‘ठाकरे’ सिनेमाला सेन्सॉरचा आक्षेप
महा एमटीबी   26-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘ठाकरे’ या सिनेमातील काही दृश्यांवर आणि संवादावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. बुधवारी दुपारी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. असे असताना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे सिनेमाच्या टीमपुढे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या समस्येवर आता कोणता तोडगा काढला जाणार हे पाहण्याजोगे असेल.
 

बॉलिवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ‘ठाकरे’ या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. नवाजुद्दीनचा या सिनेमातील लूक सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता. तसेच नवाजने बाळासाहेबांची भूमिका कशाप्रकारे साकरली आहे. याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल आहे. सिनेमाचा ट्रेलर कसा असणार याबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु नेमक्या याचवेळी सेन्सॉरने सिनेमातील काही दृशांबाबत आणि संवादांबाबत आक्षेप घेतला आहे.

 
 
 

बाळासाहेब ठाकरे यांचे रोखठोक भाषण ‘ठाकरे’ या सिनेमामध्ये दाखविण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे हे अनेकदा आपल्या भाषणांमध्ये शिवराळ भाषेचा वापर करत असत. त्यांच्या भाषणाची काही दृश्ये या सिनेमामध्ये दाखविण्यात आली आहेत. तसेच बाबरी मशीद पतनाच्या पार्श्वभूमीचे काही संवादही ‘ठाकरे’ या सिनेमामध्ये दाखविण्यात आले आहेत. सध्या देशात अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर असताना अशा प्रकारचे संवाद सिनेमात जसेच्या तसे दाखवले तर वाद निर्माण होऊ शकतो. असे सेन्सॉर बोर्डचे मत आहे. ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

बुधवारी दुपारी दीड वाजता ‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर मुंबईतील वडाळा येथील कार्निव्हल आयमॅक्समध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. सेन्सॉर बोर्डाचे प्रतिनिधी आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या याप्रकरणी चर्चा सुरु आहे. तरीदेखील ठरलेल्या वेळीच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार असा निर्धार शिवसेनेने केला असल्याचे कळत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/