'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चा ट्रेलर प्रदर्शित
महा एमटीबी   27-Dec-2018


 


मुंबई - 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता बहुचर्चित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलरही अखेर प्रदर्शित केला. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित हा चित्रपट संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तत्कालिन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर काम करत होते. त्यांचे पंतप्रधान होणे हा केवळ योगायोग होता. त्यांना मोकळेपणाने काम करण्याची मुभा नव्हती. त्यांचा उपयोग राहुल गांधी यांची कारकिर्द उभा करण्यासाठी केला अशा आशयाचा हा ट्रेलर आहे.

 

अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना याने भारतीय विश्लेषक संजय बारू यांची भूमिका साकारली आहे. अनुपम खेर यांचा लूक, चालण्याबोलण्याची पद्धत हुबेहूब मनमोहन सिंह यांच्यासारखी आहे. वादात असलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटावर काँग्रेस पक्ष आक्षेप घेतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या ट्रेलरमध्ये पात्रांची नावे न बदलता मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची नावे उघडपणे घेतली गेली आहेत.

 
 
 

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट विजय रत्नाकर गुट्टे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/