‘सैराट-२’ येणार
महा एमटीबी   27-Dec-2018

 

 
 
 
 
पुणे : अवघ्या महाराष्ट्राला ‘झिंगाट’ करून सोडणाऱ्या ‘सैराट’ या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. आता ‘सैराट-२’ मध्ये प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असणार? सिनेमाची कथा काय असणार? याबाबत माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ‘सैराट-२’ या सिनेमाचे पुण्यामध्ये चित्रिकरणही सुरु झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
 

२०१६ साली ‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या सिनेमाला उदंड प्रतिसाद दिला होता. राज्यभरातील अनेक छोटेखानी सिनेमागृहात ‘सैराट’चे चार चार शो लावण्यात आले होते. ‘सैराट’ सिनेमामध्ये काम केलेले दोन्ही नवोदित कलाकार रातोरात स्टार झाले. त्यामुळे आता ‘सैराट-२’ मध्ये कोण असणार? याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. आर्चीची भूमिका साकारलेली रिंकु राजगुरु आणि परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर यांना महाराष्ट्रातील घराघरांत ओळखले जाऊ लागले. बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’ ने तुफान कमाई केली होती. त्यामुळे ‘सैराट-२’ हा विक्रम कायम राखणार का? हे पाहण्याजोगे असेल. पुण्यातील चित्रपट महामंडळाच्या कार्यालयामध्ये ‘सैराट-२’ या शीर्षकाची नोंदणी करण्यात आली आहे.

 

आर्ची आणि परश्याचा मुलगा मोठा झाल्यानंतरची कथा या सिनेमामध्ये दाखविण्यात येणार आहे. हैदराबादमध्ये पळून आलेल्या आर्ची-परश्याला मदत करणारी सुमन अक्का त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलाची काळजी घेते. त्याचे संगोपन करते. छाया कदम यांनी ‘सैराट’मध्ये सुमन अक्का साकारली होती. त्यानंतर या मुलाची काळजी त्याच्या मावशीकडे देण्यात येते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ही मावशीची भूमिका साकारली आहे. पुढील कथेची माहिती सिनेमाच्या ट्रेलरमधून स्पष्ट होईल. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ‘सैराट’ची कथा जेथे संपली होती. तेथूनच ‘सैराट-२’ चे कथानक सुरु होत आहे. आर्ची-परश्याचा मुलगा मोठा होऊन प्रिन्स मामाचा बदला घेणार का? की ‘सैराट-२’ मधून काही वेगळा संदेश देण्यात येणार? यासाठी मात्र सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/