एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना खुशखबर!
महा एमटीबी   06-Dec-2018


 

लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण मिळणार


मुंबई : एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांचा लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत घोषणा केली.

 

यामुळे या निर्णयाचा चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावर काम करणाऱ्या जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. मात्र यासाठी लिपिक-टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण पात्रता अपेक्षित आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करत एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रावते यांनी अनोखी भेट दिली. यावेळी बोलताना रावते म्हणाले, "या निर्णयामुळे महामंडळातील ज्या कर्मचाऱ्यांनी लिपिक-टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण घेतले आहे, त्यांचे शिक्षण वाया न जाता, आता त्यांना महामंडळातच पदोन्नतीची संधी मिळेल."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/