वज्रेश्वरी देवस्थान परिसरातही ‘हॅप्पीवाला फिलींग’
महा एमटीबी   26-Dec-2018

 

 
 
 
 
खूप बरं वाटतं आहे आणि सांगायला आनंदही होतो आहे की, कळत-नकळत लोकांमध्ये ‘HappyWali Feeling’ वाढते आहे आणि ती वाढण्यासाठी मदतीचे नि:स्वार्थहात पुढे सरसावू लागले आहेत. आज पुन्हा एकदा ब्लँकेट्सचे वाटप वज्रेश्वरी देवस्थान परिसराजवळील गरजू लोकांमध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाले. ‘चादर नव्हे, तर प्रेमळ माणुसकीची ऊबच’ असे ब्रीदवाक्य घेऊन मी आणि माझ्या ‘www.happywalifeeling.com’ च्या टीमने ऐरोली ते वाशी फूटपाथलगत राहणाऱ्या १५८ कुटुंबांमध्ये ब्लँकेट्सचे वाटप केले होते आणि या उपक्रमामुळे प्रेरित होऊन माझा होतकरू मित्र राहुल याने हा विषय वज्रेश्वरी मंदिर परिसरात राहणाऱ्या गोरगरिबात करायचे ठरवले.
 

काल अचानक त्याचा फोन आला. “दादा, मी राहुल. आपण तीन वर्षांपूर्वी कसाऱ्याच्या वनवासी पाड्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमात भेटलो होतो. तुझ्या ‘HappyWali Feelingचं काम खूप चांगलं चालू आहे. मी तुझे सगळे उपक्रम पाहत असतो.” मला हे ऐकून खूप बरं वाटलं पण, त्याहून जास्त आनंद त्याचं पुढचं वाक्य ऐकल्यावर झाला. “दादा, मला पण ब्लँकेट्स स्वरूपातील HappyWali Feelingइथे राहत्या ठिकाणी वज्रेश्वरीला गरजूंमध्ये वाटून द्यायची आहे. उद्या तू येशील का? मी माझ्या मित्रांसोबत ब्लँकेट्स गोळा करायचं आणि वाटण्याचं ठिकाण शोधायचं काम केलं आहे. मी ज्या दुकानात कामाला आहे, ते उद्या बंद आहे. मग उद्या दुपारी आपण हे काम करूया.” थोडाही वेळ न लावता मी त्याला होकार दिला. लगेचच मी माझा मित्र विशाल आणि प्रशांत यांना ही HappyWali’ बातमी दिली. आणि त्या दोघांनीदेखील उपक्रमात सहभागी होण्यासाठी होकार दिला.

 

रात्रपाळीवरून घरी साडेचार वाजता पोहोचलो आणि सकाळी ९ वाजता उठून पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात ऐरोलीला पोहोचलो आणि तिथे मला माझे दोघे मित्र भेटले. तिथून विशालच्या गाडीतून आमची स्वारी निघाली मोहिमेवर. गाडीत बसताच मला गाडीत चॉकलेट्स आणि केकचे बॉक्स आढळले. मी त्याकडे कुतूहलाने पाहातच होतो. इतक्यात विशाल म्हणाला,“अरे, आज माझा मुलगा समर्थचा वाढदिवस आहे. हा खाऊ तिथे लहान मुलांना वाटून वाढदिवस साजरा करायचा विचार केला आहे.” मुलाच्या वाढदिवसादिवशीचा मौल्यवान वेळ त्याने अगदी सहज या उपक्रमासाठी दिला होता आणि त्याचे हे विचार बघून एक वेगळाच आदर वाटत होता मला त्याचा. मस्त गप्पा-गोष्टी करत आम्ही पोहोचलो अंबाडी फाट्याजवळ. तिथे आम्हाला राहुल आणि त्याचा मित्र निकित भेटला. आम्ही तिथे चहा घेतला मग, मी राहुलसोबत त्याच्या मोटरसायकलवर बसलो आणि निकेत गाडीत बसला. ब्लँकेट्स गाडीत टाकून परत सुरू झाला प्रवास आनंदाचा, देवस्थान वज्रेश्वरीच्या वाटेवर असणाऱ्या आम्हा पाचजणांचा. या निमित्ताने पहिल्यांदाच वज्रेश्वरीआईचं दर्शन झालं. अगदी गडाच्या आकाराचं ते मंदिर आणि आईचं ते गोजिरं रूप डोळे भरून मनात साठवलं. मंदिराच्या पायऱ्या उतरून चालू झाली सुरुवात ब्लँकेटरुपी आनंद वाटायची. तो आनंद स्वीकारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच सुख अनुभवायला मिळत होतं.

 
ब्लँकेट्ससोबत खाऊ वाटून आम्ही समर्थचा वाढदिवसदेखील एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. जवळपास सगळी ब्लँकेट्स वाटून झाली होती. फक्त दोनच ब्लँकेट्स शिल्लक होती. त्यातील एक प्रशांतने वाटपासाठी घेतले. तितक्यात एक निरागस आवाज कानावर पडला. “दादा, मला पण दे ना रे चॉकलेट.” एक छोटी मुलगी माझ्याकडे मोठ्या आशेच्या नजरेने पाहत होती. एक चॉकलेट तिच्या हातावर अलगत ठेवलं आणि एक वेगळं समाधान तिच्या डोळ्यात चमकलं. मग तिच्या हातात शेवटचं ब्लँकेट दिलं आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. तिथून आम्ही पाचजण सरळ गरम पाण्याच्या कुंडावर गेलो. तिथे टॉवेल, चड्डी भाड्याने घेतली आणि सगळे मस्त गरम कुंडात बुचकळून निघालो. मी इथूनच कामावर जाणार म्हणून बायकोने जेवण सोबत दिले होते. मग त्या जेवणासोबत गरम वडे विकत घेतले आणि मस्त नदीकाठी बैठक मारून जेवळ केले. हे सगळं इतकं मस्त आणि सहजपणे घडत होतं जणू आमची मिनी पिकनिकच असावी. पण या सगळ्यात तीन कधी वाजले, हे कळलंच नाही. मला ५ वाजता ऑफिसला पोहोचायचे होते. मोबाईल नेव्हिगेशनवर रस्त्यात ट्राफिक दिसत होता. मनात वाटलं, उशीर होणार, पण म्हणतात ना नशीब... वाड्याला गाडी. मेन रस्त्यावर निघाली आणि समोर बत्तीवाल्या व्हीआयपी गाड्यांचा ताफा भरधाव वेगात चालला होता. आज मेट्रो भूमिपूजनासाठी बरेच मंत्री भिवंडीमध्ये आले होते. बहुधा त्यातीलच एक कुणीतरी असावे. संधीचा फायदा घेऊन विशालने आमची गाडी त्या ताफ्यामागे पळवली आणि अवघ्या सव्वातासात आम्ही भांडुप गाठलं. एक वेगळाच अनुभव होता, हा पूर्ण दिवसाचा. म्हणजे तसं म्हणायला गेलं, तर ठरलेलं कार्यही पार पडलं आणि न ठरवलेली छोटीशी पिकनिकदेखील झाली. या सगळ्यातून खूप सारी ‘HappyWaliअनुभवता आणि देताही आली. आजच्या निखळ आनंदाचं सगळं श्रेय राहुलचं. कारण, त्यानेच आम्हाला ही हक्काची संधी मिळवून दिली. शेवटी सगळ्या वाचकांना पुन्हा एकदा मनापासून सांगेन तुम्हाला असेच आनंदाचे क्षण अनुभवायचे असतील, तर जरूर ‘www.happywalifeeling.comया संकेतस्थळावर जाऊन तेथील लेख जरूर वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया नमूद करा.
 
 
- विजय माने
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/