सामकांइतकी निस्पृहता दुर्मीळच!
महा एमटीबी   29-Dec-2018


 


महाभारत काळातील म्हणजे कृष्णाच्या सहवासातील पांडवांच्या परिवारातील एक गणले जावे, असे थोर ध्येयवादी, सर्वसमावेशक वृत्तीचे, निस्पृह, रोखठोक आणि अत्यंत कर्तृत्ववान पत्रकार कृष्णाजी पांडुरंग सामक यांचे शुक्रवार २१ डिसेंबर रोजी ठाणे नगरातील मीठबंदर मार्गावरील त्यांच्या मुलीच्या निवासस्थानी वयाच्या ९६व्या वर्षी निसर्गन्यायाने निधन झाले. प्रबोधन परंपरेतील एक उदात्त पण अत्यंत उपेक्षित पर्व समाप्त झाले. “पत्रकारितेत पैसा मिळत नव्हता तेव्हा ते क्षेत्र चरितार्थाचे साधन म्हणून आपण निवडले आणि त्यावेळची पत्रकारिता श्रीमंत होती, असा अनुभव मला आला. तेच माझे संचित आहे,” असे उद्गार सामकांनी नव्वदीत पदार्पण केले तेव्हा काढले होते. त्याची आज विशेषत्वाने आठवण येते. कारण, दुर्जनांनी सज्जनांना 'चोर' म्हणावे असा आजचा काळ आहे. राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो हे खरे नाही, 'मिशनरी वृत्ती' ही भ्रामक कल्पना आहे, प्रत्येक कामात कमिशन खाणे हाच हितकारक धर्म आहे, असे तत्त्वज्ञान प्रसृत करणार्‍यांचा हा काळ आहे. समाजात सज्जनांचा प्रभाव निर्णायक असला पाहिजे, असे ज्यांना वाटते, त्यांनी सामक कसे जगले याचे स्मरण ठेवून आपापल्या क्षेत्रात कर्तव्यरत राहिले पाहिजे. मुंबईच्या दैनिक 'लोकसत्ता'चे वार्ताहर म्हणून ते ओळखले जात. त्यांची राजकीय जाण परिपक्व होती आणि चुकीची बातमी त्यांनी सहसा कधी दिली नाही. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे असेल कदाचित, पण यशवंतराव चव्हाण त्यांच्याशी अतिशय आदराने आणि प्रेमाने वागत. यशवंतराव त्यांना 'आपला माणूस' म्हणत. त्यांची वेगळ्या जातीची मैत्री होती. अत्यंत खासगी स्वरूपाचे राजकीय बोलणे यशवंतराव त्यांच्याशी बोलले आहेत. एकदा यशवंतराव त्यांना म्हणाले, “टिळक भवनात एकदा चक्कर मारा. (टिळक भवन म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभादेवी येथील मुख्यालय) तेथे एक तरुण मुलगा मी घेऊन आलोय आणि त्याला आमच्या एका प्रकाशनाकडे बघायला सांगितलंय. तुम्ही त्याला पत्रकारितेचे प्राथमिक धडे द्या.” तो मुलगा म्हणजे शरद पवार. अशा विश्वासाने लोक सामकांना कामे सांगत. अखेरच्या दिवसांतही यशवंतरावांच्या मनात पवारांविषयी काय भावना वास करीत आहेत, ते सामकांना त्यांच्याकडूनच माहीत होत असे. इतका विश्वास यशवंतरावांनी फार म्हणजे फारच थोड्या लोकांना दिला.

 

पुढे राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या प्रतिभाताई पाटील पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकून मुंबईत आल्या, तेव्हा त्यांचे वडील त्यांना घेऊन आले होते. आमदार निवासात त्यांची सामक आणि 'लोकसत्ता'चे दुसरे वार्ताहर राजा केळकर यांच्याशी गाठ पडली. ते सामकांचे नाव 'विश्वसनीय व्यक्ती' म्हणून ऐकून होते. आपल्याला वारंवार मुंबईला यायला जमणार नाही, तेव्हा तुम्हीच मुलीला सांभाळा, असे सामकांशी बोलून ते निश्चिंत मनाने गावी परतले. याच सामकांना वसंतराव नाईकांच्या सरकारातील एक मंत्री डॉ. रफिक झकारिया यांनी एका बातमीत कोलांटउडी मारून खोटे पाडण्याचा डाव खेळला, तेव्हा सामकांची बातमी खरी आहे, याची ग्वाही देण्यासाठी मंत्रालयातील सर्व पत्रप्रतिनिधी सामकांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. मुद्दाम सांगायचे तर पूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ नव्हता. तो प्रामुख्याने सामकांमुळे उभा राहिला. बरोबरच्या वार्ताहरांकडून आणि नित्य संपर्कातल्या राजकारण्यांकडून सामकांना व्यावसायिक संबंधांपलीकडील इतका मोठा आदर का मिळत असे? पहिले कारण म्हणजे, महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांच्या लहानमोठ्या राजकीय कार्यकर्त्यांची त्यांना असलेली माहिती आणि त्यांची सखोल राजकीय जाण.एखाद्या प्रश्नाचा गुंता कोणामुळे झाला होता आणि तो कोणामुळे सुटला, याची बित्तंबातमी त्यांच्याजवळ असे. डोळे बारीक करून आणि मान तिरकी करून ते एखाद्याचे ऐकायला लागले की, त्याला खोटे बोलण्याचे धैर्य होत नसे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांचा निस्पृहपणा लोकांना अचंबित करीत असे. त्यांना माणसांविषयी प्रचंड प्रेम होते. गप्पा मारायचे त्यांना व्यसन होते म्हटले तरी चालेल.ते रोखठोक होते, पण कधीच उर्मट नव्हते. राजकीय पत्रकारांना व्यवसायाचा परिणाम म्हणून वेगळाच माज असतो. तो सामकांकडे मुळीच नव्हता. ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याला न्याय मिळावा आणि जे काही करायचे ते प्राप्त परिस्थितीत सर्व समाजघटकांचे भले करणारे असावे, कारण नसताना परंपरांशी फटकून वागू नये, विकासाचे राजकारण नेत्यांच्या लहरीनुसार नसावे, तर ज्ञानाधिष्ठित व्यवस्थेतून ते आकारास यावे, इतके त्यांचे साधे सोपे तत्त्वज्ञान होत. म्हणून ते पूर्वग्रहांच्या आणि पक्षीय निष्ठांच्या सीमा सहज ओलांडून पत्रकारिता करू शकले आणि सर्वांचा विश्वास संपादन करू शकले. ते हे करू शकले कारण त्यांचा पाया भक्कम होता. महाराष्ट्राचे पहिले प्रांतसंघचालक काशिनाथपंत लिमये यांच्या अनुशासनात घासूनपुसून लख्खपणे बाहेर पडलेले ते संघाचे स्वयंसेवक आणि पत्रकार होते आणि ते सावरकरांना सर्वोच्च नेता मानत होते. ते हिंदुत्वनिष्ठ होते, पण फार थोड्यांना ते तसे आहेत हे माहीत होते. कारण, हिंदुत्वनिष्ठ असणे म्हणजे आत्मलोप करून सर्व समाजाचे होणे, अशी त्यांची धारणा होती. जो शेवटी हिंदू राहत नाही, तो हिंदूही सावरकरांनी 'हिंदुत्व' ग्रंथात समारोप करताना केलेली व्याख्या त्यांनी पूर्णपणे पचवली होती. ते नेहमी मनुजमंगलाचा विचार करीत. त्यामुळे त्यांच्यावर शिक्का मारणे कोणाला जमले नाही. सावरकरांच्या व्यक्तिगत सहवासात ते आले होते. त्यामुळे अन्य कोणाही नेत्यांसमोर त्यांना झुकलेले, दबलेले मी पाहिले नाही. ते पटकन विषयाशी एकरूप होत आणि एका माणसाने दुसर्‍या माणसाशी बरोबरीच्या नात्याने वागावे तसे ते वागत. मानवीय संबंधातील हे दुर्मीळ वैशिष्ट्य त्यांना प्राप्त झाले होते.

 

एकच उदाहरण देतो. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांची मंत्रिमंडळ बैठकीनंतरची वार्ताहर परिषद चालली होती. पोलिसांच्या वेतनवाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा असून राजकोषाकडे पाहून निर्णय घ्यावा लागेल, असे नाईकांनी म्हणताच सामक बोलून गेले की, “काही गुंतागुंत नाही हो, तुमचा एक-दोन दिवसाचा तंबाखूचा जो खर्च असतो, ते त्यांचे महिन्याचे वेतन असते. टाका सोडवून.”आता काय होणार या चिंतेने आम्ही बाकीचे वार्ताहर अस्वस्थ झालो होतो. पण, नाईकांनी हात जोडले आणि सामकांकडे दुसर्‍या विषयाकडे वळण्याची अनुमती मागितली. नाईकांचे आणि सामकांचे संबंध कधीही बिघडले नाहीत. तो सामकांच्या वादातीत निस्पृहतेचा विजय होता. सामकांनी काशिनाथपंतांच्या 'विक्रम' साप्ताहिकाचे मुंबईचे वार्ताहर म्हणून काम केले. पु. भा. भाव्यांच्या 'आदेश'च्या प्रती रस्त्यावर उभे राहून त्यांनी विकल्या. त्यांनी भागवतांच्या 'प्रभात' दैनिकातही भरपूर काम केले. संपादक श्रीपाद शंकर नवरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. तुमची व्यावसायिक प्रवीणता परिपूर्ण असेल तर तुमच्या राजकीय मतांचा हेटाळणीने अनादर करण्याचे धैर्य समोरच्याला होत नाही, हा धडा ते नवर्‍यांकडून शिकले. नवर्‍यांना आंबेडकर किती मानीत, ते सर्वश्रुत आहे. नवरे हे पत्रकारांचे अनभिषिक्त 'प्रेस कौन्सिल' म्हणजे न्याय मागण्याची चावडी होते. त्याच निष्ठेने सामकांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे काम पाहिले. पत्रकार संघाच्या सर्वश्रेष्ठ अध्यक्षाच्या नामावलीत त्यांचा समावेश होऊ शकतो. इंग्लंडची संस्कृती कॉफी हाऊसमधून उभी राहिली असेल, तर आपले पत्रकार संघ हे गप्पांचा अड्डा झाले पाहिजेत आणि तेथे समाजासमोरील प्रचलित प्रश्नांची जाताजाताही साधकबाधक चर्चा होत राहिली पाहिजे, हा सामकांचा दृष्टिकोन होता. सर्वांना विश्वासात घेऊन पूर्णपणे लोकशाही पद्धतीने त्यांनी पत्रकार संघाचे काम केले. कधीही गटबाजी केली नाही. आज आझाद मैदानावर पत्रकार संघाची जी भव्य वास्तू उभी आहे, त्यामागे सामकांची पुण्याई पहारा देत उभी आहे, याचे भान आपण ठेवले पाहिजे.

 

दिसायला कसे होते सामक? त्यांचे शरीर व्यायामाचे होते. ते काटक आणि काटकोळे होते. त्यांच्या अंगावर कधी अनावश्यक मास चढले नाही की, त्यांचे पोट कधी सुटले नाही.ते वर्णाने काळसर होते. त्यामुळे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असूनही ते दलित वाटत. त्यांची वागण्याची पद्धती तशी खेडूतांची होती.त्यांना पुढेपुढे करायची सवय नव्हती. पण, ते अतिशय मोकळेपणे आणि मोठ्याने हसू शकत. आवाज खणखणीत आणि उच्चार स्पष्ट होते. मरेपर्यंत स्मृती टवटवीत होती. आठवणींचा तो समृद्ध कोष होता. तंबाखूची चिमूट आणि कधीतरी रमीचा डाव हा त्यांचा विरंगुळा होता. सामकांनी व्हीजेटीआयचा कापडाच्या गिरणीच्या तंत्रज्ञानाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्याचबरोबर त्यांना शेतीची चांगली माहिती होती. पत्रकारितेत त्यांचा दबदबा निर्माण होण्यास याही गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यांची महाराष्ट्रातील दुष्काळावरची वार्तापत्रे ते ग्रामीण जीवनाशी किती एकरूप झाले होते, याची साक्ष देतात. पत्रकारितेतील ते व्यंकटेश माडगूळकर होते, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. ते कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणूनच जगले. नैराश्य येत असे, पण प्रत्येकवेळी सावरकरांचे विचार त्यांना पुढे जाण्यात साह्य करीत. ते रसिक होते. खाण्यापिण्यात त्यांना चव होती.त्यांनी प्रेमविवाह केला होता. तीन मुली आणि शेवटचा मुलगा. त्यांना सात नातवंडे आहेत आणि पंतवंडेही त्यांनी पाहिली. मुलगा धनंजय याला त्यांनी तत्त्व म्हणून महापालिका शाळेत शिकविले. आज तो अभियंता म्हणून अमेरिकेत तेथील सरकारच्या संरक्षण खात्यात काम करून निवृत्त झाला आहे. सामक समृद्ध जीवन जगले. त्यांचे वडील शिक्षक होते आणि सामकांची वृत्ती शिक्षकाचीच राहिली. त्यांच्या जीवनाचे सार सांगायचे तर त्यांना माणसांविषयी प्रचंड प्रेम होते. परिवर्तनाची आस होती आणि त्यासाठी समर्पित जीवन जगण्याची इच्छा होती. तसे ते जगले. 'इंडियन एक्सप्रेस'चा वार्ताहर मुल्ला याच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्यांच्या मुलीने बीएला संस्कृत घेतले, याचे त्यांनी केले तेवढे कौतुक कोणी केले नसेल. जयंतराव साळगावकरांच्या सांगण्यावरून मी पु. भा. भावे स्मृती समितीचा कार्यवाह झालो, तेव्हा पहिल्याच वर्षी पत्रकारिता पुरस्कार सामकांना देण्यात आला. त्यावेळी सर्व पुरस्कार विजेत्यांच्या वतीने त्यांनी छोटेखानी भाषण केले. ते आजही जसेच्या तसे आठवते. बेळगाव कारवारच्या सीमाप्रश्नाचा महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी विश्वासघाताने विचका कसा केला, ते त्यांनी विस्ताराने सांगितले. तसे करताना त्यांनी यशवंतरावांवरही टीका करण्यास सोडले नाही. यावर माझ्याशी बोलताना त्यांनी “आपली निष्ठा जनतेशी असली पाहिजे,” अशा शब्दांत आपल्या भाषणाचे समर्थन केले. आपण सावरकरांचे पायही चेपले आहेत आणि त्यांच्याशीही वाद घातले आहेत, असे त्यांनी सांगितले. तुमच्या लिपीत आणि तुमच्या भाषेत मी तुम्हाला उत्तर देईन, असे आपण एकदा चिडून सावरकरांना म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. ते वाद विसरायचे. महत्त्वाचे काय, तर आपली निष्ठा जनतेशी असली पाहिजे, असा समारोप ते करीत.

 

-अरविंद कुळकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/