महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी डब्ल्यू. व्ही. रमन
महा एमटीबी   20-Dec-2018मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी डब्ल्यू. वि. रमन यांची मुंबईत निवड झाली आहे. भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गुरुवारी मुंबई येथे बीसीसीआयच्या निवड समितीकडून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. भारताला २०११ मध्ये विश्वकरंडक मिळवून देणारे दक्षिण अफ्रिकेचे गॅरी कर्स्टन आणि माजी सलामीवीर डब्ल्यू.व्ही. रमन या दोघांची नावे आघाडीवर होते. माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी या दोघांच्या नावाची शिफारस केली होती.

 

अखेर रमण यांनी गॅरी कर्स्टन यांना मागे टाकत प्रशिक्षकपद मिळवले. गॅरी कर्स्टन यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड होईल अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा होती. पण निवड समितीने डब्ल्यू.व्ही. रमन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळेल. रमेश पोवार यांचा अंतरिम प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला होता. दरम्यान, मिताली राजसोबतच्या वादानंतर पोवार यांचे नाव चर्चेत राहिले. टी २० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या पाठिंबा दर्शवल्याने पोवार यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला होता.

 

डब्ल्यू. व्ही. रमन यांचे क्रिकेटमधील योगदान

 

५३ वर्षीय रमण यांनी भारतासाठी ११ कसोटी आणि २७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८८ ते १९९७ या कालावधीमध्ये ते भारतीय संघाबरोबर होते. डब्ल्यू.व्ही. रमन सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/