दलित चेंबर ऑफ कॉमर्स
महा एमटीबी   05-Dec-2018 
 
 

समाजाला आर्थिक समानतेची संधी 

 

सक्षम आचार-विचारांच्या विकासातून समाजाने स्वयंप्रेरणेने आर्थिक गुलामगिरी झुगारली, नाकारली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सक्षम समाज उभा राहिला. हे सगळे परिवर्तन झाले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रेरणेने. या प्रेरणेचे एक मूर्त रूप आहे Dalit Indian chamber of commerce (डिक्की). समाजाला आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करत उद्योजक म्हणून नावारूपाला आणणारी ‘डिक्की’. ‘डिक्की’च्या उद्योजकांच्या नजरेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा या पुरवणीद्वारे आपल्याला अनुभवायला मिळते. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या सामाजिक आणि उद्यमशील अनुभवातून साकारलेला हा लेख.

 

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चोवळी हे माझे गाव. मराठा आणि लिंगायत समाजाची वस्ती असलेले हे गाव. वडील प्रल्हाद भगवानराव कांबळे व्यवसायाने शिक्षक आणि आई यशोदा प्रल्हाद कांबळे गृहिणी. वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्यामुळे त्यांची वरचेवर बदली होत असे. त्यांच्याबरोबर आमचाही या गावातून त्या गावात प्रवास ठरलेला होता. बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखे होते. परंतु शिक्षकाचा मुलगा म्हणून शाळेतील मुले आणि शिक्षक यांच्या माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा असायच्या. प्रत्येक उपक्रमात मी सहभागी होत असे. वडिलांना शिक्षक म्हणून जो पगार मिळायचा, त्यावर आईवडील आणि आम्ही चार भावंडे असा सहाजणांच्या कुटुंबाची गुजराण चालत असे. घरात मात्र चळवळीचे वातावरण होते. माझे काका दलित पँथरचे काम करीत असल्यामुळे चळवळीच्या गोष्टी मी जवळून पाहत होतोशालेय शिक्षण चालू असतानाच दलित चळवळीच्या घरातील वातावरणामुळे बाबासाहेबांचे विचार माझ्या मनाला प्रभावित करू लागले होते. माझे वडील, काका डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात मला घेऊन जात असत.त्यामुळे मीही बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तके वाचून भाषण तयार करत असे. कधी कधी भाषणेही करीत असे. त्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव वाढत गेला.

 

नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून १९८७ साली सिव्हिल इंजिनिअर म्हणून बाहेर पडलो आणि सुरुवातीला सिंचन सार्वजनिक बांधकाम विभागात काही काळ नोकरी करावी, असे वाटले. परंतु, अगदी लहानपणापासूनच आपण स्वतःचा व्यवसाय करायचा, असे मनाशी ठरवले होते. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीनेच विचार करत होतो. आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. परंतु, आता आरक्षणातून नोकरी मिळवायची नाही, तर स्वतंत्रपणे व्यवसाय करायचा, हे ठरवले होते. घरच्यांचा मात्र या निर्णयाला पूर्णपणे विरोध होता. तरीही मी व्यवसायच करायचा, या उद्देशाने गाव सोडून पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही काळ झोपे म्हाळगी असोसिट्स, मंत्री कन्स्ट्रक्शन, कर्वे स्त्री शिक्षण संस्था मिश्रा असोसिएट्स या ठिकाणी बांधकाम क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी नोकरी केली. १९९५ मध्ये ‘मिलिंद कांबळे सिव्हिल इंजिनिअर्स अॅन्ड कॉन्ट्रक्टर्स’ या संस्थेची नोंदणी केली. या संस्थेला पहिले काम बीएमसीसी कॉलेजच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे मिळाले. भांडवलासाठी अर्थातच पैसे नव्हते. हेमंत लेले, अतुल फडके यांच्यासारखे आणखी काही मित्र मदतीला धावून आले. २५ हजार रुपये उभे करून संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण केले. यानंतर काही छोटी- मोठी कामे करत असतानाच कृष्णा खोरे विकास मंडळातून मिश्रा असोसिएट्सने काही मोठी कामे मिळवली होती. त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरू केले. पिंपळगाव जोगे डाव्या कालव्याचे काम पूर्ण केले. पुढे कोकण रेल्वेचे राजापूर स्टेशन, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा घाटातील काही भाग, खंबाटकी घाटातील बोगद्याचे काम, लवासाचा जवळजवळ ४० किमी रस्ता इत्यादी कामे यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यातून मिश्रा असोसिएट्सचा विश्वास संपादन करून त्यांचा संचालक बनलो. हे सर्व करत असताना आव्हाने स्वीकारली.शॉर्टकट आपला रस्ता नाही, त्यामुळे अखंड परिश्रमानेच मोठे होता येईल, हे मनाशी पक्के ठरवले.

 

या घडामोडीतून माझ्यातील उद्योजक आकाराला येत होता. आता मी स्वतंत्रपणे मोठीकंत्राटे घेत होतो. त्याचवेळेस महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. मी सुरुवातीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा चाहता आहे आणि त्यातही त्यांच्या आर्थिक विचारांचा अभ्यासक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, एक वक्ता, समाजसुधारक, दलितांसाठी त्यांना वाटणारी कळकळ, त्यांनी दिलेले सामाजिक लढे असे अनेक पैलू समाजासमोर आले. पण ते एक महान अर्थतज्ज्ञ होते, हा त्यांचा पैलू आजवर दुर्लक्षित राहिला आणि मी त्या पैलूवर अधिक प्रकाश टाकायचा, हे ठरवले. जवळजवळ चार वर्षे मी अत्यंत बारकाईने अभ्यास केला आणि ‘डॉ. बी. आर. आंबेडकर डॉट कॉम’ या सुमारे सात हजार पृष्ठे आणि हजारांहून अधिक छायाचित्रं असणाऱ्या संकेतस्थळाची निर्मिती केली. १४ एप्रिल, २००१ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते हे संकेतस्थळ देशाला अर्पण केले. या संकेतस्थळावर बाबासाहेबांचे समग्र वाङ्मय, दुर्मीळ छायाचित्रे, संसदेतील भाषणाच्या ऑडिओ क्लिप्स आदींचा समावेश आहेही वाटचाल सुरू असताना सामाजिक जाणिवा जागृत होत होत्या. दलित समाज शिक्षित झाला, संघटित झाला, परंतु अर्थिक उन्नती मात्र झाली नाही. समाजात दलितांची प्रतिमा ‘सरकारचे जावई’ अशी होत होती आणि माझ्या संवेदनशील मनाला ते खटकत होते. खाजगी उद्योगात दलितांना आरक्षणाची ही चर्चा सुरू झाली होती. सरकारच्या धोरणाला उद्योगजगतातून विरोध होत होता. सरकारने जे. जे. इराणी यांच्या अध्यक्षतेखाली अफर्मेटिव्ह अॅक्शन कमिटी स्थापन केली होती. उद्योगजगत आरक्षणाऐवजी व्यवसायाला प्राधान्य देत होते. त्यामुळेच माझ्या मनात असा विचार आकार घेऊ लागला की, दलित उद्योजक निर्माण झाले तर अर्थिक सुस्थिती येईल आणि त्याद्वारे दलित समाजाचे आर्थिक प्रश्न सुटू शकतील. केवळ भाषणे करून अर्थिक विषमता दूर होणार नाही, तर त्यासाठी सकारात्मक कृती कार्यक्रमाची गरज आहे. या भूमिकेतूनच १४ एप्रिल, २००५ मध्ये दलित उद्योगजगताला प्रोत्साहन देण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिज’ (डिक्की)ची स्थापना केली.

 

नवा दलित उद्योजक घडवण्याआधी जो आधीपासून अस्तित्वात असलेला दलित उद्योजक शोधणे आवश्यक होते. त्यासाठी राज्यभरात प्रवास सुरू केला. अशा उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि ‘डिक्की’शी जोडणे सुरू केले. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या संधी, ‘ग्लोबल मार्केट’ या गोष्टी उद्योजकांसमोर आणल्या. जगाच्या बाजारपेठेत जातीला किंमत नाही, गुणवत्तेला मूल्य हे आहे, हे पटवून दिले. यातून अनेक उद्योजक आत्मविश्वासाने अभिमानाने समोर आले. ४ जून ते ६ जून २०१० मध्ये पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पहिला भव्य ‘डिक्की ट्रेड फेअर’ आयोजित केला. यानंतर आजवर ‘डिक्की’ची घोडदौड कोणी रोखू शकले नाही. आज २६ राज्यांत ‘डिक्की’च्या शाखा आहेत. १० हजारांवर सभासद आहेत. सर्व राज्य सरकारांसोबत तसेच केंद्र सरकारसोबत ‘डिक्की’ काम करीत आहे. आज विविध योजना सरकारने जाहीर केल्या, ज्याच्या माध्यातून दलित समाजातील नवउद्योजकांसाठी एक ‘सपोर्ट सिस्टिम’ उभी राहिली. ‘मार्केट, मनी, मेन्टॉरिंग’ या त्रयीच्या आधारावर ‘डिक्की’ दलित तरुणांना आत्मविश्वासाने उद्योगविश्वात पावले रोवण्यास मदत करीत आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मतःच एक उद्योजक होते. अखंड अभ्यास, अफाट मेहनत, नीडर वृत्ती, धाडस आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची उर्मी हे एका ‘Entrepreneur’ चे सर्व गुण त्यांच्यात होते. त्यामुळेच आज ते हयात असते तर ‘डिक्की’च्या स्थापनेमागील दृष्टी आणि कार्य यांचे त्यांनी कौतुकच केले असते. बाबासाहेबांचा संघर्ष हा समाजातील उतरंडप्रधान जातिव्यवस्था आणि तिच्यातून निर्माण होणाऱ्या विषमतेविरुद्ध आणि विषमतेतून जन्माला येणाऱ्या पिळवणुकीशी होता. मात्र, बाबासाहेबांनंतरच्या या नेतृत्वाचा सारा भर शिक्षण, राजकारण आणि सरकारी नोकऱ्यांतील आरक्षणावर राहिला. परंतु, हे आधार आता उपयोगी राहणार नाहीत.विषमतेतून सुटका करून घेण्याचे मार्ग शोधण्याशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना सिद्ध करून समाजव्यवस्थेबाबतची एक आदर्श जीवनदृष्टी दिली. त्याचबरोबरीने त्यांना भांडवल बाजाराचे-शेअरबाजाराचे उत्तम ज्ञान होते. त्या काळात स्वतःच्या हिमतीवर मुंबईतील उच्चभ्रूंच्या वस्तीमध्ये स्वतःची वास्तू त्यांनी निर्माण केली. हे कर्तृत्व लहानसहान नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाचे हे पैलू विशेषत्त्वाने भावले आहे. मी ज्यावेळेस माझा उद्योग उभा करण्याचे ठरविले, तेव्हा बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन चरित्रातील अशा विविध पैलूंमधून मला प्रेरणा मिळाली, परंतु त्यांचे आर्थिक समानतेचे जे स्वप्न आहे ते मला आव्हानात्मक वाटते आणि ती आर्थिक समानता निर्माण करायची असेल तर उद्योग-व्यवसाय याशिवाय दलित समाजाला पर्याय नाही, असे वाटते.

 

फॉर्च्यून कन्स्ट्रक्शन’ कंपनी सुरू करून बांधकाम व्यवसायासही सुरुवात केली. त्यानंतर मी आता गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये उतरलो आहे. गार्मेंट इंडस्ट्रीच्या बरोबरीने वेगवेगळ्या व्यवसायातील संधींच्या शोधात आहे. जेणेकरून मी माझ्या अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांपर्यंत त्या पोहोचवू शकेन. ‘डिक्की’च्या माध्यमातून पेट्रोलियम मंत्रालय, अन्न-प्रक्रिया मंत्रालय, संरक्षण मंत्रालयासोबत काम करतो आहे. या मंत्रालयांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या असंख्य संधी दलित तरुणांसमोर ठेवतो आहे. आज दलित समाजात राजकीय, सामजिक, शैक्षणिक, वैचारिक नेतृत्व तयार झालं, परंतु मला ‘बिझनेस लीडर्स’ निर्माण करायचे आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना मी मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही आरक्षणातून आले नाही. त्यांनी स्वतःच्या विद्वत्तेतून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. तसेच आम्ही व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण करू इच्छितो. आम्ही नोकरी मागणारे नाही, तर देणारे होऊ. आज व्यवसाय करणाऱ्यांसाठी Money, Market, Mentoring उपलब्ध आहे. परंतु त्यांनी Patience आणि Passion आपल्या अंगी बाणवले पाहिजे. आजच्या युवकाकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, क्षमता, गुणवत्ता आहे आणि त्याला आकार देऊ शकेल, अशी सरकारची ‘सपोर्ट सिस्टिम’ही आहे. सकारात्मकता आणि समन्वयवादी भूमिका ठेवल्यास हा युवक व्यवसाय-उद्योगक्षेत्रात उच्च शिखर पादाक्रांत करू शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वातील रुबाबदारपणा, निर्भयपणा, वैचारिक पातळीवरील बुद्धिप्रामाण्यवाद या दैनंदिन व्यवहारातही आणण्याचा प्रयत्न करतोय. दलित समाजाला आर्थिक विषमतेच्या दरीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. दिवसरात्र त्यावर मंथन करतोच. परंतु, त्याचबरोबर कृतीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद समाजासाठी केली. ते स्वतः त्याचे लाभार्थी नाहीत. आज आमचं शिक्षण आरक्षणाच्या माध्यमातून झालं, परंतु मी माझ्या मुलीचं शिक्षण मात्र आरक्षणातून करत नाही. आम्ही ते आरक्षण नाकारलं आहे. आज मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना अनेक ठिकाणी सत्कार झाले, पुरस्कार मिळाले. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ देऊन मला २०१३ साली गौरविण्यात आले. त्याचबरोबरीने समाजभूषण, समताभूषण, तसेच अनेक संस्थांनी पुरस्कार दिले आहेत, जे मला समाजासाठी काम करण्यासाठी ऊर्जा देत असतात. जागतिक बाजारपेठेत तुमची गुणवत्ता हीच सर्वश्रेष्ठ राहील. त्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत हीच तुमची साधने असू शकतात. संयम आणि ध्यास तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकेल आणि सकारात्मकता आणि समन्वय तुम्हाला यशाच्या शिखरावर यशस्वीरित्या टिकून राहण्यास मदत करील.

 
 

- मिलिंद कांबळे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/