तिसरा दिवस भारतासाठी आशेचा आणि निराशेचा
महा एमटीबी   28-Dec-2018मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामना हा क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय रंजक ठरला. एकीकडे भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १५१ धावांवर आटोपला, तर दुसरीकडे भारताच्या दुसऱ्या डावांमध्ये तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ५४ अशी परिस्थिती झाली. त्यामुळे भारताचा फॉलो ऑन न घेण्याचा निर्णय फसला असे दिसून आले.तरीही भारताकडे ३४६ धावांची आघाडी आहे.

 

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मेलबर्न कसोटीत आपल्या भेदक गोलंदाजीने पहिल्या डावात ६ गडी बाद करुन ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली. जसप्रीतच्या चमकदार कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांच्या पुढे गेला नाही. बुमराहच्या या बहारदार कामगिरीमुळे एक वेगळा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. बुमराहने त्याच्या कसोटी करिअरच्या पहिल्याच वर्षात सर्वात जास्त बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच वर्षात त्याने ४५ गडी बाद केले आहे. बुमराहने टॅरी एल्डरमॅन (१९८१) आणि कर्टली एंब्रोज १९८८ साली केलेला विक्रम मोडीत काढला. त्या दोन्ही दिग्गजांनी कसोटी पदार्पणाच्या वर्षात प्रत्येकी ४२ कसोटी बळी घेतले.

 

फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीला उतरण्याचा विराटचा निर्णय एकापाठोपाठ परतीचा मार्ग धरत भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारताची दुसऱ्या डावात ४४ धावांवर ५ बाद अशी बिकट अवस्था झाली. पॅट कमिन्सने टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. कमिन्सनेच एकहाती भारताचे चारही बळी मिळवले तर हेजलवूडने रोहित शर्माची विकेट घेतली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अगरवाल आणि रिषभ पंत अनुक्रमे २८ व ६ धावांवर नाबाद होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/