बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दणका
महा एमटीबी   06-Dec-2018अंबरनाथ - जादा प्रवासी घेणे आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाईचा बडगा उगारत ३९ रिक्षा जप्त केल्या यामुळे अंबरनाथमधील बेशिस्त वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांच्या त्रासाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, यामुळे वाहतूक कोंडी देखील होते, याखेरीज रिक्षात जादा प्रवासी भरणे, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात वाहतूक बुधवारी उशिरापर्यंत कारवाई करण्यात आली.

 

या कारवाईमध्ये पूर्व आणि पश्चिम भाग, बी केबिन रोड मार्गावरील बेशिस्त वर्तन करणाऱ्या तब्बल ३९ रिक्षा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी वाहतूक नियंत्रण विभागाकडे तक्रारी आल्या होत्या, बेशिस्त वर्तन करणारे रिक्षा चालक वाहतूक पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे प्रकार सर्रास घडत होते. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि अंबरनाथ वाहतूक नियंत्रण विभाग यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी रिक्षा चालकांचे लायसन, बॅच, परवाना, रिक्षाचा विमा, पीयूसी आदी महत्वाच्या कागदपत्रांची ३५० रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली यावेळी दोषी आढळलेल्या ३९ रिक्षाजप्त करून संबंधित रिक्षा चालक -मालकांना कल्याण आरटीओ कार्यालयात हजर रहाण्यास सांगण्यात आपले आहे.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक अविनाश मराठे, निरीक्षक अविनाश दुसाने, अंबरनाथ वाहतूक विभाग निरीक्षक प्रशांत सतेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. "कारवाईमध्ये जप्त केलेल्या रिक्षांपैकी ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. अश्या रिक्षा भंगारात काढून त्या रस्त्यावरून कायमस्वरूपी हटवण्याबरोबरच रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करणार" असे मोटर वाहन निरिक्षक अविनाश मराठे यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/