राजकारणाचा चित्रपट आणि चित्रपटांचे राजकारण
महा एमटीबी   29-Dec-2018


 


माध्यमे ही कधीही निरपेक्ष नसतात, तर ती कालसापेक्ष, समाजसापेक्ष असतात. आपल्या सभोतालच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय किंवा तांत्रिकी प्रक्रियांचा प्रभाव माध्यमांवर होत असतो आणि चित्रपट हे यातील महत्त्वाचे आणि मोठे माध्यम आहे. साधारणतः चित्रपटाचा आदर्शवादी किंवा भाववादी असा विचार करतो. मात्र, चित्रपट हा बहुतांशी वेळा सभोवतालच्या भौतिक गोष्टींवर आधारलेला असतो. भौतिक जगातील परिवर्तनाचे प्रतिबिंब चित्रपटातदेखील पडते. याचे अनेक दाखले आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटातून बघता येतील. तत्कालीन आणि समकालीन घटकांचा प्रभाव चित्रपटावर पडत असतो. काहीवेळा ऐतिहासिक गोष्टींचासुद्धा प्रभाव चित्रपटाच्या पटकथेवर, निर्मितीवर, प्रस्तुतीवर होत असतो. भारतीय चित्रपट या गोष्टींना अपवाद नाही. चित्रपटाचे किंवा इतर माध्यमांचे जरी प्रत्येकी वेगळे अस्तित्व असले तरी, त्यावेळच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेचे हे 'ब्रॉडकास्ट' असतात आणि कोणत्याही राज्याच्या किंवा राष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचा थेट प्रभाव या माध्यमांवर पडत असतो.

 

सध्याचा समकालीन वाद काय?

 

लवकरच दोन राजकीय चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. परंतु, ते वादग्रस्त ठरतील, अशी चिन्हे आहेत. ते चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादग्रस्त ठरत आहेत.ते चित्रपट म्हणजे, 'ठाकरे' आणि 'Accidental Prime Minister.' यापैकी नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका वठवलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरवरूनच या चित्रपटाची दशा आणि दिशा काय आहे, ते समजते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि अभिजीत पानसे हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद यामुळे हा चित्रपट वादग्रस्त ठरेल, अशी चिन्हे आहेत. संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित Accidental Prime Minister' हा अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन विजय गुट्टे यांनी केले आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटावर दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. २०१९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरणनिर्मिती होईल. मुळात हे चित्रपट राजकीयदृष्ट्या किती वातावरण तापवतील, हा भाग वेगळा. अनेक वेळा राजकारणावर आधारित चित्रपट प्रदर्शित होतात, ते वादग्रस्त ठरतात आणि या चित्रपटांना घेऊन हे राजकीय पक्ष आपली पोळी भाजतात, हे दृश्य भारतीय चित्रपटजगतात दिसून येते. राजकारणातील भ्रष्टाचार, घोटाळे हे चित्रपटाच्या पटकथा लेखकाला, दिग्दर्शकांना, निर्मात्यांना नेहमीच आकर्षित करतात. आणि त्यावर तयार झालेले चित्रपट हे नेहमीच वादग्रस्त ठरतात. थोडक्यात, असे चित्रपट आत्तापर्यंत कसे होते किंवा कोणकोणते होते, याचा थोडासा आढावा घेऊया, ज्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला अधिक स्पष्टरीतीने कळून येतील.

 

चित्रपटांचा सुरुवातीचा काळ आणि राजकीय चित्रपट

 

भारतीय चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट पूर्णतः पौराणिक, ऐतिहासिक कथानकांमध्ये गुंतलेला होता. दुसरीकडे, भारतातील शासनव्यवस्था ही इंग्रजांच्या प्रभावाखालील किंवा इंग्रजांचीच होती. याचा परिणाम मूकपट आणि बोलपटांवर दिसून आला. त्यामुळे त्यावेळच्या सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत हे चित्रपट अडकायचे. त्या काळातील सगळे पौराणिक चित्रपट म्हणजे अगदी राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद, भक्त हनुमान, रावण वध, राधा-कृष्ण; तर कथानकांवर आधारित असणारे सती-सावित्री, अलिफ-लैला, लैला-मजनू, हिर-रांझा असे चित्रपट दिसतात. हे चित्रपट काल्पनिकतेकडे झुकणारे आहेत. मात्र, गांधीयुगाचा चित्रपट निर्मात्यांवरती किंवा चित्रपट दिग्दर्शकांवरतीसुद्धा प्रभाव पडला त्याचा परिणाम म्हणजे अशोककुमार यांचा 'किस्मत' हा चित्रपट, जो त्यावेळी खूप गाजला. या चित्रपटात 'दूर हटो ए दुनियावलो, ये हिंदुस्तान हमारा है!' हा एका अर्थाने इंग्रजांना दिलेला इशारा होता. मात्र, या चित्रपटांचे स्वातंत्र्यापूर्वी प्रमाण कमी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळाले आणि समकालीन गोष्टी चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होऊ लागल्या. 'नेहरूकालीन समाजवाद' हा त्याकाळातील चित्रपटांमध्ये दिसून येतो आणि या 'नेहरूकालीन समाजवादा'मध्ये असलेल्या विसंगतींवरतीसुद्धा हा चित्रपट बोट ठेवतो. तत्कालीन राजकारणावर आधारित गाजलेला चित्रपट म्हणजे बिमल रॉय यांचा 'दो बिगा जमीन.' त्याचप्रमाणे 'नया दौर' चित्रपटामध्ये मनुष्य आणि यंत्राचा संघर्ष दिसतो. 'नीचा नगर' चित्रपटात सामाजिक वर्गांचा संघर्ष दाखवला आहे. 'जागते राहो'मध्ये राजकपूरने त्यावेळच्या समकालीन व्यवस्थेवरती टीका केली. यानंतरच्या राजकपूरच्या चित्रपटांमध्ये म्हणजे 'श्री ४२०, ' 'बुटपॉलिश,' 'फर सुबह होगी' या सगळ्यांमध्ये आपल्याला कुठेतरी त्या काळातील महत्त्वाच्या घडामोडी दिसतात. त्या दृष्टिकोनातून चित्रपटाचा नायक हा संघर्ष करताना दिसतो. मात्र, आणीबाणी पूर्वीच्या काळापर्यंत चित्रपटांमध्ये राजकारणाला महत्त्व दिलं जात नव्हतं. मात्र, आणीबाणीच्या आधी 'आंधी' हा गुलजारांचा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची प्रमुख भूमिका होती. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, असं सांगून या चित्रपटाची चर्चा झाली. त्यामुळे हा चित्रपट हा खूप चांगला चालला. याची गाणी प्रसिद्ध झाली. पण, चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला. या चित्रपटाच्या विरोधात आंदोलने झाली. असा सगळा इतिहास 'आंधी'ने घडवला. याच काळात मराठीत 'सामना,' 'सिंहासन' असे चित्रपट डॉ.जब्बार पटेल यांनी काढले. आणीबाणीच्या काळावर आधारित अमृतलाल नहाटा यांनी 'किस्सा कुर्सी का' हा चित्रपट राज बब्बर आणि शबाना आझमी यांना घेऊन निर्माण केला. हा चित्रपट सेन्सॉरमध्ये अडकल्यामुळे त्यावेळी तो प्रदर्शित झाला नाही. आणीबाणीनंतर व्यावसायिक चित्रपटांची लाट आली. या लाटेत अनेक राजकीय चित्रपट आले.

 

अमिताभचा 'अँग्री यंग मॅन' आणि त्याची सामाजिक बाजू

 

अमिताभ बच्चन मुळात ज्यावेळी पडद्यावर अवतरला तो काळ राजेश खन्ना यांची रोमँटिक चित्रपट किंवा शोकांतिका असा होता. एकापाठोपाठ एक चित्रपट राजेश खन्ना यांचे 'सुपरहीट' ठरत होते. अमिताभ यांनी 'जंजिर'द्वारे 'अँग्री यंग मॅन' हा पडद्यावर साकारला आणि त्यावेळचे समकालीन वास्तव पडद्यावर मांडले. लोकांच्या मनात असलेला आक्रोश, बेरोजगारी, भ्रष्टाचार, वशीलेबाजी, गरिबी या समस्या त्यांनी चित्रपटाद्वारे पडद्यावर मांडल्या. त्यामुळे लोकांना त्यांचं प्रतिनिधीत्व करणारा नायक अमिताभच्या रुपाने दिसू लागला. या चित्रपटानंतरचे अमिताभचे चित्रपट त्याच पठडीतले होते. 'दिवार,' 'त्रिशूल,' 'शोले' असे चित्रपट समकालीन मुद्दे आणि राजकीय विषय यांच्यावर आधारित होते. अमिताभ आणि श्रीदेवी यांचा 'इन्क्लाब' हा चित्रपट पूर्णत: राजकारणावर आधारित होता. त्यात कादर खान यांची त्यात प्रमुख भूमिका होती. एक मंत्रीच शेवटी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला मारून टाकतो, असा किस्सा त्यात दाखविण्यात आला होता. त्यानंतर गुलजारसारख्या संवेदनशील माणसाने राजकारण याविषयावर चित्रपट बनविण्यात रस घेतला. 'हुतुतू' हा नाना पाटेकर आणि तब्बू यांना घेऊन राजकारणावर, भ्रष्टाचारावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यात लोकांच्या मनात असलेली राजकारणाविषयीची चीड दाखविण्यात आली. युवा राजकारणावर आधारित 'मेरे अपने' हा चित्रपटसुद्धा त्यांचाच.

 

संवेदनशील चित्रपट निर्माते आणि राजकारण

 

इतर संवेदनशील चित्रपटांत गोविंद निहलानी यांचं नाव घेता येईल, त्यांनी 'धृवकाल' नावाचा चित्रपट निर्मित केला. अनुराग कश्यप याने 'गुलाल' नावाचा विद्यार्थी राजकारणावर आधारित एक चित्रपट केला, ज्यात के.के. मेमन यांची प्रमुख भूमिका होती आणि तो चित्रपट प्रचंड गाजला. मणिरत्नमसारख्या दिग्दर्शकानेसुद्धा अजय देवगण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी यांना घेऊन 'युवा' हा चित्रपट प्रदर्शित केला. एस. शंकर यांनी अमरिश पुरी, अनिल कपूर आणि राणी मुखर्जीला घेऊन 'नायक' हा चित्रपट तयार केला, जो आजही प्रसिद्ध आहे. प्रकाश झा हे एकेकाळी कलाआधारित चित्रपट किंवा समांतर चित्रपट तयार करत. पण, त्यांनी ही 'राजनीति,”सत्याग्रह' असे चित्रपट अगदी दिग्गज कलाकारांना घेऊन केले. याखेरीजसुद्धा अनेक चित्रपट असे आहेत की, जे राजकारणावर आधारित होते. 'डर्टी पॉलिटीक्स' चित्रपटाचे के.सी. बोकाडीया हे निर्माते होते आणि नसिरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या मोठ्या भूमिका त्यात होत्या. हा चित्रपट मध्यंतरी आला होता. मराठीमध्ये राजकारणाला महत्त्व दिलेल्या 'सरकारनामा,' 'झेंडा,' 'देऊळ' या चित्रपटांची रांग पाहायला मिळते. या वेगवेगळ्या कालखंडामध्ये गाजलेले राजकीय मुद्दे चित्रपटांचा विषय असतात किंवा चित्रपटात राजकारणाचा तडका लावला जातो.आणि त्यानुसार चित्रपटाला रंग चढवला जातो.

 

व्यावसायिक चित्रपट निर्माते आणि राजकीय चित्रपट

 

मधुर भांडारकर यांनी संजय गांधी यांच्यावर आधारित 'इंदु सरकार' नावाचा चित्रपट काढला होता, ज्याला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. याच काळात मिलन लुथिया यांनी 'बादशाव' नावाचा चित्रपट निर्मित केला, जो आणीबाणीवर आधारित होता. या चित्रपटावर कोणी जास्त बोट उचलले नाही. मात्र, 'इंदु सरकार'बद्दल खूप मोठ्या प्रमाणात वाद झाले. सुधीर मिश्रा यांनी 'हजारो ख्वायिषे' तयार केले, ज्यामध्ये राजकारण हे दिसून आले. मणिरत्नम यांनी 'रोझा' चित्रपटात त्यावेळचा काश्मीरचा प्रश्न हाताळला होता. शशी कपूरचा 'न्यू दिल्ली टाइम्स' हा चित्रपट तत्कालीन राजकारणावर आधारित होता. मणिरत्नम यांनी पुढे 'बॉम्बे'मध्येदेखील हिंदू-मुस्लीम संघर्ष दाखवला होता. 'दिलसे'चेदेखील कथानक हे याचप्रकारच्या राजकारणावर आधारित होते. असे अनेक राजकीय विषयांवर आधारित चित्रपट आहेत. व्यावसायिक चित्रपटात 'रंग दे बसंती,' 'ब्लॅक फ्रायडे' अशा चित्रपटांची नावेसुद्धा आपण घेऊ शकतो. गेल्या काही दिवसांत 'उडता पंजाब' नावाचा चित्रपट आला होता, तोसुद्धा पंजाबमधील युवकांकडून होणार्‍या मादक पदार्थांच्या सेवनावर आधारित होता, यामुळे तो चर्चेत राहिला. एकूणच 'ठाकरे' आणि 'Accidental Prime Minister' यावर चर्चा आज वादविवाद होत असेल तरी, भारतीय चित्रपटातील राजकारण आणि भारतीय चित्रपटांची राजकारण यांचा संबंध जुना आहे, असे आपल्याला नक्कीच म्हणता येईल.

 

- प्रा. गजेंद्र देवडा

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/