लिलावगृहांच्या जगात
महा एमटीबी   06-Dec-2018टॅटरसॉल्स हे लंडनमधलं लिलावगृह फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ते दुर्मीळ कलावस्तू, चित्र, पुस्तके वगैरे न विकता घोडे विकतं म्हणजे घोडेबाजार.


पॅरिस ही जागतिक कलेची राजधानी समजली जाते. चित्रकला, शिल्पकला, संगीत, नाट्य, साहित्य, काव्य या सगळ्या प्रकारांमधलं जुन्यात जुनं आणि नव्यात नवं जे जे काही असेल ते पॅरिसमध्ये उपलब्ध असतंच असतं. पण गमतीची गोष्ट म्हणजे, यातलं काही विकत घेऊन संग्रही ठेवावं, असं तुम्हाला वाटत असेल तर ते उपलब्ध असतं लंडनमध्ये किंवा मग एकदम न्यूयॉर्कमध्ये. सदबीज, ख्रिस्टीज, फिलिप्स, बोनहॅम्स, टॅटरसॉल्स अशी फार प्रख्यात आणि जुनी लिलावगृहे किंवा विक्रीकेंद्रे मुळात लंडनमध्ये सुरू झाली. आता त्यांच्या शाखा न्यूयॉर्कमध्ये किंवा जगभरातील अन्य देशांमध्येही आहेत. ठराविक दिवशी त्यांचे कलावस्तूंचे जाहीर लिलाव होतात. आता तर संगणक क्रांतीमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातला कोणीही ग्राहक अशा लिलावात ‘ऑनलाईन’ सहभागी होऊ शकतो. पाश्चिमात्त्य कलाक्षेत्रात लिओनार्दो-द-विंची हे फारच मोठं नाव आहे. २०१७च्या नोव्हेंबर महिन्यात लंडनच्या ‘ख्रिस्टीज’ या लिलावगृहाकडे चक्क लिओनार्दोचं एक चित्र लिलावासाठी आलं. या चित्राचं नाव होतं ‘साल्वातोर मुंडी’ म्हणजे ‘सेव्हियर ऑफ द वर्ल्ड.’ जगभराच्या श्रीमंत कलावस्तू संग्राहकांमध्ये ते चित्र पटकावण्याची मोठीच ईर्ष्या निर्माण झाली. ‘सेव्हियर ऑफ द वर्ल्डम्हणजेच जगाचा रक्षणकर्ता येशू ख्रिस्त याचं साक्षात लिओनार्दोने इ. स. १५०० मध्ये रंगवलेलं तैलचित्र; ते आपल्या संग्रही असावं, असं अनेक श्रीमंत ख्रिश्चन व्यक्तींना आणि संस्थांना वाटत होतं. साहजिकच जोरदार लिलाव झाला आणि तब्बल ४५ कोटी, ३० लक्ष डॉलर्सना ते विकलं गेलं. कोणत्याही चित्रासाठी आतापर्यंत बोलली गेलेली ही सर्वोच्च बोली आहे आणि ती बोलणारा कोण माहित्येय? त्याचं नाव आहे राजपुत्र बद्र बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद बिन फरहान अल् सौदी. सौदी राजघराण्याच्या अनेक राजपुत्रांपैकी एक असलेला हा राजपुत्र, सध्या सौदी अरेबियाचा सांस्कृतिक मंत्री आहे. सौदी अरेबियाने आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ नावाचा महत्त्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम ठरवला आहे. त्यात फक्त ३३ वर्षांचा तरुण बद्र बिन अब्दुल्ला महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. ते कसंही असो, या ‘साल्वातोर मुंडी’ उर्फ ‘सेव्हियर ऑफ वर्ल्ड’ नामक चित्राची एक वेगळीच गंमत आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे ‘धनुर्धारी राम’ किंवा ‘पार्थसारथी कृष्ण’ असं चित्र अनेक चित्रकारांनी काढलेलं आहे, तसंच ‘साल्वातोर मुंडी’ हे चित्र इ. स. १४७२ मध्ये कार्लो क्रिव्हेली नावाच्या त्यावेळच्या प्रसिद्ध चित्रकाराने काढलेलं असं, आज उपलब्ध आहे. त्यातला येशू खूपच वयोवृद्ध आहे. त्याने आपला डाव्या हाताच्या तळव्यावर पृथ्वीगोल धरलेला आहे आणि उजव्या हाताची दोन बोटं उंचावून तो त्या पृथ्वीला जणू अभय देतो आहे, अशी संकल्पना आहे. लिओनार्दोच्या चित्रातला येशू तरुण आहे. नंतरही १६व्या, १७व्या, १८व्या शतकातली त्या-त्या वेळच्या प्रसिद्ध चित्रकारांनी आपापल्या कल्पनेनुसार काढलेली येशूची ‘साल्वातोर मुंडी’ चित्र प्रसिद्ध आहेत. उपलब्ध आहेत.

 

आता, आपल्याला असं सांगितलं जातं की, बायबलमधील उल्लेखांनुसार येशू ख्र्रिस्त हा ३३ किंवा ३७ वर्षांचा असताना त्याला क्रूसावर खिळवून मारण्यात आलं. कार्ले क्रिव्हेलीच्या इ.स. १४७२च्या चित्रातला येशू तर वयोवृद्ध दिसतो. दुसरी त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रख्यात संशोधक गॅलिलिओ गॅलिली याने पृथ्वी ही चपटी नसून गोल आहे आणि ती सूर्याभोवती भ्रमण करते, असं सांगितल्यामुळे त्याला पाखंडी ठरवून शिक्षा देण्यात आली. कारण, त्याचं हे वैज्ञानिक विधान बायबलच्या विरुद्ध होतं. आता गॅलिलिओ विरुद्धचा हा ऐतिहासिक खटला आहे इ. स. १६३२-३३चा आणि इथे १४७२ साली कार्लो क्रिव्हेली, १५०० साली लिओनार्दो, १५१९ साली आंद्रिया प्रिव्हेताली, १५७० साली टिटियन आपापल्या ‘साल्वातोर मुंडी’ येशू प्रतिमेमध्ये येशूच्या हातातली पृथ्वी गोलच दाखवतायत, चपटी नव्हे! असो, तर आपण बोलत होतो लिलावगृहांविषयी. मुळात लंडनमधल्या या लिलावगृहांची नावं ‘सदबीज’ ऑक्शन हाऊस, ‘ख्रिस्टी’ज ऑक्शन हाऊस अशी होती. पण, पुढे ती इतकी प्रख्यात बनली की, त्यातला ‘ऑक्शन हाऊस’ आणि ‘अॅफॉस्ट्रॉफ’ गळला नि नुसतीच ‘सदबीज’, ‘ख्रिस्टीज’ अशी नावं राहिली. सन १७४४ साली सॅम्युअल बेकर, जॉर्ज ली आणि जॉन सदबी या तिघांनी मिळून जुनी, दुर्मीळ पुस्तकं लिलावात काढण्याचा व्यवसाय सुरू केला. तीच आजची जगद्विख्यात ‘सदबीज’ ही कंपनी. पुढे तिची मालकी आणि मुख्यालय अमेरिकेत न्यूयॉर्कला गेलं. आता २०१६ मध्ये तर ‘ताईकांग लाईफ’ या चिनी इन्शुरन्स कंपनीने तिचे सर्वाधिक शेअर्स खरेदी केल्यामुळे तिची मालकी चीनमध्ये गेली आहे. तशीच १७६६ साली जेम्स ख्रिस्टी या मूळ स्कॉटिश माणसाने लंडनमध्ये पॉल मॉल या प्रसिद्ध रस्त्यावर जुनी दुर्मीळ पुस्तकं विकणारी कंपनी सुरू केली. तीच आजची सुप्रसिद्ध ‘ख्रिस्टीज.’ १७९३ साली टॉमस डॉड आणि वॉल्टर बोनहॅम या जुन्या पुस्तकांच्या दर्दी मित्रांनी लंडनच्या बाँड स्ट्रीटवर ‘बोनहॅम्स’ ही कंपनी सुरू केली. हॅरी फिलिप्स हा जेम्स ख्रिस्टीच्या कंपनीतला एक कारकून. १७९६ साली त्याने आपली स्वतःची फिलिप्स ही कंपनी सुरू केली. त्याच्या मोठ्या नि महत्त्वाच्या ग्राहकांमध्ये एक होता खुद्द नेपोलियन बोनापार्ट म्हणजे पॅरिस या कला राजधानीचा सत्ताधारी नि ब्रिटनचा हाडवैरी नेपोलियन विविध दुर्मीळ कलावस्तू नि दुर्मीळ पुस्तक खरेदी कुठून करायचा तर लंडनच्या लिलावगृहांमधून. टॅटरसॉल्स हे लंडनमधलं लिलावगृह फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ते दुर्मीळ कलावस्तू, चित्र, पुस्तके वगैरे न विकता घोडे विकतं म्हणजे घोडेबाजार. पण, तो आपल्याकडल्यासारखा विकाऊ लोकप्रतिनिधींचा नव्हे, तर उत्तम जातीच्या घोड्यांचा. १७६६ साली रिचर्ड टॅटरसॉल याने लंडनच्या हाईड पार्कजवळ उत्तम घोड्यांचा लिलाव करणारी ही कंपनी सुरू केली. अनेक सरदार आणि खुद्द इंग्लडचा राजादेखील या लिलावगृहाचे आश्रयदाते होेते. आता घोड्यांचा सैनिकी उपयोग संपला असला अरी शर्यतींसाठी घोड्यांना मागणी आहेच. त्यामुळे शर्यतींच्या विश्वात ‘टॅटरसॉल्स’ हे नाव आजही विख्यात आहे. आपल्याकडेही अनेक गावं आणि तिथले वार्षिक बाजार किंवा जत्रा या विशिष्ट लिलावांसाठी प्रसिद्ध आहेत. उदा. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडजवळच्या म्हसा गावच्या म्हसोबाची जत्रा ही म्हशी आणि रेडे यांच्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे. असेच देशभरात सर्वत्र घोडे, खेचरं, गाढवं, उंट यांचेही बाजार आहेत. कलावस्तू, पुस्तकं, चित्र इत्यादी चीजाही स्थानिक पातळीवर विकल्या जातात. पण, त्यांना ‘सदबीज’, ‘ख्रिस्टीज’ यांच्यासारखं संघटित रूप नाही नि प्रतिष्ठाही नाही.

 

ख्राईस्ट द सेव्हियर

 

‘सेव्हियर ऑफ द वर्ल्ड’ किंवा ‘साल्वातोर मुंडी’ या लिओनार्दोच्या चित्रावरून मॉस्कोतल्या सुप्रसिद्ध ‘ख्राईस्ट द सेव्हियर कॅथीड्रल’ची आठवण झाली. १८१२ साली नेपोलियन बोनापार्टने रशियावर भव्य स्वारी केली. पण, रशियाच्या भीषण हिवाळ्याने ‘कमांडर विंटर’ने नेपोलियनचा पराभव केला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सम्राट झार अलेक्झांडर पहिला याने मॉस्कोत क्रेमलिनजवळ ‘ख्राईस्ट द सेव्हियर’ नावाचं भव्य कॅथीड्रल उभं करण्याचं ठरवलं. १८१२ साली सोडलेला हा संकल्प रखडत-रखडत अखेर १८८३ साली पूर्ण झाला. १९१७ साली रशियात क्रांती होऊन साम्यवादी सत्ता आली. साम्यवादी हे पक्के नास्तिक. त्यामुळे लेनिनच्या खास आदेशाने रशियन ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च ही एकंदर संस्था आणि तिचं गावोगावी पसरलेलं संघटन म्हणजे ‘डायोसिस’ समूळ नष्ट करण्याचे उद्योग सुरू झाले. अनेक चर्चेस जमीनदोस्त करण्यात आली. क्रेमलिनजवळ असलेलं ‘ख्राईस्ट द सेव्हियर’ हे मुख्य चर्च असल्यामुळे लेनिनने त्याला लगेच हात लावला नाही. १९२४ साली लेनिन मेला. त्याच्या जागी आलेल्या स्टॅलिनला पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीने अहवाल दिला की, ‘ख्राईस्ट द सेव्हियर कॅथीड्रल’च्या मुख्य कळसामध्ये किमान २० टन उच्च दर्जाचं सोनं वापरण्यात आलेलं आहे. स्टॅलिनच्या आदेशाने १९३१ मध्ये कॅथीड्रल डायनामाईट लावून उद्ध्वस्त करण्यात आलं. २० टन सोनं देशाच्या प्रगतीसाठी वापरण्यात आलं म्हणे!! १९८५ साली गोर्बाचेव्ह यांची राजवट आली.तिने १९९० साली रशियन ऑर्थोडोक्स चर्चला पुन्हा ‘त्याच जागेवर’ कॅथीड्रल उभारायला परवानगी दिली. त्यानुसार १९९५ ते २००० या काळात पुन्हा ‘ख्राईस्ट द सेव्हियर कॅथीड्रल’ उभं राहिलं. त्याच्या कळसात सोनं बिनं नाही, पण मस्कवा नदीच्या तीरावर क्रेमलिनच्या जवळच रशियन पारंपरिक शैलीत एक सुंदर नवी वास्तू बनली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/