भाजपवर विश्वास ठेवून जनतेला फायदा नाही : राहुल गांधी
 महा एमटीबी  10-Feb-2018
 
 
 

 
 
कर्नाटक : भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून जनतेला काहीच फायदा होणार नाही असे स्पष्ट मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडले आहे. आज कर्नाटकमध्ये जनतेला संबोधित करतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. नरेंद्र मोदी जनतेला खोटे आश्वासन देतात तसेच ते जनतेला खोटी स्वप्न दाखवितात असा आरोप त्यांनी यावेळी मोदींवर केला आहे. मोदी म्हणाले होते, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार मात्र सरकारने तर अजून खात्यात एक रुपया देखील टाकला नाही असा खुलासा देखील यावेळी राहुल गांधी यांनी केला.
 
 
 
 
दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देतील असे मोदींनी सांगितले होते. मात्र आम्ही संसदेत विचारले असता २४ तासांमध्ये ४५० नागरिकांनाच रोजगार दिला जातो अशी माहिती पुढे आली. कर्नाटकमध्ये आम्ही काम केले असे मोदी म्हणतात, मात्र अजून कामे दिसत नाही? आता कामे कधी करणार असा सवाल यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
 
 
 
जर देश चालवायचा असेल तर भविष्याचा विचार करून देश चालवावा लागतो. मात्र मोदी जिथे जातात तिथे काँग्रेसला चुकीचे ठरवितात त्यामुळे मागचे उगाळत बसाल तर देश कसा काय चालवाल असा खडा सवाल देखील यावेळी राहुल गांधी यांनी मोदींना केला आहे. मोदी संपूर्ण देशात फिरतात आणि सांगतात की मी गुजरातला बदलविले आहे. मात्र खरे गुजरात तेथील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, छोट्या दुकानदारांनी आणि कामगारांनी बदलले आहे अशी माहिती राहुल यांनी यावेळी दिली. 
 
 
 
 
 
मोदी नेहमी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करतात मात्र कर्नाटक सरकारने तर भ्रष्टाचारमध्ये जागतिक विक्रम केला आहे असा आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केला. राफेल करार मोदी सरकारने हिसकावून घेतला आहे असाही आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. टाटा नॅनोला इतकी जमीन दिली मात्र आता ही गाडी निर्माण करणारी कंपनीच बंद झाली. या ऐवजी तरुणांसाठी आणि गरिबांसाठी नवीन योजना केल्या असत्या तर नागरिकांना त्याचा फायदा झाला असता असा सल्लाही राहुल यांनी यावेळी नरेंद्र मोदी सरकराला दिला.