'महाराष्ट्र केसरी'चे रणसंग्राम सुरु
महा एमटीबी   20-Dec-2018जालना : महाराष्ट्राच्या कुस्तीवीरांसाठी मनाची समजली जाणारी ६२व्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे आयोजन यावेळी जालन्यामध्ये केले आहे. याचे उदघाटन हिंदी चित्रपट अभिनेता अरबाज खान याच्या हस्ते होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे. अभिनेता संजय दत्त आणि अनेक अभिनेत्यांच्या, नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

 

महाराष्ट्र केसरीमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ९०० पैलवान आपले नशीब आजमावणार आहे. सकाळी पहिल्या कुस्तीला सुरुवात झाली. २ मातीच्या व गादीच्या २ अशा एकूण चार आखाड्यांची उभारणी या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या या कुस्त्यांच्या आखाड्यात पैलवानांसोबतच कुस्तीप्रेमींचीही वर्दळ वाढताना दिसत आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत. जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक आणि कुस्तीशी निगडित असलेल्या सर्व संस्था, संघ, व्यायाम शाळा यामध्ये सहभागी झाल्या आहेत.

 

महाराष्ट्र केसरीसाठी १९ डिसेंबरला झालेल्या पहिल्या सत्रात ५७ आणि ७९ किलोच्या माती आणि गादी विभागाच्या वजन आणि वैद्यकीय चाचण्या झाल्या. ही मानाची स्पर्धा जिंकण्यासाठी राज्यभरातील मल्ल वर्षभर मोठी मेहनत घेत असतात. मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत अभिजीत कटके हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जालन्यात दाखल झालेल्या स्पर्धकांचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता कुस्तीच्या चाहत्यांना लागली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/