पोलादी शिस्तीचा तपस्वी मेजर
महा एमटीबी   04-Dec-2018


आज मेजर प्रभाकर बळवंत कुलकर्णी हयात नाहीत. त्यांच्या पत्नी सुषमा यांनी मे. प्रभाकर जिवंत असतानाच्या लिहिलेल्या आठवणी मे. प्रभाकरांचे पोलादी जगणे आणि तितकेच त्यांचे मृदू मन हळुवारपणे उलगडत जाते. मे. प्रभाकर यांचा जीवनपट सुषमा प्रभाकर कुलकर्णी यांच्याच शब्दात..

 

मितभाषी, तरीही वैचारिक आक्रमक असे दोन्ही परस्पर विरोधी गुण असणारं व्यक्तिमत्त्वमेजर प्रभाकर बळवंत कुलकर्णी.’सरांच आत्मचरित्र शब्दांकित करण्याची दुर्लभ संधी मिळणं हे माझं परमभाग्यच आहे. या कार्याला खरेतर खूप पूर्वीच सुरुवात व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही. हे कार्य माझ्याकडून व्हावे याच वेळी व्हावे ही नियतीची इच्छा असावी. माझ्यापेक्षा वयाने दुप्पट मोठ्या असणार्या व्यक्तीच्या आत्मचरित्राची ही जबाबदारी घेताना प्रचंड सतर्कता दाखवावी लागली. चुकून ट्रिगरला धक्का लागू नये, ही काळजी घेत घेतच मी पुढे गेलो. सतत चालत राहण्याचा ध्यास असणार्या प्रवाही जीवनाला विरोध होतोच. त्यातून प्रवाहाच्या उलट दिशेने पोहोण्याचा चंग बांधलेल्यांना तो अधिक असतो. अनेक विरोधांना मेजर सरांना सामोरे जावे लागले. ते सातत्याने सामोरे जात राहिले. या सातत्यामुळे विरोधाची धार कमी होत गेली. गडद ढग, मळभ बाजूला सरत गेले.स्वत:ला उच्चपदस्थ सैनिकी अधिकारी किंवा शिक्षणसम्राट मानणार्या माणसाचा हा जीवनपट आहे. व्रतस्थ शिक्षक म्हणून काम करत प्राचार्य झालेल्या आणि सैन्यात जाऊन मेजरपदापर्यंत पोहचणार्या एका संघ स्वयंसेवकाच्या जीवनप्रवासाचे हे एक प्रवासवर्णन ठरावे.मताशी एकरूप होण्याचा गुण असलेल्या एका बीजाचं वृक्षात रूपांतर होतं, ही नैसर्गिक गोष्ट आहे. असाच नैसर्गिक जीवन जगण्याचा कानमंत्र यातून पुढच्या पिढीला मिळेल, असे वाटते. या आधी काही डॉक्युमेन्ट्री, संहिता, काही सन्मानपत्र आणि व्यक्तिचित्रणाची असणारी अनुभवाची पुंजी या वेळी कामाला आली. सरांनी ही जबाबदारी देताना हाच विचार केला असणार. माणसांचा अभ्यास करावा, त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्यांनी ते कसे आत्मसात केले, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा छंद यानिमित्ताने जोपासला गेला. कोणताही संघर्ष सोडा पण, वाद घालण्याचीही माझी वृत्ती नाही. साधं भांडण करणंही ज्याला जमलं नाही आणि अशा माणसाने तीन युद्ध केलेल्या माणसाबद्दल लिहायचं, हे अवघड होतं. पण सरांनी ते सहज साध्य करून दिले

 

८५ वर्षांच्या या चालत्या-बोलत्या दिमाखदार बुरूजाची माहिती संकलित, शब्दांकित झाल्यावर त्यासाठी आदरणीय बाबासाहेब पुरंदरेंची प्रस्तावना मिळणं किती आनंददायी असेल, याची कल्पनाही कोणी करू शकेल. पुस्तकात प्रकाशित होणारी माहिती, प्रकरणांची मांडणी, फोटो, कागदपत्रे या सगळ्या गोष्टी मेजर सरांकडच्याच. त्याला त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहून काढण्याचं काम मी केलं आहे.या पलीकडे माझे डिफेन्स मी काय म्हणणार? एकाच व्यक्तीला आयुष्यात इतक्या वेगवेगळ्या संधी मिळणं दुर्लभ असतं. सरांना त्या मिळाल्या. या सैनिकातल्या शिक्षकाला आणि शिक्षकातल्या सैनिकालाशतायुषी होऊ देहीचश्रीरामचरणी प्रार्थना ! या पुस्तकाचं शब्दांकन किंवा प्रसंग शब्दांकित करताना कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. नकळत तसे घडले असल्यास क्षमस्व! विनंतीपूर्वक, माझे सर्वस्व

 

नमस्कार!

मी सौ. सुषमा प्रभाकर कुलकर्णी, मेजर प्रभाकर बळवंत कुलकर्णी यांची पत्नी. माझ्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. त्यांना ओळखणार्यांपैकी बर्याच लोकांना माझं नावही माहीत नाही आणि ते असण्याचं काही कारण नाही. हा निसर्गनियम आहे. त्यात वावगं मुळीच नाही. अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची सावली बनण्याचं भाग्य मला मिळालं आहे. मी खूप आत्मचरित्र बघितली आहेत. पण पतीच्या आत्मचरित्रात पत्नीला भावना व्यक्त करायला लावणारं आत्मचरित्र माझ्या पाहण्यात कुठे आलं नाही. माझा जन्म एका स्वातंत्र्यसैनिकाच्या घरातला. आम्ही मूळ वांबोरी, अहमदनगरचे. कोटस्थान कुटुंब बर्यापैकी परिचित. मी तिथेच वाढले. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगरलाच पार पडले. शिकत असताना लग्नाचा विषय निघाला. कुलकर्ण्यांच्या घरात माझं भावी आयुष्य जाणार हे नक्की झाल. प्रभाकर कुलकर्णी तेव्हा आजच्या एवढं नसलं तरी, प्रसिद्ध होतं. हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व पुढे असं सिद्ध होईल असं वाटलंही नाही. मला नाटकाची आवड होती. मी काही नाटकांतून कामे केली. यांना भाषणाची आवड. ‘व्यासपीठहा आमच्या आवडीचा कॉमन फॅक्टर. शाळेतली यांनी केलेली बंडखोरी, मित्रमंडळीत वागताना, वावरतानाचे यांचे वर्तन, दंगेधोपे झाले तर सगळ्यात पुढे असणारे प्रभाकर कुलकर्णी अशा अर्थाने लोकांना माहीत होते. माझ्या मैत्रिणींनी माझी खूप मस्करीही केली. पण लोकांच्या मदतीला धावून जाणारे, रात्री-अपरात्री दूरवर जाऊन दुर्मिळ रक्तगट असल्याने रक्त देऊन अभिमानाने परत येणारे, कुणाकडे दु:खद घटना घडली, तर खांदेकरी म्हणून पटकन मदतीला जाणारे असेच त्यांचे रूप माझ्यासमोर येत राहिले. मी भारावले होते. आमचं लग्न झालं. आम्ही नाशिकला आलो. भोसला मिलिटरी स्कूलचे नाव खूप ऐकून होतो. तिथे यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. एका शिक्षकाची पत्नी हीच माझी ओळख. नगरच्या आमच्या दुमजली ऐसपैस वाड्यात एकत्र कुटुंबात राहण्याची माझी सवय. इथलं घर चालवायला सुरुवात केली की, सगळं संपून जायचं. घरात आम्ही दोघे. संसार मांडायला हळूहळू सुरुवात केली. भांडी हवी होती. दोन-तीन वेळा यांच्या कानावर घातले. यांनी ऐकून ऐकल्यासारखे केले. बर्याच दिवसांनी मला गावात घेऊन गेले. मला अजून आठवतं, काळेंच भांड्यांच दुकान. भांडी बाजार परिसर, सरकारवाडा वगैरे भाग. बंब, कढई, तवा, परात, ताट, वाट्या, तांब्या, भांडी, चमचे, पळ्या, पंचपात्री खरेदी केले. जे घेतले ते उत्तम प्रतीचं घेतलं. यांनी रूबाबात सगळे पैसे देऊन टाकले. सामान टांग्यात टाकून आम्ही घरी आलो. दोन दिवसांनी शेजारीकडून कळले, नुकताच पगार झाला होता. माझ्या बोलण्याकडे यांनी दुर्लक्ष करण्याचा उलगडा झाला. माझ्या पतीबद्दल अभिमान वाटावा, असे प्रसंग दररोज घडत गेले. ओळख असूनही उधारी करायची नाही हे त्यांचे तत्त्व होते.

 

गुरुजी आमच्या लग्नाला आले नव्हते. पण लग्नानंतर खास आशीर्वाद द्यायला आले. नवीन लग्न झालेले असल्याने मला त्यांचे आदरातिथ्य करताना यांची जी मदत झाली ती शब्दातीत आहे. आमच्याकडे संघाचे सर्वेसर्वा असणारे गुरुजी प्रत्यक्ष येऊन गेले. त्यांचे मला आशीर्वाद मिळाले. ते केवळ माझे भगव्या कुंकवामुळे. यांची धर्मपत्नी असल्याचा मला अभिमान वाटला. पुढे यांना स्कूलचे प्राचार्य, कमांडंर म्हणून काम करायला मिळाले. यांनी कुणाच्या पोटावर कधी मारल्याचे ऐकीवात नाही. लोक यांच्याकडे त्यांचे विचार घेऊन तावातावत यायचे. बाहेर पडताना त्यांचे विचार घेऊन शांतपणे बाहेर पडायचे. आर्थिक बाबतीतील त्यांची धोरणे आजही स्पष्ट आहेत. काटकसर करायची, कंजूषी नाही, पैसा शिल्लक राहिलाच पाहिजे. तरुणपणी (आजही तसे ते तरुणच आहे.) त्यांना अत्तराचा भारी शौक. थोडे पैसे उरत आहेत, इतर खर्च नाही, हे लक्षात आले की कुठल्यातरी छान प्रसन्न अत्तराची खरेदी ठरलेली. निवृत्तीच्या आसपास आम्ही जवळच जमिनीचा तुकडा घेऊन घर बांधले. यांनी प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवला. वीटवाल्याला प्रत्येक विटेवर राम हे अक्षर कोरायला लावले. तसे वेगळे साचे बनवायला लावले. मोठ्या हौशीने घर पूर्ण झाले. खर्ची पडलेल्या पै-पैचा हिशेब ना. . गर्गे नावाचे प्रसिद्ध ऑडिटर होते. त्यांच्याकडून तपासून घेतले. आजही त्यांची शिस्त कायम आहे. महिन्याच्या तारखेला बरोबर अपॉइंटमेंट ठरलेली. शुकवारी भावांना, शनिवारी बहिणींना, रविवारी इतर चार ते पाच घरी फोन चुकता असतात. बाग, कुंड्या, रोपे यांच्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते.

वज्राहून कठोर असणारे माझे पती लोण्याहून मऊ अंत:करणाचे आहेत. अतिशय कुटुंबवत्सल आहेत. आमच्या कन्येला पुण्यात उत्कृष्ट ठिकाणी नोकरी लागली होती. पण ती डोळ्यासमोर हवी म्हणून तिला त्यांनी नाशिकला आणलं. आमचा सारंग जन्मत: कर्णबधीर आहे. त्याला मायको-बॉश कंपनीत नोकरी मिळाली. एकदा रात्रपाळीत त्याचा अपघात झाला. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. यांनी खूप धावपळ केली. तो बरा होऊन घरी आला. ५०-५५ वर्षांच्या सहवासात मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या बघितल्या. शिक्षकातला, सैनिकातला पिता सहचारी म्हणून मला त्या प्रसंगात दिसला. समाजात संस्कारहीन माणसं असतातच. यांच्यावर भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे आरोप करणारे दोन प्रसंग आले. त्यावेळी संस्कारहीन माणसं बरी पण, हीन संस्कारांची माणसं फारच वाह्यात आणि विक्षिप्त असतात. हे आमच्या कुटुंबीयांना जाणवले. दोन्ही प्रसंगांत आम्ही अतिशय व्यथित झालो होतो. ही हीन संस्कारांची सामाजिक कीड लवकरच संपायला हवी. आरोप करणारे ककून्स कुठे आणि माझे कुंकू कुठे. आजही हा ग्रेट माणूस डायबिटीस असून सगळे जेवल्याशिवाय घरात जेवत नाही. कुठे जखम झाली, तर स्वत: ड्रेसिंग करणार, स्वत:चे इन्सुलिन इंजेक्शन स्वत: इंजेक्ट करून घेणार.

 

आयुष्यात यांनी ना कुणावर अन्याय केला, ना कुणाचा अन्याय सहन केला. आमची नात यांनाब्रेव्ह हार्टम्हणते. आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. तरीही आम्ही जगातल्या कुठल्याही भयानक आपत्तीला सामोरे जायला तयार आहोत, सक्षम आहोत, हा आत्मविश्वास आमच्यात यांनी निर्माण करून ठेवला आहे. ध्येयाने पछाडलेल्या, त्यासाठी अत्यंत बेचैन असणार्या माझ्या पतीचं वेगळेपण मी खूप खूप अनुभवले आहे. नात्यातल्या मुलांना शिक्षणासाठी ठेवून घेणे, त्यांना शुल्कासाठी पैसे देणे, एकदा तर पैसे कमी होते म्हणून माझे बांगड्याही आम्ही सहज गहाण टाकल्या होत्या. लग्न झालं की, पहिल्या वर्षी नवरा बोलतो, बायको ऐकते. दुसर्या वर्षी बायको बोलते, नवरा ऐकतो. नंतर दोघे बोलतात आणि शेजारी ऐकतात, असे गंमतीने म्हटले जाते. आमचा संवाद मात्र शब्दापलीकडचा होता. त्यांच्यातले नेतृत्वगुण, परिपक्वता, निर्भीडपणा मला भावतो. अगदी अलीकडे ते पडले. डोक्यावरच पडले. दवाखान्यात डॉक्टरांचे चेहरेही चिंतीत होते. दुसर्या दिवशी यांनी मला बोलावले. माझा हात हातात घेतला. मी भयानक धास्तावले. खोल गेलेल्या आवाजात यांनी सांगितले, “सुषमा, हे दोन डॉक्टर आहेत ना, एकाचं वय ४०, एकाचं ४२. दोघांच्या वयाची बेरीज केली तरी, मी वर्षभर अनुभवाने मोठा आहे. काळजी करू नकोस.” पती-पत्नीचं नातं अनुभवणार्या माणसांना माझ्या पतीच्या विचारांची खोली आणि विश्वासाची उंची लक्षात येईल. हे बरे झाले आणि घरी आले. दारातून येतानाच म्हणाले, “आय हॅव केप्ट माय प्रॉमिस.”त्यांच्या वागण्या-बोलण्यातली डिसेन्सी हजारो विद्यार्थ्यांमध्ये भिनली आहे. विद्यार्थी एकटे असतील, त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये असतील आणि त्यांना काही खायचे असेल, तर ते डब्यात हात घालून खाणार नाहीत. प्लेटमध्ये घेऊनच खातील. पाणी ग्लासमध्येच पितील. ही घडणावळ सगळी सरांची.घोडेस्वारी करणारा, तोफा, दारुगोळा यांचा सामना करणारा, जलतरण तलावामध्ये बेधडक डाइव्ह मारणारा हा हिरो किचनमध्ये मात्र झिरो आहे. हे माझ्याखेरीज कुणालाच माहिती नाही. अहो, यांना कपभर चहा पण कधी करता आला नाही.

 

यांनी खूप कष्ट केले. खूप कार्य केले. मी फक्त या नायकाला आधार देत राहिले. त्यांची चीड, संताप, व्यथा, नैराश्य, आनंद, समाधान व्यक्त करण्याचा एक डायस बनण्याचं काम मी प्रांजळपणे केले. हे माझ्यावर अवलंबून आहेत, याची मला जाणीव आहे आणि म्हणूनची मी स्वत:ला नीट आणि फीट ठेवण्याचा प्रयास करीत राहिले. बाहेर जिंकून आत हरलेली अनेक माणसं यांना आडवी आली. पण हे अंतर्बाह्य विजेतेच असल्याने मार्गक्रमण करीत गेले. ज्यांच्या मनात शांतता असते, त्यांच्या घरात शांतता असते आणि ज्यांच्या घरात शांतता असते तोच माणूस लढवय्या होते. स्वत:च्या घरात आग लागली, तर देशभराची आग विझवायला कुणी धावत नाही. मुलगा झाला, तर तो सैन्यात जावा अशी आमची इच्छा होती. ‘मगर वह हो सकाउभं आयुष्य ज्या माणसानं कार्याला दान केले, त्या दानाची साधी पावती देण्याची दानतही काहींनी दाखविली नाही. आपल्याजवळ जे आहे. ते पुरेस आहे, याची जाणीव म्हणजे श्रीमंती. ही श्रीमंती आमच्याकडे खूप होती, आहे आणि राहील. भोसलात आमच्या कुटुंबाचे दिवस खूप छान गेले. काळासोबत पुढे सरकावं लागतं. पुन्हा ते अनुभव येणे नाही. आयुष्याच्या वाटेवर वन वे तोडून उलट्या दिशेने जाण्याची प्रोव्हिजनच नसते. माझ्या जन्माचं सार्थक मेजर फॅक्टर प्रभाकर बळवंत कुलकर्णीच आहेत. सैन्यातल्या उच्च अधिकार्यांच्या बायकांनाही बघायला मिळत नाहीत, अशी मोठी माणसं मी जवळून बघू शकले. ८५ वर्ष वय असणार्या मेजर कुलकर्णींचा आम्हाला आज आधार वाटतो. त्यांचंअस्तित्वंच पुरेसं असतं. ‘मॅच्युरिटी मॅटर्सम्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर म्हणजे माझे पती. लास्ट ड्रॉप ऑफ ब्लड लास्ट बुलेट आय विल फाईटही वृत्ती त्यांनी बाळगली. तात्यासाहेबांनी एका कवितेत म्हटले आहे, त्याचा संदर्भ वेगळा असला तरी मला म्हणावेसे वाटते मला ज्ञात मित्रा, तुझी थोरवी अन् मी एक धुलिकण अलंकारण्याला परि पाय तुझे धुळीचेच आहे, मला भूषण मध्यंतरी माझ्या वाचनात एक सुरेख इंग्रजी कविता आली, ती इंटरनेटवर असावी. माझ्यापर्यंत फक्त कागद पोहोचला. ती कविता माझ्या आयुष्याशी मिळती-जुळती वाटली. त्याच्या ओळी अशा आहेत

 

This is about me and how I survive praying each day he'll come home alive.

I wake up each morning and smile at him, it's one more day I'll get to meet him again

He leaves the house day after day, Doing his job for very little pay.

He does what he can to protect and serve, Without receiving the benefits he so deserves.

It's me at home afraid to turn on the news, What happened today and who did we loose.

Officers, each day I shed a tear For the wives and families and all they hold dear.

I'm no longer a rookie my husband is on five years, You would think I'd be stronger but I'm still filled with fear.

We have a family, they bring us love and joy, - daughter of for and, a nine-month old boy.

I do what I can to hold us together, I'm here for him; I'll love him forever.

Sometimes I think here I'm at home why do I feel like

I'm so alone? Is anyone out there feeling this way? Taking care of the family and surviving each day.

This something I chose; it's a part of my life, It is the role I took, I'm the officer's wife.

 

स्वत:शी बंडखोरी करू शकणारा समाजात बेधडक बंडखोरी करू शकतो आणि स्वत:वर प्रेम नसेल, तर माणूस देशावर कधीच प्रेम करू शकत नाही, हे माझ्या पतीच्या आयुष्याचं मी केलेले प्रामाणिक परीक्षण आहे. भोसलाच्या नावावर आणि जीवावर मेजर मोठे झाले, असेही अनेकांनी ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात ओरड करायची गरज काय? मेजर स्वत: सांगतात कायम की, “मी जे काय आहे ते या रामभूमीमुळे आणि मातीमुळे.” आपण विरोध करतो आहोत की, दुजोरा देतो आहोत हेही माणसांना समजू नये, हे हास्यापद आहे.आजही यांच्या हालचालीवर घड्याळाचे काटे फिरतात, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा शहेनशहा बेडरूममध्ये प्रवेश करतो तेव्हा घड्याळाचे काटे काटकोन करून :०० वाजायची वेळ दाखवतात. यांच्या एन्टी बरोबरच टीव्हीसुद्धा सिरियलचे चॅनल बदलून बातम्या द्यायला लागतो. कुठे काय झाले, त्यावर काय केलं पाहिजे हे सांगत राहतात. मी झोपी जाते. आजही कधी कधी हे युनिफॉर्म घालून युद्धावर निघालेत अशी स्वप्न पडतात. डोळे उघडून बघते, तर सगळीकडेब्लॅक आऊटझालेला असतो. हे शांतपणे झोपलेले असतात. त्यांच्या मनातले निरागस, निष्पाप भाव चेहर्यावर उमटलेले असतात. माझे हात कृतज्ञतेने जोडले जातात. मी मनात प्रार्थना करते, “देवा, यांना दीर्घायुष्य दे. पुन्हा पुन्हा सगळ्या जन्मात मला हाच पती दे आणि हेच असंच आयुष्य प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जगण्याची एक संधी अजून दे. सगळा देशच ज्याचा देव आहे. तो माझा पती देव आहे. प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद, हजारो चाहते, विद्यार्थी यांच्या शुभेच्छा आणि जन्मभर केलेल्या यांच्या पुण्यसंचायाचाच आमच्या कुटुंबीयांना आधार आहे. लक्षाधीश, कोट्यधीश नसलो तरी, आम्ही गर्भश्रीमंती आहात.” आम्हा दोघांच्या पश्चात आमच्यावर निस्सिम, निरपेक्ष प्रेम करणारी ही माणसं म्हणजे यांनी आमच्या सारंग, सौ संपदा, अंजली, वैष्णवी यांच्यासाठी तयार करून ठेवलेली आमची इस्टेट आहे. प्रत्येक वेळी कुंकूलावताना तिरंग्याचे स्मरण कर हे सांगणार्या या योध्याबद्दल मी आणखी काय लिहू ? तिरंग्याचे स्मरण दीर्घकाळापर्यंत करण्याची संधी मला मिळो, हीच श्रीरामचरणी प्रार्थना.

 

मेजर पी. बी. कुलकर्णी श्रद्धांजली सभा

 

श्रद्धांजली सभा दि. गुरुवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ऑडिटोरियम, डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड कम्प्युटर स्टडीज, भोसला मिलिटरी कॉलेज कॅम्पस, रामभूमी, नाशिक होणार आहे. श्रद्धांजली सभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर संघचालक विजयराव कदम व सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी समितीचे सदस्य प्रकाश पाठक हे उपस्थित राहणार आहेत.

- सुषमा कुलकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/