विश्वविक्रमवीर लष्कर
महा एमटीबी   26-Dec-2018कंधो से मिलते है कंधे

कदमों से कदम मिलते है...

या गाण्याप्रमाणेच एकतेचं उदाहरण देत, त्यामुळे आपण काय साध्य करू शकतो, हे नुकतंच भारतीय लष्कराने दाखवून दिलं. सियाचीन ग्लेशिअर्स देशातीला किंबहुना जगातील सर्वांत उंचीचे बर्फाच्छादित ठिकाण म्हणून परिचयाचे आहे. तेथील तापमान, त्या ठिकाणची बिकट भौगोलिक परिस्थिती यामुळे अनेकदा लष्कराला मोठमोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. परंतु, देशसेवेचा विडा उचललेल्या या जवानांनी डोळ्यात तेल ओतून आपल्या प्राणांची पर्वा न करता कायमच आपले कर्तव्य बजावले आहे. नुकतीच आणखी एक मोठी घटना या भागात घडली. ती म्हणजे सियाचीन ग्लेशिअर्समध्ये १८ हजार फूट उंचीवर बिघाड झालेले हेलिकॉप्टर दुरुस्त करून तंत्रज्ञ आणि वैमानिकाच्या साहाय्याने पुन्हा तळछावणीला आणण्यात आले. १८ हजार फुटांवर अशा प्रकारची कामगिरी पहिल्यांदाच पार पाडण्यात आली असून लष्कराने केलेली ही कामगिरी एक प्रकारचा विश्वविक्रमच असल्याचे सांगण्यात येत आहे. खांडा पोस्टवर जानेवारी महिन्यात लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण रात्रभर प्रयत्न करूनही हे हेलिकॉप्टर दुरुस्त करण्यात यश मिळाले नव्हते. त्यातच बर्फाळ जमिनीवर हेलिकॉप्टर उतरविण्यात आल्याने त्याला पुन्हा हेलिपॅडपर्यंतही नेणे शक्य नव्हते. जुलै महिन्यापर्यंत हे हेलिकॉप्टर अक्षरश: नादुरुस्त अवस्थेतच होते. परंतु, भारतीय सैन्याच्या अथक प्रयत्नाने टेक्निशियन टीम आणि पायलट यांच्या मिशनला जुलै महिन्यात पहिले यश मिळाले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला पुन्हा तळछावणीला आणण्यात आले. यावरून भारतीय लष्कराला कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. १८ हजार फुटांवर या हेलिकॉप्टरची करण्यात आलेली दुरुस्ती हा एकप्रकारचा विश्वविक्रम आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या उंचीवर हेलिकॉप्टर्स नेणाऱ्या काही मोजक्याच देशांच्या यादीत आज भारताचे नाव आहे. त्यातच लष्कराची ‘चीता’ आणि ‘चेतक’ ही हेलिकॉप्टर्स तब्बल २३ हजार फुटांवरूनदेखील उडविण्यात येतात. लष्करानेही अनेक आव्हानांचा सामना करत मोठा पल्ला गाठून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. यापुढेही लष्कराच्या शिरपेचात असे मानाचे तुरे नक्कीच रोवले जातील, यात शंका नाही.

 

संवेदनशून्यतेचा कळस

 

"तुमच्या बाळाची प्रकृती गंभीरच होती. त्यातच त्याच्या वाचण्याचीही शक्यता कमीच होती. रुग्णालयाला लागलेल्या आगीत ते बाळ मृत्युमुखी पडलं तर नुकसान भरपाईचा दावा का करताय?," असं ऐकून कोणत्याही आईवडिलांची तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल. असाच संवेदनशून्यतेचा कळस दाखवलाय तो म्हणजे कामगार रुग्णालयाच्या प्रशासनाने. काही दिवसांपूर्वी अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागली होती. त्यात रुग्णालयाचे नुकसान तर झाले होतेच. ते भरूनही निघण्यासारखे होते, परंतु त्या आगीत काहींना आपले प्राणही गमवावे लागले. त्यात काही नवजात बालकांचाही समावेश होता. कामगार रुग्णालयात लोगवी दाम्पत्याने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यात नवजात मुलीचे वजन कमी असल्याने तिची प्रकृती स्थिर नव्हती. त्यामुळे रुग्णालयात त्या नवजात बालकावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर तीन दिवसांनी रुग्णालयात मोठी आग लागली आणि त्या आगीत नवजात मुलीचा मृत्यू, तर मुलगा जखमी झाला. परंतु, यानंतर रुग्णालय प्रशासनाची संवेदनशून्यता समोर आली. "तुमच्या मुलीची वाचण्याची शक्यता कमीच होती, तुम्ही नुकसान भरपाई का मागता?," असा संवेदनशून्य सवाल मृत बालकाच्या आईवडिलांना करण्यात आला. नुकसान भरपाई देऊन त्या बालकाचा जीव परत येणार नाही, हे सत्य जरी असले तरी त्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार हा कोणालाही नाही. नऊ महिने पोटात ठेवून जन्म दिलेल्या आईच्या भावनांचा विचार होणे, रुग्णालय प्रशासनाकडून अपेक्षित होते. परंतु, इथे उलटच चित्र पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी रुग्णालय प्रशासनाने नुकसान भरपाईच्या धनादेशाचे वाटप केले. त्यावेळी या दाम्पत्याने प्रशासनाला त्यांची चूक ध्यानात आणून दिली. याचवेळी प्रशासनानेही," त्यांना धनादेश घ्या, ज्या रकमेचा धनादेश मिळतोय तो न स्वीकारल्यास पुन्हा धनादेश मिळेल याची खात्री देता येणार नाही," असा अजब सल्लाच दिला. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या मुलीचा जीव जाताना पाहणाऱ्या आईची आर्त हाक संवेदनशून्य रुग्णालय प्रशासनाला ऐकू आली नाही. आता या प्रकरणाची पुढे चौकशी होईलच, झाल्यास दोषींवर कारवाईदेखील होईल. पण, त्या चिमुरडीचे प्राण मात्र पुन्हा येणार नाहीत. तेव्हा, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांबरोबरच प्रशासनानेही रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना संवेदनशीलता बाळगायलाच हवी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/