ममतांना भीती, म्हणून केल्या या गोष्टी : अमित शाह
महा एमटीबी   07-Dec-2018
 
 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल कॉंग्रेस यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला चढवला. ममता सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असून पंचायत निवडणूकांनंतर ममता बॅनर्जी यांची झोप उडाली आहे. त्यांना सत्ता जाण्याची भीती असल्याने त्या भाजपला घाबरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या प्रकरणी आम्ही स्वस्थ बसणार नसून उच्च न्यायालयात रॅलीच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली असल्याची माहीती अमित शाह यांनी दिली.

 

ममता बॅनर्जी सुढाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात झालेल्या पंचायती निवडणूकांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याने ममता सरकारला धक्का लागेल याची भीती असल्याने आम्हाला रॅली नाकारली जात असल्याचे ते म्हणाले. स्थानिक भाजप पक्ष कार्यकर्त्यांनी तब्बल आठ वेळा रॅलीसाठी अर्ज केला होता. पण, या सर्व विनंत्या अमान्य केल्या. भाजपला पश्चिम बंगालमध्ये पंचायतीच्या निवडणूकांमध्ये सात हजारांहून अधिक जागा मिळाल्या आहेत.

 

भाजपच्या २० कार्यकर्त्यांची हत्या !

 

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणूकांमध्ये भाजपच्या २० कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे. या हत्यांमागे तृणमुल कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नावे आहेत, असाही दावा त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये हिंसेचे राजकारण केले जात असले तरी आम्ही लोकशाहीच्या मार्गानेच लढू, असे त्यांनी ममता सरकारला सुनावले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/