पोलिसांनी मस्तवाल होत त्रास, शिव्याही दिल्या, वडिलांनाही धमकावले...
महा एमटीबी   06-Dec-2018

लहानशा घराची 4 वेळा झडतीही घेतली...जळगावचे निष्ठावंत संघ कार्यकर्ते सतीश मदाने यांची व्यथा


जळगाव : 
 
आणीबाणीचा काळ किती भयावह होता, पोलीस किती मस्तवाल झाले होते, याचा संतापजनक अनुभव रा.स्व.संघ परिवारातील तत्कालीन दहावीतील स्वयंसेवक आणि जळगाव जनता बँकेचे संचालक, अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष सतीश प्रभाकर मदाने आणि परिवाराने घेतला आहे.‘सुलेखन’ फर्म आणि औद्योगिक वसाहतीतील ‘ पी.एम.’ या छपाई उद्योगाचे ते सर्वेसर्वा.
  
जूून 1975 मध्ये इंदिरा गांधींनी स्वत:चे पंतप्रधानपद वाचविण्यासाठी राज्यघटना, त्यातील सप्तस्वातंत्र्य, लोकशाहीतील मानवी जीवनमुल्यं कशी पायदळी तुडवली,सेवाभावी कार्यकर्त्यांच्या बलाढ्य संघटनेवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली.
 
संघस्वयंसेवक व तत्कालीन जनसंघासह सर्वच विरोधी पक्षनेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना अनिश्चित काळासाठी डांबले.... या अमानवी आणि क्रूर धोरणांमुळे आणि काही पोलिसांनी मस्तवाल होत त्याचा फायदा उचलल्याने कशी मुस्कटदाबी झाली, दहशत निर्माण केली, याचा घृणास्पद अनुभवही मदाने परिवाराने घेतला आहे.
 
सामाजिक सेवाकार्य हा स्थायीभाव असल्याने त्यांनी प्रारंभी ब्राह्मण सभेचे सचिव,व्यायामशाळेचे सचिव, नंतर केशवस्मृती सेवासंस्था समूह संचलित क्षुधाशांती (झुणका भाकर) केंद्राचे 10 वर्ष सचिवपद, बळवंत पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष व 10 वर्ष संचालकपद, विेवेकानंद प्रतिष्ठानचे 5 वर्ष सचिवपद भूषविलेले आहे. देसराजजींसारख्यांचे प्रेम आणि संघाचे नाना ढोबळे, विनितराव कुबेर इ.ज्येष्ठ प्रचारकांच्या प्रभावामुळे ते असे सक्रीय आहेत.
 
त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1960 चा शिंदाड ता.पाचोरायेथील. ते ला.ना.चे विद्यार्थी. मू.जे.तून बी.ए.झाले. रहिवास बळीराम मंदिराच्या बाजूस, जेथे आता मूर्तीकार वासुदेव दशपुत्रे राहातात, त्या लहानशा घरात ते, आई पुष्पाताई, वडील प्रभाकर, मोठा भाऊ प्रकाश आणि लहान भाऊ मोहन व बहिण छाया हे राहायचे. सध्या त्यांचा रहिवास गौरी गार्डन अपार्टमेंट, गणेश कॉलनी येथे आहे. सुभाष चौक परिसरात सध्या जेथे मनपाचे म.गांधी मार्केट आहे, त्या जागी असलेल्या शाळा क्र. 2 च्या प्रांगणात भरणार्‍या सायंशाखेचे ते नियमित स्वयंसेवक. संघकार्य, भेटीगाठी (लोकसंग्रह),यशस्वी उद्योजकांची चरित्रं, आत्मचरित्रांचे वाचन हे त्यांचे छंद.
 
वडील खाजगी नोकरीत तर आईची घरगुती खाणावळ. आणीबाणी जाहीर झाल्यावर आणि ते ला.ना.शाळेत दहावीत असतानाच संघाने आखलेल्या धोरणानुसार त्यांच्यासह संजय पंडित कुलकर्णी (एस.टी.वाहक) ,मुकुंद जोगदेव, प्रदीप गुजराथी,अरविंद परिपूर्ण, सुरेश जगताप या 6 जणांनी 6 डिसेंबर 75 ला अभिनव पद्धतीने सत्त्याग्रह केला, घंटा वाजवून मू.जे.कॉलेज सोडले, घोषणा दिल्या, तेथून घोषणा देतच शासकीय निकेतन, आयटीआय, न्यायालय चौक, हॉटेल मोराको समोरचा चौक गाठला...तेथे जिल्हा पेठ पोलिसांना जाग येत त्यांनी सर्वाना अटक केली. (नंतरच्या एका तुकडीत सतीश यांचे चुलत बंधू विकास श्रीकृष्ण मदाने यांनी सत्त्याग्रह केला...महिनाभर शिक्षा झाली. 3 वर्षापूर्वी ते दिवंगत झालेत)
 
पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत बसवून ठेवले...पुढे शहर पोलीस ठाण्यात ठेवले, नंतर तहसील कार्यालयातील पोलीस कोठडीत 3 दिवस ठेवण्यात आले. चौथ्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळाली, तिथे डास, उकाडा, घाण सहन करावी लागली. घरी कुणाशीही बोलणे झालेच नव्हते, सारे अस्वस्थ होते. पण सर्व शेजारी संघसमर्थक असल्याने त्यांनी धीर दिला, तेव्हाचे जिल्हा प्रचारक विनीतराव कुबेर यांनी खूप मदत केली.
 
पालकांना बोलावून घेत, समज देत 32 दिवसांनी जानेवारीत सुटका झाली.नेहमीच हिंमत देणार्‍या आईने घरी औक्षण केले, गोडधोड जेवण बनवले. अभ्यासावर परिणाम झाला होताच.
 
ला.ना.शाळेत गेल्यावर तर मुख्याध्यापक मुकुंदराव छापेकर यांनी बोलावून घेत पुत्रवत प्रेमाने ‘हे सारे कर पण आधी शिक्षण महत्त्वाचे...’ अशी समजूतही घातली.
 
(सतीश प्रभाकर मदाने) 98230 98880)
बेगुमान, क्रूर, उर्मट अधिकार्‍याची दादागिरी
 
6 डिसेंबर 1975 या दिवशी सतीश यांच्यासह 6 जणांना मोराकोजवळून अटक करून नेले... घरच्यांशी भेट झालीच नव्हती... पुढे पोलिसांनी खूप उर्मट, वाईट वागणूक दिली. विशेषत: पोलीस निरीक्षक रासकर हे खूप बेगुमान, क्रूर आणि उर्मट...ते शिव्या देत...वाट्टेल ते टाकून बोलायचे...त्यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे त्याच्या कानाला गंभीर इजा झाली. (पुढे त्यांची याबाबत कसून चौकशीही झाली.) वडिलांना तर पोलीस खूप धमकावायचे...तुमचे फार्मासिस्ट लायसन्स रद्द करु, अशी धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. भावंडे घाबरली होती. 10 बाय 10 च्या घराची 4 वेळा झडती घेण्यात आली. सतीश यांचे दहावीचे वर्ष असल्याने सर्वाना चिंता वाटायची. कारागृहात असताना आणि न्यायालयात हजर करीत, तेव्हा अनेक आप्त भेटायला येेत, प्रेम आणि कौतुकाने खाऊ, खाद्यपदार्थ आणित. पुढे त्यांना कारागृहात आणि नंतर रिमांडहोममध्ये ठेवण्यात आले
अ‍ॅड.रमेश गुप्ते यांना तुरुंगात टाकण्यापर्यंत मजल...
 
इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपद टिकविण्याचा नादात आणीबाणी लादली, बरेच पोलीस मस्तवाल होत स्वत:ला कर्तुमअकर्तुम समजू लागले होते. सतीश व अन्य काही सत्त्याग्रहींना बालसुधारगृहात ठेवावे, असा आग्रह अ‍ॅड.रमेश गुप्ते यांनी केला असता रासकर यांनी सूडभावनेने त्यांनाच अटक केली.
सर्वात लहान असल्याने लाड व्हायचे...
 
कारागृहात सतीश हे वयाने सर्वात लहान असल्याने लाड व्हायचे,.... भुसावळचे बांकेलाल रणधीर कड्यावर घेऊन फिरायचे. सोबत संजय कुलकर्णी, मुकुंद जोगदेव, प्रदीप गुजराथी इ., अमळनेरचे देसराजजी अग्रवाल, भुसावळचे राजाभाऊ पवार, मुरली जोशी, बांकेलाल रणधीर, चाळीसगावचे अ‍ॅड.शिवाजीराव पालवे होते. आठवड्यातून एकदा गूळ मिळायचा, देसराजजींचे हॉटेल असल्याने ते गुळाचा शिरा करुन खाऊ घालीत.दिनक्रम असा होता- सकाळी 6 ला उठून प्रार्थना, नाश्त्याला कांजी, मग खेळ, दुपारी जेवणात बावनपत्तीची भाजी-पोळी, नंतर गप्पा रंगायच्या, सायंकाळी खेळ आणि 7 ला जेवण व्हायचे.
सत्कार्य करीत रहा...
 
आणीबाणीच्या काळ्याकुट्ट काळाने कमी वयात खूप काही शिकवले...समाज व राष्ट्रसेवेत यथाशक्ती झोकून द्या..., कोणतेही सत्कार्य करण्यासाठी तत्पर रहा...,शिवाय जीवनात येणार्‍या अडचणींनाही हसतमुखाने सामोरे जा...असे त्यांचे म्हणणे आहे. आई पुष्पा, पत्नी स्नेहा, मुलगा समीप व सून मधुश्री आणि धाकटे चि. संकेत यांच्यासह ते समाधानी जीवन जगत आहेत. मोठे बंधू प्रकाश (नाशिक), दुसरे मोहन जळगावला सेवेत आणि भगिनी सौ.छाया प्रकाश मुळे (नाशिक) आहेत. पण ‘केशव स्मृती सेवा संस्थासमूहाच्या समाजसेवी प्रकल्पकंमध्ये व संघ कार्यात व्यग्र आहेत.