आता एटीएमसाठी कार्डाची गरज नाही!
महा एमटीबी   06-Dec-2018

 


 
 
नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड आवश्यक असते. मात्र आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डाची गरज भासणार नाही. यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) या पेमेंट सेवेच्या माध्यमातून आणि क्यू आर कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) वापरून एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. लवकरच ही सेवा बँकांच्या एटीएममध्ये सुरु करण्यात येणार आहे. एजीएस ट्रॅन्झॅक् टेक्नॉलॉजिसने ही कार्यप्रणाली विकसित केली आहे.
 

एजीएस ट्रॅन्झॅक् टेक्नॉलॉजिसद्वारे बहुतांश बँकांना एटीएम सेवा पुरवली जाते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या कार्यप्रणालीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर ही सुविधा सर्व बँकांच्या एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. एटीएममुळे बँकामधील बहुतकरून खासगी बँकांमधील खातेदारांच्या गर्दीचे प्रमाण गेल्या काही वर्षात बरेच कमी झाली आहे. पैसे काढण्यासाठी तसेच विविध पेमेंट करण्यासाठी आजकाल डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर सर्रास केला जातो. एटीएममधून पैसे काढण्यासाठी खातेदारांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड बाळगणे आवश्यक असते. तसेच कार्डाचा पिन क्रमांक लक्षात ठेवावा लागतो. एटीएममधून पैसे काढण्याची ही जुनी पद्धत आता कालबाह्य होणार असून खातेदारांना आता स्मार्टफोनद्वारे पैसे काढता येणार आहेत. ही नवीन पद्धत अवलंबण्यासाठी खातेदारांजवळ स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये यूपीआय संलग्नित अॅप असणे आवश्यक आहे.

 

ही नवी कार्यप्रणाली खातेदारांसह बँकासांठीही फायदेशीर ठरणार आहे. या नव्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेदारांना बँकेची कोणतीही नवी सेवा घ्यावी लागणार नाही. तसेच खातेदारांना कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करावे लागणार नाही. खातेदारांच्या स्मार्टफोनमध्ये एखादे यूपीआय संलग्नित पेमेंट अॅप असणे गरजेचे असेल. या नवीन सुविधेद्वारे पैसे काढताना एटीएममशीनच्या स्क्रीनवर दिसणार क्यूआर कोड खातेदारांना आपल्या स्मार्टफोनमधील पेमेंट अॅपने स्कॅन करावा लागणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतरच एटीएममधून पैसे काढता येतील. या सुविधेमुळे एटीएम कार्डाप्रमाणेच तातडीने पैसे खातेदारांना मिळतील. काही पेमेंट अॅपचा वापर करून डिजीटल पेमेंट करून वस्तू विकत घेता येतात. त्याचप्रमाणे कोड स्कॅन करून एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे.

 

या कार्यप्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आम्ही अनेक बँकांना याचे सादरणीकरण करून दाखवले. ही सुविधा अमलात आणण्यासाठी जवळपास सर्वच बँका उत्सुक आहेत.असे एजीएसचे व्यवस्थापकीय संचालक रवी गोयल यांनी म्हटले. ही कार्य प्रणाली अतिशय सुरक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले. एटीएम आणि यूपीआयचे नियमन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून केले जाते. त्यामुळे ही सुविधा अमलात आणण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. परवानगी मिळाल्यानंतर देशभरातील एटीएममध्ये ही सुविधा अस्तित्वात आणली जाईल. असे रवी गोयल यांनी म्हटले. तसेच ही नवी सुविधा देण्यासाठी एटीएममशीनच्या हार्डवेअरमध्ये कोणताही बदल करणे आवश्यक नाही, एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये एक छोटासा बदल करून ही सुविधा देता येणार आहे. अशी माहिती एजीएसचे महेश पटेल यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/