प्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची
महा एमटीबी   06-Dec-2018

 


 
 
 
या निवडणुकीतील प्रचाराबद्दल सांगायचे झाल्यास आता भारतात प्रस्थापित झालेल्या प्रचारप्रणालीचाच या निवडणुकीतही प्रत्यय आला आणि दुसरी कोणती नवी प्रचारप्रणाली आविष्कृत होईपर्यंत तरी हीच प्रणाली आणखी काही काळ वापरली जाणार आहे. तशी ही प्रणाली २०१४ पासून अमलात येऊ लागली आणि पुढील काही वर्षे तीच अमलात राहणार आहे.
 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उपान्त्य फेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकीतील मतदान हा मजकूर प्रसिद्ध होईल तेव्हा आटोपलेले असेल आणि सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा असेल. ११ डिसेंबर रोजी तीही पूर्ण होईल आणि सर्व राजकीय पक्ष २०१९ च्या तयारीला लागलेले असतील. या विधानसभा निवडणुकांचे निकाल काय, लागणारच आहेत. कुणाला तरी बहुमत मिळणार, कुणाचा तरी पराभव होणार. त्रिशंकू सभागृह तयार झाले तर थोडी ओढाओढी होणार, हे ठरलेलेच आहे. पण, २०१९ मध्ये काय होऊ शकते, याचा संकेत मात्र या निकालांमधून अपेक्षित आहे; किंबहुना हेच त्याचे खरे महत्त्व आहे. तसे पाहिले तर प्रत्येक निवडणूक स्वतंत्र व तिच्यासारखी तीच असते. दोन निवडणुकांचा परस्परांशी संबंध असू शकत नाही. पण प्रत्येक निवडणूक ही प्रतिमेची (परसेप्शनची) लढाई बनल्यामुळे थोडा तरी परिणाम होतोच.

 

या निवडणुकीतील प्रचाराबद्दल सांगायचे झाल्यास आता भारतात प्रस्थापित झालेल्या प्रचारप्रणालीचाच या निवडणुकीतही प्रत्यय आला आणि दुसरी कोणती नवी प्रचारप्रणाली आविष्कृत होईपर्यंत तरी हीच प्रणाली आणखी काही काळ वापरली जाणार आहे. तशी ही प्रणाली २०१४ पासून अमलात येऊ लागली आणि पुढील काही वर्षे तीच अमलात राहणार आहे. फार दूरचा नव्हे पण एक काळ असा होता, जेव्हा निवडणूक प्रचार काही व्यापक मुद्द्यांभोवती फिरविला जात असे. किमान तसा प्रयत्न तरी होत असे. १९७१ ची निवडणूक ‘गरिबी हटाव’ भोवती फिरत होती, तर १९७७ ची निवडणूक आणीबाणीभोवती फिरत होती. ‘शायनिंग इंडिया’ भोवती फिरलेली २००४ ची निवडणूक ही त्या प्रणालीतील शेवटची निवडणूक. २००९ मध्ये ती प्रणाली चाचपडत असतानाच २०१४ ची निवडणूक ही नवी प्रणाली घेऊन आली आणि आणखी काही काळ राजकीय पक्षांना तिचाच वापर करावा लागणार आहे.

 

सामान्यत: निवडणूक प्रचार म्हटला म्हणजे राजकीय पक्षांनी आपापले निवडणूक जाहीरनामे किंवा घोषणापत्र तयार करणे आणि आपण त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी कशी करणार आहोत, हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणे, हे रुढ झाले होते. नेत्यांच्या जाहीर सभांमधून, पत्रकार परिषदांमधून त्यावरच लक्ष केंद्रित केले जात असे. पण, संगणकयुग आले, संवादक्रांती झाली आणि निवडणूक प्रचाराचे स्वरूपच बदलले. त्या काळात निवडणूक हे एक आंदोलन होते. पण, आता मात्र निवडणूक हे एक युद्ध बनले आहे. त्यात शस्त्रे वापरली जात नाहीत, पण तेवढे सोडले तर आजची निवडणूक एखाद्या युद्धासारखीच बनली आहेनोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारामध्येही आपल्याला तेच दिसून आले. किंबहुना, २०१४ नंतर झालेल्या सर्वच विधानसभा निवडणुकींमध्ये त्याचेच प्रतिबिंब उमटत गेले. अलीकडेच झालेल्या गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, कर्नाटक, त्रिपुरा विधानसभांच्या निवडणूक प्रचाराचे सिंहावलोकन केले तर आपल्याला त्याचाच प्रत्यय येईल.

 

या प्रचारप्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीचे मुद्दे प्रचार सुरू असतानाच तयार केले जातात. घोषणापत्र, जाहीरनामा किंवा वचननाम्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो आणि ते स्वाभाविकही आहे. कारण, उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांना प्रचारासाठी जेमतेम तीन आठवड्यांचा अवधी मिळतो. त्या काळात एखाद्या राजकीय पक्षाने जाहीरनामा समजावून सांगण्याचेच ठरविले, तर एक तर तो प्रकार एकसुरी ठरेल, बेचव ठरेल. कारण, कोणत्या राजकीय पक्षाचे ध्येयधोरण आणि कार्यक्रम कोणता आहे, हे लोकांना अगोदरच ठाऊक असते. त्याच्या बौद्धिक चर्चेत कुणालाही रस वाटणार नाही. शिवाय निवडणूक प्रचार हे एकप्रकारे प्रतिमेचे (परसेप्शनचे) युद्ध बनले आहे. तुमची प्रतिभा किती उत्कट आहे, यापेक्षा प्रतिमा कशी उत्कट आहे, याला तेथे महत्त्व असते. त्यासाठी वैचारिक विश्लेषणात वेळ घालविण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी विरोधक काय बोलतात हे पाहायचे असते, त्यातील आपल्याला आक्रमणासाठी कोणते सोयीचे आहे हे हेरावे लागते, त्याचा मिळणाऱ्या वेळात अभ्यास करावा लागतो व विरोधकांवर नेम धरून आघात करावा लागतो. तो आघात विरुद्घ बाजूला उत्तर देण्यास बाध्य करणारा मात्र असला पाहिजे. या प्रणालीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, प्रतिस्पर्ध्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडायचे नसते. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बचावाचा पवित्रा घेण्यासारखे ठरते आणि प्रतिमेच्या या लढाईत ते परवडणारे नसते. कारण, कोणत्याही लढाईत आक्रमकालाच फायदा मिळत असतो. तीन आठवड्यांच्या या लढाईत तर तेच अपरिहार्य आहे.

 

कोणत्या मुद्द्याला वा शब्दाला धरून आक्रमण करायचे, हे मात्र कसलेल्या योद्ध्यालाच जमते. गुजरात विधानसभा निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी ‘नीच’ शब्द उच्चारला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत मोदींनी त्याचा संबंध भारत-पाक संबंधांशी जोडला. त्यात त्यांनी डॉ. मनमोहन सिंगांनाही ओढले. काँग्रेसने मणिशंकरांना बडतर्फ केले, ‘त्या’ बैठकीचा खुलासाही केला, पण तोपर्यंत मोदींनी बाजी मारली होती. कारण, असाच अनुभव ‘मौत का सौदागर’च्या निमित्ताने त्यांनी जुन्या निवडणुकीत घेतला होता. जवळपास तसलेच आक्रमण त्यांनी कर्नाटक निवडणुकीतही केले होते. राहुलला कागदाकडे न पाहता पंधरा मिनिटे भाषण करण्याचे आव्हान देऊन तर त्यांनी काँग्रेसची गोची करून टाकली होती. अर्थात, त्यासाठी मोदींसारखा तल्लख मेंदू नेत्याकडे असावा लागतो. येऱ्यागबाळ्याचे ते काम नाही. या पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारातही असेच घडले. ‘भारतमाता की जय’ हा काय प्रचाराचा मुद्दा असू शकतो? पण, काँग्रेसच्या एका सभेत ‘भारतमाता की जय’ म्हणणाऱ्याचे तोंड दाबण्यात आल्याचा व्हिडिओ उघड झाला आणि त्या मुद्द्याचा जन्म झाला. त्या कार्यकर्त्याचे तोंड दाबून त्याला ‘सोनिया की जय, राहुल की जय’ म्हणायला भाग पाडणे हा नंतरचा भाग. मोदी ‘भारतमाता की जय’ म्हणतात, याला राहुलने आपल्या बुद्धीनुसार आक्षेप घेतला. पण, मोदी एवढे चतुर की, त्यांनी राहुलच्या म्हणण्याचे ‘फतव्या’त रूपांतर करून टाकले आणि काँग्रेस पक्ष भारतमातेच्या विरोधात असल्याचा आभास उत्पन्न केला. अशी कितीतरी भाराभर उदाहरणे देऊन या नव्या प्रणालीची फोड करता येऊ शकेल. इथे आक्रमणासाठी योग्य आणि कमीत कमी शब्दांची निवड करावी लागते. प्रतिपक्षाच्या आक्रमणाला त्याच्यापेक्षा अधिक प्रखरतेने प्रत्याक्रमण करावे लागते. त्यासाठी फार वेळ उपलब्ध नसतो. आक्रमण वा प्रत्याक्रमणासाठी अचूक आणि चपखल शब्द निवडावा लागतो. तो क्षण आणि तो शब्द तुमच्या हातून सुटला की, मग काही केल्या तुम्हाला सूर गवसतच नाही. चालू पाच राज्यांतील निवडणुकींसह गेल्या काही निवडणुकीतील प्रचारप्रणालीचा अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल.

 

या प्रणालीत सांकेतिकतेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण, ती आपल्या फायद्यासाठी वापरता यायला हवी. त्याची चेष्टा करण्याची प्रतिपक्षाला संधी मिळणार नाही याची काळजीही घ्यावी लागते. ती जर घेतली नाही तर राहुल गांधींच्या मंदिर प्रदक्षिणेसारखी स्थिती होते. आताआतापर्यंत काँग्रेस पक्ष स्वत:ला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून भाजप मुस्लीमविरोधी असल्याचा प्रचार करीत होता. त्यातून काँग्रेसची ‘मुस्लीम पार्टी’ म्हणून तयार झालेली प्रतिमा पुसून टाकण्यासाठी राहुल गांधींनी मंदिरांचे उंबरठे झिजविणे सुरू केले. पण, असा प्रयोग पूर्ण तयारीनिशी करायचा असतो, हे राहुलला कुणी शिकविले नाही. त्यामुळे त्यांचे हसे झाले. या नव्या प्रचारप्रणालीला जोड मिळाली ती नव्यानेच विकसित होत असलेल्या ‘सेफॉलॉजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक अंदाज शास्त्राची. प्रत्येक निवडणुकीत त्याचा वापर केला जातो, पण तोही केवळ प्रचारासाठीच. मतदारांची वेळोवेळी केली जाणारी सर्वेक्षणे, एक्झिट पोल आदी माध्यमांतून निकालांचा अंदाज किती येतो, हे सांगणे कठीण आहे. पण, निवडणुकांबाबत लोकांच्या मनात रुची निर्माण करण्यासाठी त्यांचा उपयोग निश्चितच होतो. जनमताची दिशाही त्यातून कळू शकते. एकंदरीत निवडणूक प्रचारप्रणाली हेही एक शास्त्रच बनू पाहत आहे. अर्थात, लढाईची ही झाली एक आघाडी. ती जिंकून काम भागत नाही. तिचा लाभ घेणारी बुथपातळीपर्यंत सक्रिय असलेली यंत्रणा जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत या मैदानी युद्धाला काहीही महत्त्व नाही. ती यंत्रणा मजबूत करण्याचे काम भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीतही त्यांनी ही बुथ यंत्रणा पान यंत्रणेपर्यंत नेली आहे. प्रत्येक बुथवरील मतदारयादीतील प्रत्येक पानाचे प्रमुख त्यांनी नेमले आहेत व त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारांचे शतप्रतिशत मतदान कसे होईल, याची काळजी घेणारी यंत्रणा त्यांनी विकसित केली आहे. तिचा परिणाम काय होतो, हे ११ डिसेंबरला दिसेलच.

 
 

- ल. त्र्यं. जोशी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/