हा कुणाचा फॉल्ट?
महा एमटीबी   23-Dec-2018 
 
 
मागील लेखातच आपण ‘वलींच्या वळवळी’पासून स्वतःची सुटका करून घेतली. आता आपण वलीसारख्याच दुसऱ्या एका रचनेचा अभ्यास करू. ही रचना म्हणजेच ‘स्तर-भ्रंश.’
 

स्तर-भ्रंश ही रचनासुद्धा भूगर्भातील बलांमुळेच तयार होते. परंतु, या रचनेत पृथ्वीचा पृष्ठभाग भंग पावतो व एका ठोकळ्यातच भेग पडून त्याचे दोन ठोकळे तयार होतात. हे दोन्ही ठोकळे त्या भेगेच्या पृष्ठभागावर एकमेकांना सापेक्ष हालचाली करतात. त्यामुळे स्तर-भ्रंशाची शास्त्रीय व्याख्या खडकांमध्ये पडलेली कोणतीही भेग, ज्या भेगेवर खडकांची सापेक्ष हालचाल झालेली आहे अशी करता येईल. स्तर-भ्रंश तयार होण्याच्या प्रक्रियेला ‘भ्रंशीकरण’ (Faulting) असे म्हणतात. जेव्हा एकाच ठोकळ्यात दोन विरुद्ध दिशांवर प्रभाव टाकणारी बले कार्य करतात, तेव्हा तुलनेने कमजोर भागावर तो खडक फाटून तेथे हा स्तर-भ्रंश तयार होतो. स्तर-भ्रंशाचेही अनेक प्रकार आहेत. परंतु, ते पाहण्याआधी आपण स्तर-भ्रंशाच्या रचनेचा अभ्यास करू. वलीसारखीच स्तर-भ्रंशातही अनेक विविध अंगे आहेत. ती पाहू.

 

 
 

.भ्रंश प्रतल (Fault Plane) - ज्या भेगेवर खडकांच्या ठोकळ्यांची सापेक्ष हालचाल होते, त्या भेगेला ‘भ्रंश प्रतल’ असे म्हणतात.

.नति व प्रतिनति (Dip and Hade) - नतिची व्याख्या सर्वांना माहितीच असेल. भ्रंश प्रतलाने क्षितिजाशी (Horizontal) केलेल्या कोनाला ‘नति’ म्हणतात. तर, त्याच भ्रंश प्रतलाने अनुलंबाशी (Vertical) केलेल्या कोनाला ‘प्रतिनति’ असे म्हणतात. म्हणजेच नति व प्रतिनति यांची बेरीज केल्यास ती 90 आली पाहिजे व येते.
 
.भित्तिका (Walls) - भ्रंश प्रतलाच्या दोन्ही बाजूंना एक एक ठोकळा असतो हे आपण पाहिले. आपण त्यांना यापुढे ‘भित्तिका’ असे संबोधू. तर, भ्रंश प्रतलाच्या वरच्या भागातील ठोकळा किंवा भित्तिका ही लोंबत असल्यासारखी दिसते म्हणून तिला ‘लोंबणारी भित्तिका’ (Hanging Wall), तर भ्रंश प्रतलाच्या खालच्या भागातील भित्तिका ही पायासारखी (मानवी पाय नाही, इमारतीचा पाया, Foundation) दिसते म्हणून तिला ‘पाया भित्तिका’ (Foot Wall) असे म्हणतात.

.घसरण (Slip) - ‘घसरण’ म्हणजे एकाच खडकाच्या दोन ठोकळ्यांचे, ते एकत्र असल्यापासून झालेले सापेक्ष विस्थापन होय.

अजूनही अनेक अंगे आहेत पण, आपण इथेच थांबू. आता आपण स्तर-भ्रंशाचे कशा प्रकारे वर्गीकरण करता येते ते बघू. हे वर्गीकरण काही मापदंडांवरून करण्यात आले आहे. ते मापदंड बघू.

.ठोकळ्यांची भासमान हालचाल (Apparent Movement of Blocks) - स्तर-भ्रंशाचे दोन्ही ठोकळे एकमेकांशी सापेक्ष हालचाल कशी करतात, यावरून हा मापदंड ठरवण्यात आला आहे. या मापदंडावरून पडणारे स्तर-भ्रंशाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

 

 
 
.सामान्य स्तर-भ्रंश (Normal Fault) - ज्या स्तर-भ्रंशामध्ये लोंबणारी भित्तिका ही पाया भित्तिकेपेक्षा खाली घसरलेली असल्यासारखी दिसते, त्या स्तर-भ्रंशाला ‘सामान्य स्तर-भ्रंश’ असे म्हणतात. लोंबणारी भित्तिका खाली घसरल्यासारखी दिसते म्हणून असे अजिबात गरजेचे नाही की, लोंबणारी भित्तिकाच खाली घसरली असेल. कदाचित लोंबणारी भित्तिका ही तिच्या जागेवरच असेल आणि पाया भित्तिकाच वर सरकली असेल. परंतु, दिसायला असेच दिसते की लोंबणारी भित्तिका ही पाया भित्तिकेच्या तुलनेत खाली घसरली आहे. जेव्हा लोंबणारी भित्तिका ही खरोखरीच पाया भित्तिकेच्या तुलनेत खाली घसरली असेल, तेव्हा त्या रचनेला ‘गुरुत्व स्तर-भ्रंश’ (gravity Fault) असेही म्हणतात. या प्रकारामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांची निर्मिती होते. या रचना आता आपण पाहू.
 

.होर्स्ट (Horst) - एक रचना घ्या. त्या रचनेत तीन ठोकळे आहेत. त्यापैकी डाव्या व मधल्या ठोकळ्यांत एक सामान्य स्तर-भ्रंश आहे. यात डावी भित्तिका ही लोंबणारी असून मधली भित्तिका ही पाया आहे. याशिवाय मधल्या व उजव्या ठोकळ्यांतही एक सामान्य स्तर-भ्रंश आहे. यात उजवी भित्तिका ही लोंबणारी असून मधली भित्तिका ही पाया आहे. म्हणजेच मधला ठोकळा ही कायमच पाया भित्तिका असून दोन्ही बाजूंचे ठोकळे हे लोंबणाऱ्या भित्तिका आहेत. दोन्ही बाजूंचे स्तर-भ्रंश सामान्य असल्यामुळे मधला ठोकळा हा इतर दोन्ही ठोकळ्यांपेक्षा वर आलेला असल्यासारखा दिसतो. याला ‘होर्स्ट’ असे म्हणतात.

 

.ग्रॅबेन (Graben) - ही रचना होर्स्टच्या अगदी उलट आहे. या रचनेत पुन्हा तीन ठोकळे आहेत व दोन भ्रंश प्रतले असतात. पण दोन्ही बाजूंचे ठोकळे या पाया भित्तिका असतात आणि मधली भित्तिका ही लोंबणारी असते. स्तर-भ्रंश सामान्य असल्यामुळे मधली भित्तिका ही इतर दोन ठोकळ्यांच्या तुलनेत खाली गेलेली दिसते. त्यामुळे एखाद्या दरीसारखा आकार निर्माण होतो. याला ‘ग्रॅबेन’ असे म्हणतात. 

.अनुलंबीय स्तर-भ्रंश (Vertical Fault) - ज्या स्तर-भ्रंशाचे भ्रंश प्रतल हे उभेच्या उभे असते, त्या स्तर-भ्रंशाला ‘अनुलंबीय स्तर-भ्रंश’ म्हणतात. या प्रकारात लोंबणारी भित्तिका किंवा पाया भित्तिकेचा प्रश्नच नसतो. कारण, भ्रंश प्रतलाला वरच व खालचा असे भागच नसतात.

.विरुद्ध स्तर-भ्रंश (Reverse Fault) - सामान्य स्तर-भ्रंशाच्या बरोबर उलट हा प्रकार असतो. या प्रकारात लोंबणारी भित्तिका ही पाया भित्तिकेच्या तुलनेत वर सरकल्यासारखी वाटते. यात ‘थ्रस्ट स्तर-भ्रंश’ (Thrust Fault) नावाचा एक उप-प्रकार पडतो. ज्या विरुद्ध स्तर-भ्रंशाच्या भ्रंश प्रतलाचा क्षितिजाशी केलेला कोन हा ४५ पेक्षा कमी असतो, त्या स्तर-भ्रंशाला ‘थ्रस्ट स्तर-भ्रंश’ असे म्हणतात.

.हिंज स्तर-भ्रंश (Hinge Fault) - या प्रकारात भ्रंश प्रतलाच्या बाजूच्या दोन्ही ठोकळ्यांची सापेक्ष हालचाल ही रेषीय नसून वर्तुळाकार असते. त्यामुळे या प्रकारात भ्रंश प्रतल हे बिजागराची भूमिका पार पाडते.

.स्तर-भ्रंशाची शरीरस्थिती (Attitude of Fault) - स्तर-भ्रंश कोणत्या जागी तयार होतो यावरून हा प्रकार पाडण्यात आला आहे. यातील उपप्रकार बघू.

.नतिलंब स्तर-भ्रंश (Strike Fault) - जर एखादा स्तर-भ्रंश हा त्या रचनेमधील खडकांच्या नतिलंबाला (Strike) समांतर असेल, तर त्याला ‘नतिलंब स्तर-भ्रंश’ असे म्हणतात.
 
.नति स्तर-भ्रंश (Dip Fault) -जर एखादा स्तर-भ्रंश हा त्या रचनेमधील खडकांच्या नतिला (Dip) समांतर असेल, तर त्याला ‘नति स्तर-भ्रंश’ असे म्हणतात.
 
.तिरकस स्तर-भ्रंश (Oblique Fault) - याला काही वेळा ‘कर्णीय स्तर-भ्रंश’ (Diagonal Fault) असेही म्हणतात. हा कोणत्याही नतिला अथवा नतिलंबाला समांतर नसतो, तर कोणत्यातरी वेगळ्याच कोनात असतो. तर, स्तर-भ्रंश व त्याचे दोन प्रकार यांची माहिती या लेखात आपण घेतली. तथापि सगळी माहिती पूर्ण झालेली नाही. उरलेली माहिती आपण पुढील लेखात बघू.

 

(संदर्भ - Textbook of Engineering and General Geology - Parbin Singh - Katson Publishing House)