अवघ्या काही तासांतच ‘सिम्बा’ लीक
महा एमटीबी   29-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : या शुक्रवारी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला, समिक्षकांनी दमदार मसालापट म्हणून त्याचे भरभरून कौतुकदेखील केले, प्रेक्षकांच्याही हा सिनेमा पसंतीस उतरत आहे. आनंदाच्या भरात सिनेमागृहाच्या छपरावर चढून अभिनेता रणवीर सिंह तुफान नाचला. परंतु त्याचा हा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण ‘सिम्बा’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच तो लीक करण्यात आला.
 

या पायरसी मागे ‘तामिळरॉकर्स’चा हात असल्याचे समोर आले आहे. ‘तामिळरॉकर्स’च्या वेबसाईटवर हा सिनेमा लीक करण्यात आला. अशाप्रकारे सिनेमा पायरसीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘झिरो’, ‘केजीएफ' हे सिनेमेदेखील ‘तामिळरॉकर्स’कडून लीक करण्यात आले होते. तामिळरॉकर्सच्या २ हजारांहून अधिक मायक्रोसाईट्ही आहेत.

 

तामिळरॉकर्सकडून यापूर्वीही अनेक सिनेमे लीक करण्यात आले आहेत. ‘२.०’ या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी तामिळरॉकर्सविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच पार्श्वभूमीवर ‘२.०’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्यावेळी १२ हजार वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते. एवढी काळजी घेऊन देखील ‘२.०’ हा सिनेमा लीक करण्यात आला. केवळ हिंदी व दाक्षिणात्य सिनेमेच नव्हे तर हॉलिवुडचे अनेक सिनेमेदेखील तामिळरॉकर्सकडून लीक केले जात आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/