उद्धवजी, राममंदिराचे श्रेय तुमचेच!
महा एमटीबी   06-Dec-2018

 
किती धडपड चाललीय् राव तुमची, त्या अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधण्यासाठी. परवा मुंबईहून निघालात ते थेट अयोध्येतच दाखल झालात. रेल्वेची एक अख्खी गाडी भरून कार्यकर्ते डायरेक्ट शरयु नदीच्या तीरावर नेऊन उभे करायचे म्हणजे काय गम्मत आहे? निवडणुकीचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय्, तसतशी शिवसेनेची मंदिराविषयीची तळमळ विखारी रूप धारण करीत तीव्रतेने व्यक्त होऊ लागली आहे. अयोध्यावारी झाल्या झाल्या आता पंढरपुरात भक्तांच्या मांदियाळीसमोर तोच निर्धार नव्याने व्यक्त करण्याचा, तेच रणिंशग नव्याने फुंकण्याचा प्रकार भलेही कुणाला राजकारणाचे डाव म्हणून निकाली काढू देत, पण उद्धवजी, तुमच्या निर्धाराला त्रिवार कुर्निसात! अयोध्येत राम मंदिर उभे राहो की न राहो, त्याचे राजकारण करण्याची तुमची तर्हा न्यारीच बघा! खरं तर अयोध्या मुद्दा काही काल परवाचा नाही. त्यासाठीचे आंदोलन सुरू होऊनही आता पाव शतकाहून अधिक काळ मागे पडला आहे. पण बाबरी ढांचा कारसेवकांनी पाडल्यानंतर तो शिवसैनिकांनी पाडल्याची तेव्हाची फुशारकी असो किंवा मग आता, आगामी निवडणुका ध्यानात ठेवून गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या लेखी ऐरणीवर आलेला राम मंदिराचा मुद्दा असो, या मुद्याचे राजकारण करण्याची खुमखुमी काही केल्या लपून राहात नाही, हेच खरं. परवा साहेबांच्या नेतृत्वातला शिवसैनिकांचा ताफा अयोध्येच्या दिशेने निघाला, तेव्हा मंदिराचा पाया रचूनच परत येतात की काय हे सैनिक, असेच वाटत होते सार्या देशाला.
 
 
पण बार नेहमीप्रमाणे यंदाही फुसकाच निघाला. ती तारीख की काय म्हणतात, ते ठरवून स्वारी परत दाखल झाली मुंबईत. बरं, असं रिकाम्या हाताने परतावं लागलं तरी मुजोरी कायम ठेवणे ही राजकारणातली अपरिहार्यता असते. मोठ्या शिताफीनं त्या भूमिकेचे जाहीर प्रदर्शन घडवत राहायचे असते. राम मंदिराचे अयोध्येतील निर्माण, तेथे रामललांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, हा या देशातील तमाम हिंदूजनांच्या अस्मितेचा विषय आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचा मुद्दा भाजपाला मतं मिळवून देण्यासाठी हाती घेतलेला नव्हता. त्याचा अप्रत्यक्ष राजकीय लाभ भाजपाला झाला असेलही कदाचित, पण म्हणून केवळ तेवढ्या कारणासाठी संतप्त कारसेवकांनी बाबरी ढांचा ध्वस्त केला नव्हता, की तेवढ्याकरता काही कारसेवकांनी प्राणांची आहुती दिली नव्हती. शीलापूजनापासून तर बाबरी ढांचा ध्वस्त करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आक्रमणमुक्त करण्याचा मानसवजा निर्धारच व्यक्त होत राहिला होता. प्रत्येक हिंदू घरातून मंदिर निर्माण कार्यासाठी संकलित झालेला एकेक रुपया, हे त्या निर्धाराचेच प्रतीक होते. याचा विसर काहींना भलेही पडला असेल, पण लोक काहीही विसरलेले नाहीत. ती आंदोलने, ती दडपून टाकण्याच्या वल्गना, तो लाठीमार, गोळीबार, अटकसत्र...याचा विसर पडलेले अन् त्यावेळी त्या आंदोलनात फारसा कुठला सहभाग नसलेले काही राजकीय पक्ष आणि त्याच्या नेत्यांना आता निवडणुका जवळ आल्याचे बघून राम मंदिर उभारण्याची झालेली घाई, त्यावरून त्यांनी केंद्रातल्या सरकारला कठोर शब्दात धारेवर धरण्याची पद्धत...हास्यास्पद ठरावी अशीच आहे.
 
 
ज्यांनी खरोखरीच आंदोलन उभारले. आजवर निकराचा लढा दिला, बंदी भोगली, ते कार्यकर्ते मैदानावरच्या जाहीर सभांपासून तर न्यायालयातील प्रक्रियेच्या माध्यमातून खस्ता खाताहेत. मंदिराच्या मुद्यावरून ज्यांनी लोकसंग्रह केला, जनजागृती केली, हजारो लोक अयोध्येच्या दिशेने प्रवाहीत केले, ते लोक अजूनही संयमाने मंदिर उभारणीचा आग्रह धरताहेत आणि इतर लोक मात्र याचा स्वत:च्या राजकीय लाभासाठी कसा उपयोग करून घेता येईल याची गणितं मांडून बसले आहेत. बहुधा तिकडे अयोध्येत सुरू असलेली तयारी बघून, निर्माण कार्य केव्हाही सुरू होऊ शकते, याची कुणकुण लागल्यावर, आपल्यामुळेच मंदिर उभे राहिले असल्याचा दावा करता येईल असा कयास बांधून ही मंडळी श्रेय लाटण्यासाठी सरसावलेली दिसते आहे. दस्तुरखुद्द उद्धव साहेबांनाही, हे असे केंद्र सरकारला इशारे दिल्याने, जाहीर सभांमधून इतरांच्या नावाने बोटे मोडल्याने, चार शिव्या हासडल्याने लोक लागलीच मंदिर निर्माणाचे श्रेय आपल्या पदरात टाकतील, असे वाटू लागले असेल, तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. मुळात, हा राजकारणाचा विषयच होऊ शकत नाही. पण, भाजपाला कधीतरी त्याचा अप्रत्यक्ष राजकीय लाभ झाला होता ते बघून, त्यांना एकट्यालाच का? आम्हीही हिंदुत्वाच्या मुद्यावरच राजकारण करतो, मग आम्हालाही तसाच अन् तेवढाच लाभ मिळायला हवा, अशा कुठल्याशा भन्नाट कल्पनेतून बहुधा त्यांच्या अयोध्येच्या वार्या सुरू झालेल्या दिसताहेत.
 
 
वर म्हटल्याप्रमाणे, मुळातच राम मंदिराचा मुद्दा कुण्या राजकीय पक्षाच्या सोयीसाठी, फायद्यासाठी कुणी हाती घेतलेला नव्हता. त्या आंदोलनाची दिवसागणिक वाढलेली व्याप्ती ही सामान्य हिंदू माणसाच्या मनातील भावनेची फलश्रुती आहे. उभारल्या गेलेल्या त्या लढ्याची तीव्रता सत्तेत कोण, हे बघून कमी-अधिक झालेली नाही कधी. कारण त्यात आंदोलकांचे राजकारण नाही दडलेले. शिवसेनेने, अगदी अलीकडे चालवलेल्या राम मंदिराच्या आग्रहाला, त्यावरून त्यांनी चालवलेल्या आकांडतांडवाला, त्यांनी केलेल्या अयोध्या वारीला, आता पंढरपुरात लवकरच भेट देणार असल्याच्या त्यांच्या घोषणेला, मात्र राजकारणाचा गंध नको तितका जाणवतो. बहुधा म्हणूनच की काय पण, तो लोकमानसाला भावत नाही. ही मतांसाठी चाललेली साठमारी असल्याचे, त्यांनी प्रयत्न करूनही लपून राहात नाही. हा कुठलासा विशिष्ट हेतू समोर ठेवून आरंभलेला उपद्व्याप असल्याचे सहज जाणवून जाते. शिवाय, कुणीतरी आधीच या प्रकरणी लढाई उभारलेली असताना समवैचारिकांनी त्या लढाईला पाठबळ द्यायचे सोडून अशी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला की, त्यातला राजकीय स्वार्थही दवडला जात नाही. शिवसेनेच्या बाबतीत नेमके हेच घडते आहे. बस्स! आता स्वारी अयोध्येत मंदिर बांधूनच काढणार, अशा थाटातल्या आरोळ्या ठोकल्याने मंदिर निर्माण होईल आणि मग त्याचे श्रेय आपल्या पदरात पडेल अन् लागलीच तमाम मतदार भराभरा शिवसेनेच्या पारड्यात मतांचे दान टाकून मोकळे होतील, असा कुणाचा समज असेल, तर इलाज नाही. कुठल्याही बलिदानाविना, योगदानाशिवाय, श्रमाविना थेट यशाची कामना करणेच मुळात अफलातून आश्चर्य आहे. पण तशी इच्छा बाळगणार्यांना रोखणार कोण? त्यांनी राहावे त्याच भ्रमात! त्या स्थितीत तर काय, मंदिर निर्माणाचे श्रेयही त्यांचेच अन् निवडणुकीतील विजयश्रीही त्यांचीच...!