मुलींना ‘प्रिन्सेस’ बनविणारी किमयागार
 महा एमटीबी  01-Feb-2018

’’तुम्ही माझ्याकडे कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीला घेऊन या, मी तिला ४५ मिनिटांत ‘प्रिन्सेस’ बनविते,’’ हे चॅलेंज आहे नाशिकमध्ये गेल्या ३० वर्षांपासून ब्युटीपार्लर चालविणार्‍या सध्या नाशिक मनपाजवळ असलेल्या सुयोजित संकुलात प्रशस्त जागेत काम करणार्‍या वर्षा मनोज सोमय्या यांचे. मेकअप करण्यासाठी महिलांना खूप वेळ लागतो, अशी आपली नेहमीची तक्रार असते. मात्र, आपणाला ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही, असे त्या आवर्जून सांगतात.
२४ डिसेंबर २०१७ रोजी त्यांच्या ब्युटीपार्लरला ३० वर्षे पूर्ण झाली. सध्या मध्यवर्ती प्रशस्त ठिकाणी त्यांचे केंद्र असले तरी ही वाटचाल साधी नव्हती. वर्षाताईंचे माहेर कोपरगावचे. लग्न झाल्यावर त्या मुंबईला गेल्या. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने नंतर त्यांचे कुटुंब नाशिकला स्थायिक झाले. प्रपंचाला हातभार लावावा यासाठी त्यांनी ब्युटीपार्लरचा व्यवसाय १९८६ मध्ये आपल्या माणेकशॉ नगर येथील राहत्या घरी सुरू केला. त्यानंतर नाशिकची सुशिक्षित वस्ती असलेल्या इंदिरानगर भागात १९९६ मध्ये त्यांनी आपले केंद्र हलविले. त्यानंतर १९९९ मध्ये नवीन सध्याच्या जागेत त्यांनी आपले काम सुरू केले. दररोज सुमारे २० जणींचा मेकअप त्या करतात. पूर्वी नाममात्र दरात हे काम केले जाई. आता ग्राहकांची मागणी आणि सुरक्षित दर्जेदार एचडी मेकअप साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे दर वाढले आहेत. पूर्वी हाताने मेकअप केला जाई. आता मात्र केवळ ब्रशचा वापर केला जातो. दिवस बदलले असले तरी आपल्या पूर्वीच्या दिवसांची आठवण असल्याने त्या सामाजिक बांधिलकी जोपासतात.


गरीब मुलींचे नववधूचे मेकअप त्या केवळ एक रुपया नाममात्र शुल्क आकारून करतात. आपणास आश्चर्य वाटेल, पण गेल्या ३० वर्षांत त्यांनी २० ते २५ हजार नववधूंचे मेकअप केलेले आहेत. त्यांनी मेकअपचे शिक्षण सर्वप्रथमनाशिकच्या त्यावेळच्या आघाडीच्या जमिझा ब्युटीपार्लरमध्ये घेतले. त्यानंतर मुंबईच्या मरियम झवेरी यांच्या प्रसिद्ध पार्लरमध्ये कामाचा त्यांनी अनुभव घेतला. त्यावेळी माधुरी दीक्षित, करीना, करिष्मा यांचे मेकअप करणार्‍या जयवंत ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी कामकेले. शिक्षण आणि अनुभव यादृष्टीने त्यांचे हे दिवस तसे महत्त्वाचे. सिनेसृष्टीतील सोनाली कुलकर्णी, सुधा चंद्रन, अरुणिमा सिन्हा, जुही चावला अशा अनेक नटींचे मेकअप त्यांनी केले. मात्र, मुंबईची मायावी दुनिया त्यांना फारशी रुचली नाही. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या कामावरच लक्ष केंद्रित केले. त्यांनी नाशिकच्या अनेक सौंदर्यवतींना मार्गदर्शन केले आहे. त्यात अलीकडे प्रसिद्धीस आलेली नमिता कोहोक आणि इतरही सौंदर्यवतींचा समावेश आहे. तीन वर्षांच्या मुलीपासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धेपर्यंत अनेकींचे मेकअप त्यांनी केले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल मॉरिशसच्या तत्कालीन कॅबिनेट मंत्री शीलाबाय बापू यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. नाशिकच्या स्वामी नारायण मंदिर, वेध न्यूज अशा सौंदर्य स्पर्धांत वर्षा यांनी मेकअप केलेल्या स्पर्धकांना बक्षिसेही पटकाविली आहेत. अनेक सौंदर्यस्पर्धांना त्यांनी सहकार्य केलेले आहे. पंजाबी सौंदर्य स्पर्धेत त्यांनी १० जणींचा मेकअप मोफत केला होता. एकेकाळी मेकअप म्हणजे चैन समजली जात असे. तोंडाला थोडी पावडर फासली, ओठाला लिपस्टिक लावली आणि केस सारखे केले की झाला मेकअप. आता मात्र नववधूच नव्हे तर सण, समारंभ, छोटे-मोठे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, धार्मिक सोहळे यांना मेकअप हमखास गरजेचा असतो. त्या त्या प्रसंगानुसार तसतसा मेकअप असावा लागतो. केवळ तरुणीच नव्हे तर कोणत्याही वयाच्या महिला मेकअप करताना दिसतात. महिलांना सौंदर्यविषयक काय टिप्स द्याल, असे विचारता सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नका, केस धुतले असतील तर ओले केस असताना दुचाकी प्रवास टाळा.ओले केस जास्त वेळ असू नयेत. केसांचे आरोग्य बिघडते अशा अनेक सूचना त्या देतात. तरुणीत लोकप्रिय असलेल्या वर्षाताईंना एवढेच सांगावेसे वाटते, मेकअप ऍण्ड कीप इट अप!
 
- पद्माकर देशपांडे