शकतो, असा विचार करून राजकारणात लक्ष वेधले, लहानपणापासूनच रा. स्व. संघाचा एकनिष्ठ स्वयंसेवक, संघ कार्यकर्त्यांचा दीर्घ सहवास यातूनच हिंदुत्वावर अतूट श्रद्धा. साहजिकच हिंदुत्ववादी जनसंघ-भाजपच्या कामात सहभाग, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, अध्यक्ष नंतर ३ वेळा खासदार, १ वेळा आमदार. पण राजकारणाचा चिखल या कमळाला कधी स्पर्श करू शकला नाही. ४० वर्षाच्या राजकीय जीवनात एकही गुन्हा नाही. सागरी, डोंगरी व नागरी समस्यांची पूर्ण जाण या राजकीय नेत्याला होती व त्या सोडविण्यासाठी आटोकाट प्रामाणिक प्रयत्न केला. पण प्रसारमाध्यमातून स्वतःच्या प्रसिद्धीची हाव धरली नाही.

पार्श्वभूमी : वर उल्लेख केल्याप्रमाणे एका निर्मळ नेत्याचे जीवन आकारत असताना सभोवतालची सामाजिक व राजकीय स्थिती ही अत्यंत टोकाच्या विरोधाची व प्रतिकूल अशी होती. पण वनगा यांनी न डगमगता, मोठ्या धीराने कौशल्याने व ध्येयनिष्ठेने त्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत यश संपादन केले. ‘नाही रे’कडून ‘आहे रे ‘कडे सामाजिक परिवर्तन घडवून आणणारा हा वनवासी नेता.

 

अखेरची इच्छा : अशा प्रकारे प्रतिकूलतेतून अनुकूलतेत परिसरात सामाजिक परिवर्तन घडवत असताना एक प्रबळ इच्छा त्यांच्या मनात होती. दामूअण्णा टोकेकर, माधवराव काणे यांनी पालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांच्या कल्याणाचे व उत्कर्षाचे जे कामकेले तोच वसा आपण पुढे चालवावा म्हणून त्यांनी २०१४ पासून ’हिंदू सेवा संघ’ या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारले व ते मोठ्या कौशल्याने चालविले. ‘हिंदू सेवा संघा’चे ठाणे, पालघर जिल्ह्यात सध्या ४ केंद्र आहेत. ती संख्या वाढावी, ठाणे, पालघर या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातही ‘हिंदू सेवा संघा’चे कामसुरु व्हावे, याचा सारखा आग्रह धरत त्यांच्याच कारकिर्दीत आतापर्यंत ५ वर्षे वनवासी समाजाचे सामूहिक विवाह सोहळे संपन्न झालेत. ते अधिक संख्येने व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. ‘हिंदू सेवा संघा’च्या कामाबद्दल त्यांना अत्यंत आवड होती. ते नेहमी म्हणत मी प्रथम ‘हिंदु सेवा संघा’चा अध्यक्ष झालो आणि खासदार म्हणून निवडून आलो. कदाचित राजकारणानंतर त्यांनी ‘हिंदू सेवा संघा’च्या कामात पूर्णपणे वाहूनही घेतले असते.

असा हा बहुगुणी नेता अचानक आपल्यातून निघून गेला. अशा या वनवासी दधिची ऋषीस ‘हिंदू सेवा संघा’च्या समस्त कार्यकर्त्यांचे शतशः नमन!

 

अण्णा वाणी 

(लेखक हिंदू सेवा संघाचे उपाध्यक्ष आहेत.)