पिंपळे नाल्यावरील सुशोभिकरणासाठी दोन कोटींचा निधी
महा एमटीबी   06-Dec-2018

आ. स्मिता वाघ यांच्यामुळे चालना; पर्यटन विकास योजनेंतर्गत माजी आ. कृषिभूषण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


अमळनेर : 
 
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत पिंपळे नाल्यावरील सुशोभिकरणासाठी आ. स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने 2 कोटींचा निधी मंजूर झाल्याने या कामाचे भूमिपूजन माजी आ.साहेबराव पाटील यांच्या हस्ते होऊन थाटात शुभारंभ मंगळवार 5 रोजी करण्यात आला.
 
यावेळी साहेबराव पाटील यांनी आ. स्मिता वाघ यांच्यामुळे पालिकेस 13, 14 ते कोटी रु. चा निधी प्राप्त झाला असून त्यांच्यामुळे विकासाला चालना मिळत आहे.
 
या नेतृत्वामुळेच आम्ही पदावरून पायउतार न होता विकासासाठी क्रियाशील झालो असून पिंपळे नाला सुशोभिकरणाचा मोठा विषय त्यांनी मार्गी लावला आहे. यामुळे सुंदर अशी चौपाटी तयार होऊन कॉलनी परिसर शहराशी जवळच्या मार्गाने जोडला जाणार असल्याची भावना व्यक्त केली.
 
सदर निधीअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील पिंपळे नाल्याच्या काठावर संरक्षण भिंत बांधकाम, रस्ता काँक्रिटीकरण, आकर्षक वृक्षलागवड तसेच सुशोभिकरण करण्यात येणार असून यामुळे नाल्याचे रंगरूप पालटणार आहे.
 
तसेच परिसरातील नागरिकांना स्वच्छ परिसराचा अनुभव येऊन शहराच्या सौंदर्यातदेखील भर पडणार आहे. सदर कामासाठी आ. वाघ यांनी स्वतः आपल्या कल्पनेतून आराखडा तयार करून मुख्यमंत्री व पर्यटन विकास विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता.
 
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन दोन कोटी निधी मंजूर झाला असून नाल्याचा विस्तार मोठा असल्याने अजून निधी उपलब्ध करण्याचे आपले प्रयत्न असून त्यास नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा आ. वाघ यांनी व्यक्त करत सदर मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन विकासमंत्री ना.जयकुमार रावल व जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.
 
 
कामाच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, बाजार समितीचे सभापती उदय वाघ, माजी आ. साहेबराव पाटील, पं. स. सभापती वजाबाई भिल, कामगार नेते रामभाऊ संदानशिव, उपनगराध्यक्ष बिरजू लांबोळे, शहराध्यक्ष शीतल देशमुख, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मीनाताई पाटील, नगरसेवक विवेक पाटील, रामकृष्ण पाटील, मार्केट संचालक हरी भिका वाणी, प्रफुल्ल पवार, भगवान कोळी, माजी जि.प.सदस्य व्ही.आर पाटील, श्याम अहिरे, माधुरी पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
दरम्यान या अगोदरही आ.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने शहरातील अल्पसंख्याक वस्तीत अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत 30 लक्ष रुपये, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 40 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
तसेच शहरानाजीक असलेल्या विविध पर्यटन स्थळाच्या विकासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना सुख-सुविधा उपलब्ध होणार आहे.
सर्व नाल्यावर सुशोभिकरणाचा प्रयत्न : आ. स्मिता वाघ
 
शुभारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आ. वाघ यांनी माजी आ. साहेबराव पाटील यांची शहरासाठी असलेल्या तळमळीचे कौतुक केले तसेच या निधीतून पिंपळे नाला काठावरील नागरिकांची समस्या कायमची सुटण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी सोयीचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
 
भविष्यात अमळनेर शहराच्या हद्दीतील सर्वच नाल्यावर ह्या प्रकारचे काम करण्यात येणार असून यासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी पाठपुरावा होत आहे.तसेच यापुढे पर्यटन विकासअंतर्गत अंबरिष महाराज टेकडी, मंगळग्रह मंदिर, निम येथील कपिलेश्वर मंदिर, सखाराम महाराज देवस्थान यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाजार समिती सभापती उदय वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.