मनाला सांभाळणारे सद्गुरू
महा एमटीबी   26-Dec-2018


 

सगळे प्रयत्न, प्रयास मनाला शांत वाटावं, यासाठी चालू असतात. अशा वेळी भगवंत सद्गुरूंची भेट घडवून आणतो. सद्गुरूंची प्राप्ती झाली की, चौफेर नाठाळ घोड्याप्रमाणे उधळणारं मन थोडंस सरळ होतं. सद्गुरूंनी सांगितलेल्या साधना मार्गावरून चालू लागतं. मनाला सुयोग्य मार्ग सापडतो. उद्वेग, वैफल्य कमी होऊ लागलं. सद्गुरूंची आपला सांभाळ करणारी मूर्ती नजरेसमोर साकार होते. मनाला आवरून त्यांच्या चरणावर स्वत:ला घालण्याचा मनापासून प्रयत्न करावासा वाटतो. सद्गुरू अशा शिष्याला मोठ्या आनंदाने सांभाळतात.

 

मानव जन्माला आला की, मनही त्याच्यासमवेत जन्माला येतं. हे मनच मानवाला त्रस्त करतं. कारण, अवतीभवती अनेक घटना घडत असतात. त्यामुळे मन अशांत, अस्वस्थ होतं. मग कशातच मन लागत नाही. ते सैरभैर होऊन जातं. महाभारतकाळात कौरवांची संख्या १०० होती. आता तर त्यांच्यामध्ये खूपच वाढ होत आहे. सज्जनांना त्रस्त करणं हाच त्यांचा धर्म आहे. खरंतर ते अधर्म, अनाचार करत असतात. परंतु, त्यांना वाटतं आपण करतो तेच योग्य आहे. अशावेळी सोशीकपणा, संयम याची परीक्षा घेतली जाते. फार कठीण असा हा काळ असतो. सहनशीलता संपुष्टात आली की, सगळं संपून जातं. अशा मनाला पुनश्च समजवावं लागतं. वारंवार परीक्षा घेणारे प्रसंग जास्त असणार, तामसी स्वभावाचे लोकं जास्त असणार, अहंकार उग्र रूप धारण करणार. शांतता, शांती ही नकळत भंग पावणारच. परंतु, कितीही सांगितलं तरी, कधी मन अशा माणसाच्या संगतीमध्ये तग धरत नाही. होते ती मनाची घालमेल, उलथापालथ. मन ढवळून निघतं. त्रागा, त्रास करून काहीही हाती लागत नाही. अवतीभवती वावरणाऱ्या लोकांना आपल्या अयोग्य वर्तनामुळे मनस्ताप होतो, असं कधीच, किंचितही आपल्याला वाटत नाही. सज्जन लोकांकडूनच समंजसपणाची अपेक्षा केली जाते.

 

उद्विग्न मनस्थितीत काही सुचेनासं होतं. अशा कठीणप्रसंगी मग भगवंताची, ईश्वराची आठवण प्रकर्षाने होते. अदृश्य सृष्टीमधून साक्षी आणि समदृष्टीने सर्वत्र बघणारा परमात्मा परमेश्वर आहे, तोच अशांत मनाला शांत करू शकतो. त्यालाच प्रार्थना करावीशी वाटते. त्याची करुणा भाकली की, त्याला कळवळा येतो. त्याचं स्मरण केलं की, बाकीच्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टीचं विस्मरण व्हायला मदत होते. परमात्मा परमेश्वर हाच एकमेव आधार असल्याचं हळूहळू लक्षात येतं. तोच आपल्या हक्काचा आहे, ही जाणीव होते. बाकीच्या जगताच्या पसाऱ्यातील लोकं, नातीगोती खरी नाहीत. हीच नाती मायेमध्ये ओढत राहतात. असं असलं तरी, मानव त्या मायेच्या गुंत्यामध्येच गुंतत जातो. ‘मी’ आणि ‘माझं’ म्हणतं स्वत:ला फसवत राहतो. अखेर असे काही अतर्क्य प्रसंग उभे राहतात. माणूस त्या तडाख्यामध्ये सापडतो. शेवटी त्याच्या लक्षात येतं की, सगळं जग मायावी असून फसवं आहे, आपण त्यामध्ये फसलेलो आहोत. यामधून बाहेर पडावं असं तीव्रतेने वाटतं. त्याला आदर्श अशा श्रीरामांचं स्मरण होतं. पूर्णावतारी श्रीकृष्णाच्या लीला आठवू लागतात. दत्तगुरूंना तो आळवू लागतो. सगुणाच्या पूजनात मनाला रमवण्याचा प्रयास करतो. त्याच्या नामस्मरणात रमून जाण्याचा मनापासून प्रयत्न करतो. नामस्मरणाच्या छंदामध्ये बुडून जाण्यासाठी जपमाळेवर जप करतो. तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करतो. धर्मग्रंथांची पारायणं करतो. सगळे प्रयत्न, प्रयास मनाला शांत वाटावं, यासाठी चालू असतात. अशा वेळी भगवंत सद्गुरूंची भेट घडवून आणतो.

 

सद्गुरूंची प्राप्ती झाली की, चौफेर नाठाळ घोड्याप्रमाणे उधळणारं मन थोडंस सरळ होतं. सद्गुरूंनी सांगितलेल्या साधना मार्गावरून चालू लागतं. मनाला सुयोग्य मार्ग सापडतो. उद्वेग, वैफल्य कमी होऊ लागलं. सद्गुरूंची आपला सांभाळ करणारी मूर्ती नजरेसमोर साकार होते. मनाला आवरून त्यांच्या चरणावर स्वत:ला घालण्याचा मनापासून प्रयत्न करावासा वाटतो. सद्गुरू अशा शिष्याला मोठ्या आनंदाने सांभाळतात. त्याच्या मनाचा हळूवारपणे गुंता सोडवतात. मनाला भजन, पूजन, नामस्मरणात रमवतात. एकदा का गोविंदाचा छंद जडला की, मन स्थिर होतं. लोकांनी निंदानालस्ती करून नाकारलं तरी, गोविंदामध्ये आपल्याला स्वीकारल्याची सुखद जाणीव होते जगात सगळी नाती मायावी, फसवी असली तरी, सद्गुरू आपले आहेत, त्यांना आपण आवडतो, त्यांना आपण हवे आहोत, ही सुखद जाणीव मनाला सुखावते. चिखल खाणाऱ्या बेडकासारखे असणाऱ्या ‘मी’ला परमतत्त्वापर्यंत जाण्याची ओढ लागते.

 

चिखलात राहूनही अनासक्त राहणाऱ्या कमळासारखं होऊन जाण्याची आस लागते. मग अवतीभवतीच्या मायेच्या पसाऱ्याचा विसर पडतो. सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना भावणारी भक्ती करतो. सद्गुरूंना आवडणाऱ्या उपासनामार्गावर ठामपणानं उभे राहतो. मनाला टोचणाऱ्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करून मनाला भक्कम करणाऱ्या ज्ञानसूर्याकडे लक्ष लागतं. मायारूपी चिखलात बरबटलेल्या शिष्याला सद्गुरू हळूवारपणे स्वच्छ करतात. त्याला आनंदाने सुरेख कपडे घालतात. अशांतीच्या, अस्वस्थेतेच्या भोवऱ्यात गरगर फिरणाऱ्या शिष्याला हळूच अलगदपणे जवळ घेतात. अशा वेळी शिष्याचं मन शांतीच्या सुगंधाने भरून जातं. ही सगळी सद्गुरूंची किमया असते. ते असीम, अलौकिक अशा अभूतपूर्व शांती-समाधानाने जीवनगाभारा भरून टाकतात.

 

सद्गुरूसारिखा असता पाठीराखा।

इतरांचा लेखा कोण तरी॥

 

- कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/