रोगनिवारणामधील अडथळे (भाग 3) (Obstacle to Cure)
महा एमटीबी   04-Dec-2018


गनिवारणातील अडथळे जाणून घेताना आपण आहारातील दोन किंवा इतर सवयींबद्दल जाणून घेत आहोत, ज्याच्यामुळे रोग बरा होण्यास वेळ लागतो. याच प्रकारातील एक प्रमुख अडथळा म्हणजे आजूबाजूचे वातावरण (Environmental Conditions) आपण ज्या वातावरणात व परिस्थितीत राहत असतो, त्याचा आपल्या शरीर व मनावर सतत परिणाम होत असतो. या वातावरणातील दूषितपणामुळे अनेक तक्रारी उद्भवतात. उदा. ज्या रुग्णाला दम्याचा त्रास आहे किंवा श्वसन संस्थेशी निगडीत असे आजार आहेत, त्यांनी धुळीपासून किंवा धुरापासून आणि दमट जागांपासून दूर राहावे, अशी अपेक्षा असते. पण जे लोक अशाच वातावरणात राहतात, त्यांचे हे आजार बरे होण्यास अडथळे निर्माण होतात. हल्लीच्या काळात वेगवेगळे रासायनिक कारखाने आणि इतर अनेक उद्योग प्रमाणाच्या बाहेर वाढल्यामुळे साहजिकच त्याच्यामुळे प्रदूषण होते व या प्रदूषणामुळे रोगानिवारणामध्ये अडथळे येऊ लागतात.

 

काही वेळा आपण असे पाहतो की, व्यावसायिक गरजांमुळेसुद्धा लोकांना त्रास होत असतो. उदा. हल्ली बहुतेक लोक मानेच्या दुखण्याबाबत तक्रार करत असतात. तपासात असे लक्षात येते की, त्यांंना सरव्हायकल स्पॉन्डीलेसिस झालेला असतो. कितीही औषधे घेऊनही हे दुखणे बरे होत नाही. तेव्हा असे लक्षात येते की, ही मंडळी तासन्तास संगणकासमोर मान खाली घालून काम करत असतात. साहाजिकच या व्यावसायिक गरजेमुळे मानेच्या स्नायूंवर सतत ताण येऊन हा आजार झालेला असतो. रोगनिवारणातील अडथळ्यांचा विचार करताना आणखी एक गोष्ट लक्षात येते की, काही देश वा प्रदेश ज्याठिकाणी सर्वसामान्य लोकांचे राहणीमान ठीक नसते, तसेच आर्थिक परिस्थितीही चांगली नसते, अशा ठिकाणी त्या लोकांच्या आहारावर व स्वच्छतेवर परिणाम होत असतो. शिवाय ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग असतो, त्या ठिकाणी पाण्याची टंचाई असते, अशा ठिकाणी आहाराच्या पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात व ते आजार जोपर्यंत कमरता दूर होत नाही तोपर्यंत बरे होत नाही.

 

हल्लीच्या काळातील एक अतिशय गंभीर समस्या म्हणजे ‘सेल्फ मेडिकेशन’ म्हणजे स्वत:च ठरवून औषधे घेणे व ‘ओव्हर मेडिकेशन’ म्हणजे औषधांचा भडिमार करणे. बरेच लोक स्वत: पुस्तके वाचून किंवा गुगलवर सर्च करून स्वत:च औषधे घेतात. असे दिसून येते की, थोड्या थोड्या कारणासाठी लोक वेदनाशामक औषधे (Pain Killer) घेत राहतात. ही वेदनाशामक औषधे ही NSAID प्रकारातील असतात आणि चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, ही वेदनाशामक औषधे सतत घेतली, तर त्यांचा थेट दुष्परिणाम हा मूत्रपिंडावर व यकृतावर (Liver) होत असतो. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाचे विकार समाजामध्ये फार वाढल्याचे दिसून येते. या शिवाय सततची प्रतिजैविके म्हणजे अ‍ॅन्टीबायोटिक्स व वेदनाशामक औषधे घेत राहिली, तर नंतर या औषधांचा परिणाम शरीरावर होईनासा होतो. त्याचबरोबर शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा कमी होते व चैतन्यशक्तीसुद्धा कमकुवत होते. या सर्व कारणांमुळे असलेला आजार बरा होण्यास जास्त कालावधी लागतो. थोडक्यात काय, तर जेव्हा माणूस निसर्गाच्या विरोधास जाऊन काम करतो, तेव्हा निसर्गाचा कोप त्याला सहन करावाच लागतो. नैसर्गिक उपचार सोडून जेव्हा हानिकारक उपचार घेतले जातात, तेव्हा आजार बरा न होता दाबला जातो व तो पूर्ण बरा होण्यास मग अडथळे निर्माण होतात.

 
 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

9869062276