लिखित साहित्यातील चिह्नसंकेत...
महा एमटीबी   29-Dec-2018


 

ज्ञानेश्वरीच्या संदर्भात मागील लेखात ज्ञानेश्वर माऊलींनी लिखाणाला सुरुवात करण्याचे आधी केलेल्या काही ओव्यांचा संदर्भ घेऊन काही विश्लेषण करायचे होते. माझ्या दोन लेखांमधे दोन आठवड्यांचा अवधी गेल्यामुळे वाचकांच्या संदर्भासाठी त्या ओव्या आणि त्यावर संत नामदेवांनी केलेली टिप्पणी पुन्हा देत आहे...

 

नेवाशाला परत आल्यानंतरच्या एका अनुभवाचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली काही ओव्यांच्या माध्यमातून करतात. पतीचा मृत्यू झाल्याने शोकमग्न असलेली एक महिला श्री ज्ञानदेवांना पाहून त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे येते. माऊलींनी 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद तिला दिला. गोंधळलेल्या महिलेने पती निधनाचे वृत्त सांगून त्याच्या प्रेताकडे बोट दाखवल्यानंतर माऊली पुढे होऊन प्रेताजवळ जातात आणि प्रेताला त्याचे नाव विचारतात, असा तो प्रसंग होता. माऊलींनी नाव विचारून केलेल्या चौकशीला प्रतिसाद देत तो मृतदेह सजीव होतो, याचे वर्णन श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या आधी असे केले आहे...

 

शवाचे नाव सच्चिदानंद ।

ऐकुनी झाले ज्ञानदेव सखेद ।

काय सत्-चित्-आनंद । प्रेतरूप जाहला ॥१॥

मग निकट जाऊनी ज्ञानदेव । चाळवूनी पाहिले शव।

तव देह जाहला सजीव। उठूनी उभा राहिला ॥२॥

ज्ञानेश्वरीचा लेखक । म्हणौनी ज्याचा उल्लेख ।

त्या ग्रंथांती केला सकौतुक ।

सच्चिदानंदबाबा तोच हा॥३॥

 

कालांतराने, ज्ञानेश्वरीच्या अखेरीस श्री ज्ञानदेवांनी एका ओवीत याचा उल्लेख असा केला आहे...

 

शके बाराशते बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।

सच्चिदानंदबाबा आदरे लेखकू जाहला॥

 

आता नेवाशातला एका गृहस्थाच्या मृत्यूचा प्रसंग आणि ज्ञानेश्वरीत याचे आलेले उल्लेख यातला चिह्नसंकेत काय असेल, त्याचे तात्त्विक विश्लेषण आपल्याला करायचे आहे. याला अन्य संदर्भ असा आहे की, श्री ज्ञानेश्वरांच्या सदेह समाधीनंतर माऊलींचे समकालीन श्री नामदेवांनी एक कवन लिहिले आहे, त्यातील पहिली चार पद अशी आहेत,

 

गेले दिगंबर ईश्वरविभूति ।

राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥

वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानीं।

आतां ऐसे कोणी होणें नाहीं ॥ २ ॥

'सांगतील ज्ञान म्हणतील खूण'।

नयेची साधन निवृत्तीचें ॥ ३ ॥

'परब्रह्म डोळां दाऊं ऐसे म्हणती'।

कोणा न ये युक्ति ज्ञानोबाची ॥ ४ ॥

 

यातल्या तिसऱ्या पदातला उल्लेख...'सांगतील ज्ञान म्हणतील खूण' असा आहे आणि त्यातील 'खूण' या शब्दाचा वापर स्पष्टपणे श्री ज्ञानदेवांच्या चिह्न आणि चिह्नसंकेतांच्या वापराकडे आपले लक्ष वेधून घेतो. श्री नामदेवांच्या नजरेतून श्री ज्ञानदेवांच्या या विलक्षण चिह्नसंकेतांचे झालेले दर्शनसुद्धा चेतनादायी आहेज्ञानेश्वरीतील या लिखित चिह्नसंकेताचा शब्दार्थ मराठी वाचकाला सहज उमजेल असा आहे. परंतु, संत ज्ञानेश्वरांच्या लिखित साहित्यातील अन्य दृष्टांतांचा तुलनात्मक अभ्यास करताना, याचा भावार्थ आणि सूक्ष्मार्थ काही वेगळे संकेत देतो आहे, असे लक्षात घ्यायला हवे. वाचकांनी लक्षात घ्यावे की, हे विश्लेषण तात्त्विक म्हणजेच 'Speculative' स्वरूपाचे आहे. अन्य अभ्यासकांचे या संकेतासंदर्भात वेगळे विचार असू शकतात. इथे चिह्न अथवा प्रतीकशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून 'Taxonomy' म्हणजे वर्गीकरणशास्त्रातील सूत्रांनुसार लेखक म्हणून मी माझे विश्लेषण मांडतो आहे. विज्ञानयोगाची शिकवण देताना सातव्या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

 

आईका मग तो अनंतु । पार्थाते असे म्हणतु ।

पै गा तूं योगयुक्तु । जालासी आता ॥१॥

समग्रातें जाणसी ऐसें ।

आपुलिया तळहातीचे रत्न जैसे ।

तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेसी ॥२॥

एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधी जाणावें । तेंचि लागे ॥३॥

 

इथे पहिल्या तीन ओव्यांमध्ये माऊली सांगतात, कुठल्याही परिस्थितीचे आकलन होण्यासाठी गोंधळून जाऊ नये. अशा वेळी प्रथम विज्ञाननिष्ठ मार्गाने समस्या समजून घ्यावी. इथे विज्ञानाची काय मदत होणार, असा भ्रम असू नये. समस्या काय आहे, प्रथम योग्य रीतीने समजून घ्यावे.

 

ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।

जैसी तीरी नांव न ढळे । टेकली सांती ॥४॥

तैसी जाणीव जेथ न रिघे ।

विचार मागुतां पाउलीं निघे ।

तर्कु आंयती नेघे । आंगी जयाचां ॥५॥

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।

तेथ सत्यबुद्धि ते अज्ञान । हेंही जाण ॥५॥

 

या पुढच्या तीन ओव्यांमध्ये माऊली म्हणतात, समस्या समजून घेतल्यावर आता डोळे मिटून शांत चित्ताने विचार करा. विचार सुरू केलात की, समस्या दूर करण्याचे तर्कनिष्ठ मार्ग आपोआप सुचतील.

 

अज्ञान अवघे हरपे । विज्ञान नि:शेष करपे ।

आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनी जाइजे ॥७॥

ऐ वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ

जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचे ॥८॥

जेणें सांगतयाचे बोलणे खुंटे ।

ऐकतयाचें व्यसन खुटे ।

हें जाणणें सोनें मोठें । उरो नेदी ॥९॥

 

या शेवटच्या तीन ओव्यांमध्ये माऊली म्हणतात, आता अशा तर्कनिष्ठ मार्गाने सर्व अज्ञान दूर होईल आणि अर्थात, त्यामुळे समस्यासुद्धा दूर होईल. जे गूढ आणि अगम्य आहे ते तर्कनिष्ठ विचारांनीच समजून घेता येते आणि सामान्यांना समजावून सांगता येते. अशा विज्ञाननिष्ठ मार्गाने विचार करावा, जो सर्वात मूल्यवान असेल आणि त्यामुळे समस्यापूर्ती निश्चितपणे होईलआता आपण परत वरच्या मुद्द्याकडे वळूया. आता असे लक्षात घ्यायला हवे की, इतके विज्ञाननिष्ठ लिहिणारे ज्ञानदेव माऊली श्री ज्ञानेश्वरीच्या सुरुवातला म्हणतात, ऐ वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ । असे गूढार्थ उकल करण्याचा मार्ग दाखवणारे ज्ञानेश्वर माऊली सुरुवातीला लिहितात, 'शवाचे नाव सच्चिदानंद' आणि शेवट म्हणतात,

 

ज्ञानेश्वरीचा लेखक । म्हणौनी ज्याचा उल्लेख ।

त्या ग्रंथांती केला सकौतुक ।

सच्चिदानंदबाबा तोच हा ॥३॥

 

ज्ञानेश्वरीच्या लेखनाला सुरुवात करताना आणि लेखन सीमा म्हणून स्वत: माऊलींनी लिहिलेल्या या दोन्ही संकेतांत ती स्त्री म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर माऊलींची प्रज्ञा असावी. नेवाशात परत आल्यावर समोर आलेली ही विधवा आता विधवा न राहता माऊलींच्या आशीर्वादाने ते सच्चिदानंदबाबा म्हणजे साक्षात स्वत: माऊली प्रज्ञाऊर्जित होऊन श्री ज्ञानेश्वरीच्या लिखाणासाठी सिद्ध झालेली आहे. याचे वर्गीकरण विश्लेषण इतकेच की, ज्ञानेश्वर माऊली विज्ञाननिष्ठ होते, हे त्यांच्या सातव्या अध्यायाच्या सुरुवातीच्या नऊ ओव्यांमध्ये आपण स्पष्टपणे पाहिले. समस्या आणि त्यांच्या पूर्तीचे असंख्य दृष्टांत श्री ज्ञानेश्वरीत उपलब्ध आहेत. लिखित चिह्नसंकेत वापरून वाचक आणि श्रोत्याने त्याचे आकलन कसे करून घ्यावे, समस्यापूर्ती कशी करावी, या सर्व मार्गांचे धडे माऊली सतत देत असतात. मराठी भाषेला सुवर्णरेहेने सजवणाऱ्या, सात दशकांपूर्वी लिहिलेल्या माऊलींच्या या विलक्षण चिह्नसंकेतांचा, प्रतीकशास्त्र आणि वर्गीकरणशास्त्राच्या माध्यमातून विश्लेषण करण्याचा विद्यार्थी म्हणून नम्रतेने केलेला एक प्रयत्न आहे. आपल्या लेखमालेचा मूळ उद्देश चिह्न, चिह्नसंकेत आणि या प्राकृतातील चिह्नसंस्कृतीचा अभ्यास वाचकांसाठी मांडणे असा आहे. संत परंपरेतील महानुभावांनी लिहिलेल्या साहित्यातील असे चिह्नसंकेत आणि त्यांच्या अनेक शैली याचा परिचय वाचकांना करून देताना मला होणारा आनंद अगणित आहे. अर्थात, लिखित साहित्यात संतसाहित्यासह मूळ भारतीय पंचतंत्र आणि देशी परदेशी लेखकांच्या संकेतांचा अभ्यास आपल्या पुढे सादर होणारच आहे. श्री ज्ञानदेव माऊलीस दंडवत...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/