‘नशीबवान’ भाऊ कदम
महा एमटीबी   08-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदी अभिनेते भाऊ कदम यांचा ‘नशीबवान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भाऊ कदम यांनी या सिनेमात एका सफाई कामगाराची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री नेहा जोशी, जयवंत वाडकर, विद्या पटवर्धन इत्यादी कलाकार या सिनेमात दिसणार आहेत.
 

वाईट वेळ आणि चांगली वेळ असा दोन्ही काळ या सफाई कामगाराच्या आयुष्यात दाखविण्यात आला आहे. गरिबीचे दिवसही आनंदाने जगताना या सफाई कामगाराचे नशीब अचानक उघडते. आयुष्यात श्रीमंती येते. परंतु त्याच्या बायकामुलांच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र हरवत जाते. त्याचे नशीब पालटते खरे पण साध्या सरळ जीवनातील त्याचा रोजचा आनंद मात्र नाहीसा होतो. भाऊ तो कसा परत मिळवतो? हे पाहण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

 
 
 

लोकांना खदखदून हसविण्याची कला विनोदवीर भाऊ कदम यांना चांगलीच अवगत आहे. या कलेचा वापर करून ते सुप्रसिद्ध तर झालेच पण त्याचबरोबर त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही स्वत:ची आर्थिक प्रगती साधली आणि खऱ्या अर्थाने भाऊ कदम ‘नशीबवान’ झाले. परंतु त्यांच्यासारखा विनोदवीर मनोरंजन क्षेत्राला लाभल्यामुळे त्यांना पाहणारे प्रेक्षक आज स्वत:ला नशीबवान समजत आहेत. रसिक प्रेक्षकांनी आजवर भाऊ कदम यांना भरभरून प्रेम दिले आहे. आता त्यांच्या सिनेमाला प्रेक्षक कसा आणि किती प्रतिसाद देतात? हे पाहण्याजोगे असेल. पुढील वर्षी ११ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/