हीरक महोत्सवी वर्ष : सन्मित्र मंडळ, गोरेगाव
महा एमटीबी   26-Dec-2018

 

 

 
 
 
अजित वर्तक कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना
 

 

१९५७ साली गोरेगाव ग्रामपंचायत होती. लोकसंख्या २० हजारांच्या आसपास असावी. गोगटेवाडी परिसरात वस्ती वाढत होती आणि शिक्षणाच्या सोयींची गरज लोकांना जाणवू लागली. त्यातूनच ‘सन्मित्र मंडळ, गोरेगाव’ याचे बीज रोवले गेले. ‘नूतन शिशुमंदिर’ या पूर्व प्राथमिक विभागाच्या पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेचा आज नूतन शिशुमंदिर (९३ विद्यार्थी), बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा (३०४ विद्यार्थी) व सन्मित्र मंडळ, विद्या मंदिर (७१३ विद्यार्थी) अशा एकूण १,११० पटसंख्येचा वटवृक्ष झाला आहे. एकीकडे मराठी शाळा बंद होत असताना ‘सन्मित्र मंडळ, गोरेगाव’ चा आलेख मात्र उंचावत आहे. अद्ययावत संगणककक्ष, आधुनिक प्रयोगशाळा, प्रत्येक वर्गात ई-लर्निंगची सुविधा यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुयोग्य शिक्षण दिले जात आहे. मराठी माध्यम असूनही गणित व शास्त्र इंग्रजीमध्ये (सेमी इंग्लिश) व इंग्रजी संभाषण वर्ग या अन्य उपक्रमांची जोड दिल्यामुळे मुले पुढील महाविद्यालयीन जीवनातही कुठेही कमी पडत नाहीत.

 

सन्मित्र मंडळ, गोरेगाव’ रजत महोत्सव (१९८३), रौप्य महोत्सव (१९९८) साजरे करत २०१७-१८ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. २०१७-१८ या शालेय वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षभरासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शाळेतील शिक्षकांसाठी योग प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, आर्थिक नियोजन अशा विविध विषयांवर सर्व शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक तसेच बौद्धिक व शिक्षकांसाठी गीत गायनस्पर्धा आयोजित केल्या होत्या. गोरेगाव, मालाड व जोगेश्वरी परिसरातील १५ शाळांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्याला उत्तम प्रतिसाद दिला. हीरक महोत्सवाचे स्मृतिचिन्ह माजी विद्यार्थी सुहास सावंत यांनी साकारले.

 

या कार्यक्रमाच्या मालिकांतील शिरपेचातील तुरा म्हणून १६ डिसेंबर, २०१८ रोजी एक भव्य स्नेहसंमेलन आयोजित केले होते. १,११० विद्यार्थी, त्यांचे पालक, आजी-माजी शिक्षक, मंडळाचे सभासद, गोरेगावमधील इतर संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, इतर मान्यवर व लोकप्रतिनिधी असे जवळपास २,४०० गोरेगावकर उपस्थित होते. गोरेगावातील संभाजी मैदान मिळवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचा मंच, ध्वनी, प्रकाश व अन्य मैदानावरील आवश्यक व्यवस्था माजी विद्यार्थी प्रसाद वालावलकर यांच्या साई डेकोरेटर्स यांनी सांभाळल्या. कार्यक्रमाचे पूर्ण चित्रीकरण व LED स्क्रीनवरील प्रक्षेपण संस्थेचे हितचिंतक महेश निवाते यांनी केले. प्रवेशद्वाराशी मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या सुंदर रांगोळ्या सजल्या होत्या आणि निमंत्रितांचे स्वागत करण्यास शिक्षक व पालक गुलाबजल / अत्तर व पुष्प घेऊन सज्ज होते. 

 

 
 

आशिष माने यांचा सत्कार करताना विजय जोशी


कार्यक्रमाचे निवेदन शाळेच्या माजी विद्यार्थी माधुरी देवधर(आकाशवाणी मुंबई एफएम वाहिनीसाठी मुक्तछंद लेखन, निवेदन व दिग्दर्शन करतात) व शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळून केले. कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ५.३० वाजता मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व प्रमुख अतिथी आशिष माने (सुप्रसिद्ध व नामवंत गिर्यारोहक) यांनी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करून केली. नंतर प्रार्थना झाली. त्यानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार झाला. सोबत विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. पुढील पाच तास विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. नूतन शिशुच्या वयवर्ष तीनपासूनच्या मुलांनी ते दहा वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत एकूण ५५० विद्यार्थी, सर्व शिक्षक, मंडळाचे कर्मचारी व निवडक पालक यांनी सहभाग घेत गायन, नृत्य, तबला जुगलबंदी, सामूहिक गायन, नाटिका व त्याला जोडून संगीत नृत्य असे एकूण ३१ भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी दिली. प्रमुख पाहुणे आशिष माने यांनी त्यांच्या यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेबद्दल सादरीकरण करून मुलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केले. संस्थेचे अध्यक्ष व सन्मित्र मंडळ विद्या मंदिरचे माजी शिक्षक विजय जोशी यांनी संस्थेच्या इतिहासाची आठवण करून देत पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले व संस्थेचे संकेतस्थळाचे www.sanmitramandal.org लोकार्पण केले. शाळेचे माजी विद्यार्थी राहुल व स्वप्नील काळे (दत्त स्नॅक्स) यांच्या सहयोगाने सर्व उपस्थितांना चटपटीत अल्पोपहार मिळू शकला. ठाणे जनता सहकारी बँक, जनकल्याण बँक, सारस्वत बँक व नॉव्हेलटी स्टोर्स यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक पाठबळ दिले.
 
 
संख्येच्या मर्यादेमुळे काही पालकांना व गोरेगावमधील हितचिंतकांना प्रत्यक्ष कार्यक्रमाला बोलावणे शक्य नसल्यामुळे, माजी शिक्षकांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा परदेशात असल्यामुळे हा कार्यक्रम खूप इच्छा असूनही बघता येणार नव्हता, हे लक्षात घेऊन हा कार्यक्रम यूट्यूबवरील चॅनेलवर लाइव्ह प्रक्षेपित केला गेला (https://www.youtube.com/watch?v=kiyeR7yqRh-) व त्याची जबाबदारी तुषार कांबळी या माजी विद्यार्थ्याने सहजरीत्या पेलली. जगभरातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे संयुक्त कार्यवाह प्रशांत आठले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लागलेल्या सर्वांचे आभार मानले. आभारप्रदर्शन चालू असताना माजी विद्यार्थी प्रथमेश कोंडेकरने (मान्यवरांना दिलेल्या स्मृतिचिन्हाच्या) छायाचित्रांची तयार केलेली चित्रफीत LED स्क्रिनवर बॅकग्राऊंडला दाखवण्यात आली. संघाचे जयप्रकाश नगराचे कार्यवाह दीपक मयेकर यांच्या सुरेल आवाजातील संपूर्ण ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाची मुख्य धुरा जरी अ‍ॅड. नारायण सामंत, नरेंद्र पुराणिक या शाळेच्या माजी विद्यार्थी व संस्थेचे खजिनदार अजित वर्तक यांनी सांभाळली असली. तसेच संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, तिन्ही विभागांचे मुख्याध्यापक नंदिनी भावे, वैशाली सावंत व सिद्धार्थ गव्हाळे, पर्यवेक्षक रेखा मोरे, त्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी महिनाभर केलेल्या परिश्रमामुळे व पालकांच्या सक्रिय सहभाग व सहकार्यामुळेच हा भव्य कार्यक्रम यशस्वी व संस्मरणीय ठरू शकला.
 

ईमेल : [email protected]

 
- अजित वर्तक
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/